जयेश शिरसाट

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुमारे तीन हजार कैद्यांनी आर्थर रोड कारागृह डोक्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. बाधित कैदी सोबत असल्याने संसर्ग वाढेल, उपचार न मिळाल्याने आपलाही मृत्यू होईल, या भीतीने कैदी आक्रमक होत आहेत. अशा अनागोंदीत कारागृहाचा कारभार १५ ते २० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असून, गेल्या आठवडय़ात निमलष्करी दलाला बळाचा वापर करून कैद्यांना शांत करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारागृहातून जामिनावर सुटलेल्या, तात्पुरत्या पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्यांच्या दाव्यानुसार बाधितांची संख्या तीनशेहून जास्त असावी. त्यांच्यावर सर्कल (विभाग) क्रमांक १० आणि ३ येथे उपचार सुरू आहेत. यातील एका विभागात सहा छोटय़ा खोल्या असून प्रत्येक खोलीत दोन कैदी जेमतेम राहू शकतील. त्यामुळे उर्वरित सर्व बाधित अन्य विभागांत कोंबण्यात आले आहे.

बाधितांचा आकडा पाचशे पार, कारागृहात औषधांचा तुटवडा, डॉक्टर नाहीत, अशा अफवांमुळे कैद्यांच्या अस्वस्थेत भर पडत आहे. गेल्या आठवडय़ात बॅरेक क्रमांक ६, ११ मधील कैद्यांनी उपोषण  केले. त्याच दिवशी कारागृहाबाहेर कैद्यांच्या काळजीपोटी जमलेल्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला होता.

अडचण काय ? : कारागृहात दिवसपाळी आणि रात्रपाळीसाठी एकूण सव्वाशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा अपेक्षित आहे. मात्र सध्या सुमारे ३० जण दोन पाळ्यांत विभागून सुमारे तीन हजार कैद्यांचा भार पेलत आहेत. कारागृह सेवेतील २६ जण बाधित झाले. स्वत: कारागृह अधीक्षक विलगीकरणात आहेत. कारागृहाच्याच आवारात असलेली कर्मचाऱ्यांची वसाहत उपचार, विलगीकरण आणि संसर्गाच्या भीतीपोटी पूर्णपणे स्थलांतरित झाली आहे. विलगीकरणासह भीतीने कामावर न येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निमलष्करी दलाच्या दोन तुकडय़ा कारागृहाबाहेर तैनात करण्यात आल्या असल्या तरी त्यांना कारागृहात प्रवेशास परवानगी नाही. या परिस्थितीबाबत कारागृह प्रशासनाने भाष्य करणे टाळले. कारागृह व सेवासुधार विभागाचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी ही माहिती चुकीची असल्याचा दावा करत अधिक बोलण्यास नकार दिला.