‘नाम फाऊंडेशन’ला चित्रविक्रीतूनही मोठी मदत मिळावी, या उद्देशाने ५० हून अधिक दृश्यकलावंतांची चित्रे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त येत्या ४ जुलैपर्यंत मांडली गेली आहेत. या प्रदर्शनात शिरल्यावर त्याला सूत्र काही नाही असे पहिल्या नजरेत वाटू शकेल, पण दुष्काळग्रस्तांना मदतीचा ओघ थांबू नये, हे या प्रदर्शनामागचे सूत्रच आहे. सुहास बहुलकर, वासुदेव कामत, विश्वनाथ साबळे, गोपाळ परदेशी, भिवा पुणेकर, अजित देसवंडीकर, सचिन सगरे, पंकज बावडेकर, राहुल इनामदार अशा अनेक चित्रकारांची चित्रं इथं आहेत. तीनही दालनं भरून हे प्रदर्शन आहे. ‘जहांगीर’मधल्या या प्रदर्शनातले कोणते चित्र आपण विकत घेऊ शकतो, याचा विचार महाराष्ट्राची काळजी असणाऱ्यांनी जरूर करावाच. शिवाय, ‘आर्ट व्हिस्टा’ आणि ‘नाम फाऊंडेशन’च्या या उपक्रमाचे पुढे काय झाले, याचाही पाठपुरावा कलाप्रेमींनी केल्यास हे प्रदर्शन कारणी लागले, असे म्हणता येईल.

‘आलमेलकर’ वाढणार!

उन्हाळय़ाच्या अख्ख्या सुट्टीत तुमच्या आप्तेष्टांना घेऊन ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’त (एनजीएमए- रीगल सिनेमाच्या चौकात, एल्फिन्स्टन कॉलेजजवळ) जाण्याची संधी जर आजतागायत तुम्ही हुकवलीच असेल, तर एक खुशखबर : दिवंगत चित्रकार ए. ए. आलमेलकर यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनाला इथे आता मुदतवाढ मिळते आहे! आलमेलकर यांनी भारतीय शैलीची चित्रे आयुष्यभर केली. ही त्यांची शैली अलंकारिक होतीच, पण बाहय़रेषा एकदा अगदी ठरीव-ठाशीव काढल्यावर पुढे, रंग किंवा डिझाइन यांना मुक्त वाव त्यांच्या चित्रांत असे. स्वातंत्र्याच्या उष:काली गिरगावच्या नूतन कला मंदिरात शिकलेल्या आलमेलकरांनी पुढे आपले चित्रवैशिष्टय़ निर्माण केले : भारतातल्या आदिवासी जीवनाची, पण बिगरआदिवासी पद्धतीने काढलेली चित्रे! प्रत्यक्ष आदिवासी भागात जाऊन तिथे रेखाटनांच्या वहीत दृश्य-नोंदी करून त्याचे रूपांतर आपल्या नेहमीच्या घोटीव शैलीत आलमेलकर करायचे. या दृश्य-नोंदींच्या वहय़ासुद्धा प्रदर्शनात मांडल्या गेल्यामुळे हे प्रदर्शन कुणीही पाहिलेच पाहिजे, असे झाले आहे. चित्रकाराची किमान पद्धत काय असते किंवा असायची, हे त्यातून कळेल. दहा रुपयांचे तिकीट या गॅलरीसाठी असते, पण तेवढा खर्च कराच.

‘एकमेव’ नव्हे हे..

कुलाब्याच्या मुख्य रस्त्यावरून रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या ‘आर्थर बंदर रोड’ या रस्त्यावरल्या ‘ग्रँट बिल्डिंग’च्या दुसऱ्या मजल्यावर ‘साक्षी गॅलरी’ची बेल वाजवलीत, की या गॅलरीच्या आवडत्या काही दृश्यकलावंतांचे निराळे काम बघायला मिळेल. सुरेन्द्रन नायर यांच्या चित्रांसारख्याच दिसणाऱ्या संगणकीय प्रिंट्स, तसेच फोटोग्राफी या माध्यमात विवेक विलासिनी, नंदिनी वल्ली मुथय्या आणि मंजुनाथ कामत यांनी केलेले काम यांचे हे एकत्रित प्रदर्शन आहे. यापैकी मुथय्या यांच्या फोटोंमध्ये निळय़ा वर्णाचा एक तरुण तळय़ाकाठी काहीशा भावमग्न मुद्रांमध्ये दिसत राहातो आणि कृष्णाशी एकरूप पावणाऱ्या भक्तीपासून ते एकविसाव्या शतकातही सत्ययुगाशी नाते टिकवणाऱ्या प्रेमभावनेपर्यंत अनेकपरींचे तरंग प्रेक्षकांवर उमटवतो. मंजुनाथ कामत यांनी संगणकीय फोटो-कोलाज या प्रकारात काम केले आहे. या फोटोंमधली प्रतिमांची रचना चित्रांसारखीच दिसते आणि त्यातून इतिहास, वर्तमान यांचा संबंध काहीशा अतक्र्य, काल्पनिक पातळीवर मंजुनाथ लावून दाखवतात. चित्रे पाहण्याची सवय असलेल्यांना हा प्रतिमांचा संबंध इतरांपेक्षा जरा लवकर कळेल आणि एकदा तो कळू लागला, की त्यावर आपापल्या विचारांचे आरोपण करून नवेनवे अर्थ या फोटोंतून लागू शकतील. विवेक विलासिनी हे फोटोग्राफरप्रमाणेच काम करतात, पण त्यांचा कॅमेरा दृश्यकलेचे गावोगावी काय चाललेय हे टिपत राहातो. गावोगावचे किंवा अगदी वस्त्यावस्त्यांमधले महात्मा गांधींचे पुतळे एकाच चौकटीत दाखवणारी प्रतिमा त्यांनी अनेक फोटो एकमेकांशेजारी प्रिंट करून सिद्ध केली आहे, ती कुणीही पाहावी आणि विचारात पडावे! गांधीजी इतके निरनिराळे कसे काय दिसू शकतात, हा प्रश्न कुणालाही पडणारच, एवढे हे वैविध्य आहे. ते मुद्दाम कोणी केलेले नाही. गांधींवरल्या प्रेमातूनच ते गावोगावी निर्माण झाले आहे.

एरवी चित्रांचे वैशिष्टय़ म्हणून ‘हे एकमेव- असे दुसरे सापडणार नाही’ असे सांगितले जाते, पण इथे या प्रदर्शनात प्रिंट मांडल्या आहेत. त्या एकमेव नाहीत, तरी पाहण्याजोग्या आहेत आणि विचारप्रवर्तकही आहेत.