राज्यभरात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंश सेल्सियसखाली घसरला असला तरी कमाल तापमान मात्र अजूनही ३० अंश सेल्सियसच्या वर असल्यामुळे थंडीचे आगमन झालेले नसल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर भारतात काही ठिकाणी गेल्या काही दिवसात किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली नोंदवले जात आहे. तसेच सध्या वारे पूर्व ते ईशान्येच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी पारा १५ अंश सेल्सियपर्यंत खाली जाताना दिसत आहे. मात्र थंडीचे आगमन होण्यासाठी किमान तापमातील नोंद सातत्याने व्हावी लागते. त्याचवेळी कमाल तापमान मात्र ३० अंश सेल्सियच्यावर राहीले आहे. तापमानात बदल होताना दिसत आहे, मात्र अजून थंडी आलेली नाही असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात मंगळवारी सकाळी सर्वात कमी तापमानाची नोंद अहमनगर येथे १५ अंश सेल्सियस येथे झाली. अहमदनगर, जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा या ठिकाणी किमान तापमान २० अंश सेल्सियसच्या खाली नोंदविण्यात आला. मात्र या सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० अंशाच्या वर राहीले. मुंबईत किमान तापमान २२.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले, तर कमाल  तापमान ३४.३ अंश नोंदविण्यात आले.

सध्या उत्तरेत जम्मू काश्मिरमध्ये बर्फ पडलेले दिसते. येत्या दोन दिवसात देशातील पूर्वेकडील भागात आणि मध्य भारतात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसात काही ठिकाणी धुरक्याचे प्रमाण जाणवत आहे. पाऊस थांबला की धूळ मोकळी, हलकी होते. त्यातच वाहनांचे प्रचंड प्रदूषण आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामामुळे होणाऱ्या धूलीकणांमुळे धुरक्याचे प्रमाण जाणवत आहे.

पाऊस संपला की जमिनीलगतच्या थरांमध्ये तापमानात बदल होतात. तेथे असणाऱ्या धुळीच्या थरात बदल होतो. त्यामुळे पहाटेच्या वेळी धुरके दिसतात. हिवाळ्यातील हा बदल नैसर्गिक असतो. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच विमानसेवेवरही परिणाम होतो.