कवयित्री अनुराधा साळवेकर यांची एक गझलसदृश रचना आहे – ‘दीपदाने शांत होता पापणीचे काठ ओले। पैल गीताच्या सुरांना स्पर्शिण्याला शब्द आले॥’ या ओळी आठवाव्यात आणि आपल्या अनुभवानुसार, ‘शब्द आले’च्या ऐवजी ‘चित्र आले’ असा बदल करावा, असं काहीतरी सध्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या सभागृह दालनात पाहायला मिळतं आहे. हे आहे तुका जाधव यांचं चित्रप्रदर्शन. तरुणपणापासूनच कविवृत्तीचे, काहीसे बेछूट अमूर्तचित्रकार अशी त्यांची ओळख, पण आता लौकिकार्थानं एसएनडीटीच्या दृश्यकला विभागातील ते निवृत्त प्राध्यापक आहेत. तरुणपणीच्या त्यांच्या ऊर्मी आजही कायम आहेत, हे त्यांच्या ताज्या चित्रप्रदर्शनातून समजतं. कॅनव्हासभर एखादा अनवट/ मिश्र छटांचा रंग आणि त्या ‘मुख्य’ रंगाला जणू विचलित करणारे, त्या रंगाचा एकसुरीपणा भिरकावून देण्यासाठी आपापले चढे सूर लावणारे आणखी अनेक रंग हे तुका जाधव यांच्या चित्रांचं साधारण रूप. ते आजही तसंच आहे. पण आता या चित्रांना स्पर्शाची नवी मिती लाभली आहे. स्पर्शानंच नेमका पोत, नेमका आकार जाणणं हे स्वत:च्या चित्रपद्धतीत नसलेलं तंत्र, दृष्टी हळूहळू अधू होत गेल्यामुळे तुका जाधव यांनी आत्मसात केलं. त्याचं फलित म्हणजे ही चित्रं. अनेकदा अधिक रंग घेऊन, तो हातानं इथून तिथे -किंवा एकाच जागी- फिरवून जाधव यांची चित्रं सिद्ध झाली आहेत. रंगवैविध्य आहेच. पण प्रदर्शनातल्या अखेरच्या भिंतीवर एक चित्र पूर्ण काळं आहे. त्या काळ्या चित्रात जणू खोबणीसारखा एक पिवळट आकार दिसतो. या खोबणीत पुन्हा दोन काळेच मोठे ठिपके. एक जाडसर – पुढे आलेला – डोळ्यांनी (आणि हातानंही) स्पर्श होऊ शकेल असा. दुसरा मात्र सपाट. निस्तेज. त्याआधीच्या भिंतींवरल्या एका हिरव्या चित्रात साळुंकीच्या डोळ्यासारखा एक आकार दिसतो; पण हा ‘केवलाकार’ आहे, त्याला मुद्दाम अर्थ देण्याचा अट्टहास करू नये, हेही लक्षात येतं. आणखी एका चित्रात ‘पंचशील’च्या ध्वजाप्रमाणे पाच रंग दिसतात. त्या रंगांचा खेळ-मेळ चित्राच्या मध्य भागात सुरू होतो. रंगलेपनाच्या ‘इम्पास्टो’ या तंत्रासारखा परिणाम साधणारं, पण प्रत्यक्षात तितकं हिशेबी नसलेलं काम अनेक ठिकाणी जाणवतं. हे रंगकार्य रंगाचं अस्तित्व मान्य करणारं आहेच, पण हे रंग इतरांसाठी आहेत. चित्र आहे ते स्पर्शातून अमूर्त आकाराकडे, आकारातून पुन्हा नेत्रस्पर्शाकडे येणारं. या प्रदर्शनाला ‘अनुत्तरंग’ असं नाव आहे.

‘जहांगीर’च्याच गच्चीतल्या खास छायाचित्र-दालनात निपुण नय्यर यांनी तास्मानिया, अमेरिका, भारत, नेपाळ, पाकिस्तान येथील भ्रमंतीत टिपलेली छायाचित्रं पाहायला मिळतात. निसर्गदृश्यांप्रमाणेच मानवी जीवनाच्या छायाचित्रांवर ‘पिक्टोरिअल’ पद्धतीचा प्रभाव जाणवेल. मात्र पंजाबातल्या एका शाळेची छायाचित्रं पूर्णत: सामाजिक अंगानं टिपलेली आहेत. चित्रदर्शन महत्त्वाचं की सामाजिक भान असा ‘दोन पर्यायांतून एक निवडा’ सारखा प्रश्न नेहमी असतोच असं नाही, पण कधी कधी तो गडद होतो इतकंच. पण चित्रकार काय किती प्रमाणात निवडतो हे महत्त्वाचं ठरतं. ‘जहांगीर’मध्येच ‘हिरजी जहांगीर दालना’त धुळ्याचे प्रा. सुनील तांबे यांनी सातपुडा ते डांग पट्टय़ातल्या आदिवासी समाजातील व्यक्तींची चित्रं कॅनव्हासवर व कागदावर टिपताना त्यातल्या चित्रदर्शनाला महत्त्व दिलं आहे. इतकं की, काही व्यक्तींच्या चेहऱ्यांना तांबे त्यांच्या दृश्यानुभवामधलेच रंग वापरतात. त्यामुळे इथं निळा, लाल, हिरवट असे चेहरे दिसूनही प्रेक्षकाला काही वावगं वाटू नये. फक्त दृश्यांतून, चित्रांतूनच समाजनिरीक्षण मांडण्याची रीत मात्र बरीच चित्रं पाहिल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाला एकसुरी वाटू शकते.

याखेरीज केमोल्ड प्रिस्कॉट रोड, क्लार्क हाऊस, साक्षी गॅलरी, दिल्ली आर्ट गॅलरी या फोर्ट ते कुलाबा भागातील खासगी गॅलऱ्या तसंच मॅक्समुल्लर भवन, ‘एनजीएमए’ (राष्ट्रीय आधुनिक कला दालन) यांतही प्रदर्शन सुरू आहेतच. पण या साऱ्या प्रदर्शनांबद्दल ‘गॅलऱ्यांचा फेरा’मध्ये आधी लिहिलं गेलं आहे!

फोटोंच्या जंगलात..

उद्योजक व राजकीय नेते (माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी जनता दलाचे अध्यक्ष) कमल मोरारका यांच्या ‘मोरारका फाऊंडेशन’तर्फे ‘जहांगीर’च्या तीनही वातानुकूल दालनांत मिळून, मोरारका यांनी टिपलेल्या वन्यजीव-छायाचित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. अनेक तऱ्हांचे पक्षी फोटोंतून पाहण्यासाठी इथं मुलांनाही न्यावं, असं हे प्रदर्शन वाघ, हत्ती, (भारतात नामशेष झालेला) चित्ता, आदी प्राण्यांच्या फोटोंनी भरून गेलं आहे. प्रदर्शन उभारताना नाटकाच्या नेपथ्यासारख्या खोटय़ा भिंतींचा वापर केला आहे (‘जहांगीर’मधल्या भिंती पांढऱ्या आहेत, तर या काळ्या). शिवाय फरशीवर जाजम, मध्येच खुच्र्या-टेबल वगैरे. त्यामुळे खरं तर हे प्रदर्शन महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात, मोठय़ाशा सभागृहात सहज जाऊ शकेल. त्यासाठी मागणी/ पाठपुरावा मात्र व्हायला हवा. प्रदर्शनाचं खरं वैशिष्टय़ म्हणजे पाच मोठ्ठी छायाचित्रं ‘ट्रान्स-लाइट’ पद्धतीनं प्रदर्शित केली आहेत. कावेरी पक्षी अभयारण्याचं अखेरचं छायाचित्रही त्याचपैकी! पण अन्य छायाचित्रांच्या वरच डकवल्यासारखी पशू-पक्ष्यांची नावं रसभंग करतात.