कोणतीही कला ही मूलत: विद्या असते. विद्याभ्यासासाठी जशी मेहेनत घ्यावी लागते, तशीच मेहनत कला आत्मसात करतानाही घेणे आवश्यक आहे. कलेला विद्येचे अधिष्ठान मिळाल्याशिवाय ती कलाही सर्वमान्य होत नाही. संगीत हे तर एक शास्त्रच आहे. त्या शास्त्राचा पाया भक्कम असल्याखेरीज इतर इमले त्यावर चढत नाहीत, असे परखड मत जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर-काटकर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ आयोजित व केसरी ट्रॅव्हल्स प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये सोमवारी दुपारी बेगम अख्तर यांनी गायलेल्या एका ठुमरीपासून ‘मन राम रंगी रंगले’ या भजनापर्यंत अनेक सुरेल गाणी श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या आवाजात ऐकण्याचा भाग्ययोग ‘लोकसत्ता’च्या वाचकांना लाभला. लखनौमधील ‘पंडित भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालय’ या भारतातील एकमेव संगीत विद्यापीठाच्या कुलगुरू असलेल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांच्याशी ऐन गुरूपौर्णिमेच्या दिवशी गप्पा मारण्याची संधीही वाचकांना मिळाली. श्रुती सडोलीकर-काटकर यांनीही अनेक अनुभव, आठवणी ताज्या करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. व्हिवा पुरवणीच्या संपादिका सोनाली कुलकर्णी यांनी श्रुती सडोलीकर-काटकर यांची मुलाखत घेतली.
शास्त्रीय संगीतच नाही, तर कोणतीही कला ही विद्या आहे. ती कला त्याप्रमाणेच जोपासली गेली पाहिजे. नुसती कला असून उपयोग नाही, तर त्या कलेत शिस्त हवी. तिचा अभ्यास केल्याशिवाय ती कला समृद्ध होत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या विचारसरणीचे बाळकडू आपले गुरू व वडील वामनराव सडोलीकर व आईकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या आईलाही अशिक्षित कलाकार व्हायचे नव्हते. त्यासाठी तिने शाळेत प्रवेश घेतला. कुरुंदवाडसारख्या ठिकाणी शाळेत जाणारी ती पहिलीच मुलगी होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने श्रुती सडोलीकर-काटकर यांनी आपल्या गुरूंच्या आठवणीही जागवल्या. आपले वडील, हे आपले गुरू होते. त्यांनी केवळ संगीताकडेच नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. त्यानंतर आपल्याला गुलुभाई जसदनवाला यांची दीक्षा मिळाली. त्यांच्याकडे तर अनवट रागांतील बंदिशींचा अक्षरश: खजिना होता. या दोन गुरूंनी आपल्याला खूप भरभरून दिले, हे सांगताना त्या दोघांच्याही आठवणीने श्रुती सडोलीकर-यांचा कंठ दाटून आला.
विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे संगीतातील कार्य, नाटय़संगीतातील आपल्या वडिलांची कामगिरी, भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालयाच्या कुलगुरू म्हणून येणारे अनुभव, अशा विविध गोष्टींबाबतच्या आपल्या आठवणी श्रुती सडोलीकर-काटकर यांनी विशद केल्या. सध्या टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमधील गायकांना दिली जाणारी अवास्तव प्रसिद्धी, त्यांना पैलू पाडण्याची गरज आदी अनेक गोष्टींबाबतही त्यांनी परखड मते व्यक्त केली. प्रेक्षकांनीही त्यांना विविध प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला.
शास्त्रीय संगीतच नाही, तर कोणतीही कला ही विद्या आहे. ती कला त्याप्रमाणेच जोपासली गेली पाहिजे. नुसती कला असून उपयोग नाही, तर त्या कलेत शिस्त हवी. तिचा अभ्यास केल्याशिवाय ती कला समृद्ध होत नाही,

आपले वडील, हे आपले
गुरू होते. त्यांनी केवळ संगीताकडेच नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. त्यानंतर आपल्याला गुलुभाई जसदनवाला यांची दीक्षा मिळाली. त्यांच्याकडे तर अनवट रागांतील बंदिशींचा अक्षरश: खजिना होता. या दोन गुरूंनी आपल्याला खूप भरभरून दिले,
कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत शुक्रवारच्या व्हिवा पुरवणीत..