चित्रकलेचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मुंबईत हेलपाटे

दहावीला कलेच्या अतिरिक्त गुणांच्या खिरापतीवर थोडे नियंत्रण आणण्याचा, खोटय़ा प्रमाणपत्रांच्या आधारे गुण मिळवण्याच्या प्रयत्नाला आळा घालण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला असला तरीही या नियमनासाठी घातलेल्या अव्यवहार्य अटी पूर्ण करताना विद्यार्थी जेरीस आले आहेत. चित्रकलेसाठीचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी कला संचालकांचाच शिक्का हवा अशी अट घातल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मुंबईचे हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त गुणांसाठीचा अर्ज शाळेकडे जमा करण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत होती. तोपर्यंत कला संचालकांची स्वाक्षरी आणि शिक्का न मिळाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आणि कला शिक्षक, शाळा हतबल असे चित्र झाले होते.

कला क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय गेल्यावर्षीपासून राज्यमंडळाने लागू केला. गेल्यावर्षी राज्यातील तब्बल ८१ हजार विद्यार्थ्यांनी या अतिरिक्त गुणांचा फायदा घेतला. यामुळे गुणांचा फुगवटा वाढत असल्याची टीका राज्यमंडळावर झाली. त्याचप्रमाणे बनावट प्रमाणपत्रे सादर करणे, पुरेशी कागदपत्रे नसतानाही शाळांकडून अतिरिक्त गुणांसाठी शिफारस येणे असे प्रकारही उजेडात आले. त्या पाश्र्वभूमीवर यंदा अतिरिक्त गुणदान कमी करण्यात आले. त्याचप्रमाणे यासाठीचे निकषही अधिक कडक करण्यात आले. मात्र आता काही अव्यवहार्य अटींमुळे अतिरिक्त गुण मिळण्यासाठी विद्यार्थी पात्र असुनही त्यांना ते मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चित्रकलेच्या परीक्षांमधील प्राविण्यासाठी अतिरिक्त गुण हवे असल्यास थेट मुंबईला जाऊन कला संचालकांचीच स्वाक्षरी आणि शिक्का आणण्याची अट विभागाने घातली आहे.

शिक्षक हतबल, विद्यार्थी हवालदिल

नियमानुसार कला संचालकांचा शिक्का आणि स्वाक्षरी आवश्यक असल्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता माहित असूनही ते अर्ज घेऊ शकत नाहीत, त्यामुळे मुख्याध्यापक आणि कला शिक्षक हतबल झाले आहेत.

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शुक्रवापर्यंत (१५ डिसेंबर) मुदत देण्यात आली होती, तर पुढील एक महिन्याच्या कालावधीत शाळांनी आलेल्या अर्जाची छानानी करून ते विभागीय मंडळाकडे सादर करायचे आहेत. मात्र मुळातच याबाबतचा निर्णय शासनाने २४ नोव्हेंबरला जाहीर केला. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळू शकली नाहीत. त्यामुळे विद्यार्थीही नाराज आहेत. ‘मुळात परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळतात. त्यावर श्रेणीही नमूद असते असे असताना वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता काय?’ असा प्रश्न एका मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.

कला संचालनालयही गोंधळात

कला संचालनालय हे उच्चशिक्षण विभागाच्या अखत्यारित येते. चित्रकलेसाठी अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र तो घेताना कला संचालनालयाला विश्वासात घेण्यात आलेच नाही. त्यामुळे अचानक समोर आलेल्या या निर्णयामुळे कला संचालनालयही गोंधळून गेले. ‘चित्रकलेच्या इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षा दरवर्षी साडेपाच लाख विद्यार्थी देत असतात. हे सगळेच विद्यार्थी दहावीचे नसले तरी हजारो विद्यार्थी अतिरिक्त गुणांसाठी अर्ज करतात. त्यांनी मुंबईला येऊन स्वक्षरी घेणे हे अव्यवहार्य आहे. त्याचप्रमाणे हजारो विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या आणि शिक्के देणे हे संचालनालयासाठीही अडचणीचेच ठरणारे आहे. आजपर्यंत कोटय़ातील प्रवेश किंवा अतिरिक्त गुणांसाठी कधीही अशी अट घालण्यात आली नाही.

कला संचालनालयाच्या संबंधित निर्णय घेताना शालेय शिक्षण विभागाने कल्पना देणे आवश्यक होते. हा निर्णय बदलण्याची विनंती शालेय शिक्षण विभागाला करण्यात आली आहे,’ असे कला संचालनालयातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

नक्की प्रकार काय?

कलेतील प्राविण्यासाठीचे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेतील प्राविण्यासाठी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. चित्रकलेच्या गुणांसाठी अर्ज करण्याचे प्रारूप शासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी दोन्ही परीक्षा कधी उत्तीर्ण झाला, कोणती श्रेणी मिळाली असे घटक आहेत. या अर्जावर कला संचालकांची स्वाक्षरी आणि शिक्का असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाच ते दहा अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी शेकडो किलोमिटरचा प्रवास करून मुंबई गाठण्याची वेळ आली आहे.