अडीच महिने चालणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या कला शाखेतील तृतीय वर्षांच्या वार्षकि आणि सत्र परीक्षा सलग दोन महिने चालत असे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि व्यवस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर तोडगा म्हणून ही परीक्षा आता अवघ्या नऊ दिवसांत पूर्ण करण्याच्या उद्देशाने व या शिक्षणक्रमाच्या वेळापत्रकामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने वेळापत्रकाची नव्याने रचना केली आहे. या निर्णयामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालणारी विद्यापीठाची परीक्षा आता एप्रिलमध्येच संपेल, त्यामुळे निकालही वेळेत लागतील.
मुंबई विद्यापीठकडून कला शाखेअंतर्गत ४५ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना सुमारे वीस हजार विद्यार्थी प्रविष्ठ होतात. विद्यार्थाना दिलेल्या विषय निवडीच्या स्वातंत्र्याप्रमाणे विद्यार्थी त्यांना हवे ते विषय निवडून कला शाखेच्या पदवी परीक्षांस प्रविष्ठ होतात. परिणामी ही परीक्षा सुमारे अडीच महिने सुरू राहते व नंतर वेळेवर निकाल जाहीर करणे कठीण होते. हे लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने नवीन पद्धतीचे वेळापत्रक कला शाखेतील पदवी परीक्षांसाठी आखले असून अवघ्या नऊ दिवसांत ही परीक्षा घेणे सहज शक्य होणार आहे.

असे असेल नवे वेळापत्रक
* परीक्षांसाठी एकच महत्त्वाचा विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थाना पहिल्या सलग सहा दिवसांच्या परीक्षेला बसणे अनिवार्य राहील. म्हणजेच या विद्यार्थाची परीक्षा पहिल्या सहा दिवसांत पूर्ण होईल. उदा. एखादा विद्यार्थी या परीक्षेसाठी मराठी हा मुख्य विषय घेऊन प्रविष्ठ होणार असेल तर त्याची या विषयाच्या पेपर क्र. ४ ते ९ ची परीक्षा पहिल्या सहा दिवसात घेतली जाईल.
* या परीक्षांसाठी दोन महत्त्वाचे विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थाना त्यांनी घेतलेल्या विषयांच्या इंग्रजीतील अद्याक्षरानुसार पहिल्या येणाऱ्या विषयाच्या तीन परीक्षेला पहिल्या तीन दिवसात प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील व दुसऱ्या विषयाच्या तीन परीक्षेसाठी शेवटच्या तीन दिवशी प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उदा. एखादा विद्यार्थी या परीक्षेसाठी मराठी व इतिहास हे विषय घेउन प्रविष्ठ होणार असेल तर इंग्रजी स्पेलिंगच्या अद्याक्षरानुसार प्रथम येणाऱ्या इतिहास या विषयाचे पेपर क्र. ४,५ व ६ ची परीक्षा पहिल्या तीन दिवसात होईल व मराठी या विषयाचे पेपर ४, ५ व ६ ची परीक्षा शेवटच्या तीन दिवसात म्हणजेच सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी होईल. विद्यार्थानी प्रवेशपत्रावर वर नमूद केलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.