हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवर कायमच बोट ठेवले गेले आहे. या घराणेशाहीचा बाहेरून आलेल्या कलाकारांकडून कायमच निषेध होत राहिला आहे. मात्र स्वत: हे कलाकार घराणेशाहीच नसल्याचेच सांगतात. त्यांनी मिळवलेले यश हे अर्थात त्यांच्या अभिनयक्षमतेवरच अवलंबून असते हे मान्य केले तरी अमुक एकाची मुलगी किंवा तमुक एकाचा मुलगा म्हणून इंडस्ट्रीत येताना निदान अन्य कलाकारांना जो संघर्ष करावा लागतो तो सुरुवातीला तरी करावा लागत नाही. विशेषत: मी टूच्या पार्श्वभूमीवर ही बाब ठळकपणे जाणवल्याशिवाय राहत नाही. कारण सध्या या मोहिमेंतर्गत ज्यांनी आपल्या लैंगिक शोषणाच्या अनुभवांना बोलकी वाट करून दिली आहे ते कलाकार कुठल्याही फि ल्मी घरातून आलेले नाहीत हेच पुन्हा पुन्हा दिसून येते आहे. त्यामुळे अनेक अर्थानी बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना तुम्ही एक तर फिल्मी कुटुंबातले असणे किंवा तुमच्यामागे एखादा गॉडफादर असणे, कुणाशी ओळख असणे हेच महत्त्वाचे ठरतेय की काय.. असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या सुरू झालेल्या मी टूच्या मोहिमेने वादळासारखी मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजवून दिली आहे. परंतु यावर आघाडीचे कलाकार म्हणून ज्यांची नावे घेतली जातात ते कलाकार अजूनही गप्पच दिसतात. इंडस्ट्रीत असे काही अनुभव आपल्याला आले आहेत, अशी विधाने किंवा असे अनुभव ही मंडळी सांगत नाहीत. फक्त त्यातील संवेदनशील म्हणवले जाणारे मोजकेच कलाकार या चळवळीला पाठिंबा देताना दिसतात आणि लैंगिक गैरवर्तणुकीच्या मुद्दय़ावर स्त्रियांनी गप्प बसू नये, असे मत मांडून पुन्हा गप्प होतात. घराणेशाहीचा हा संदर्भ जोडण्याची इंडस्ट्रीची वृत्ती आजही कलेच्या क्षेत्रात धडपडणाऱ्या असंख्य नवोदितांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे त्यांना एक तर या क्षेत्राला रामराम करावा लागतो किंवा या क्षेत्रातील वाईट गोष्टी सहन करून वाट काढावी लागते. त्यांना लैंगिक गैरवर्तन, शोषण, फसवणूक अशा अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवलाच तर अनेकदा त्यांचा आवाज दाबला जाण्याचीच शक्यता अधिक असल्याने कोणी बोलण्याचा धोका पत्करत नाही. आजच्या नवोदितांमध्येही एखादी अलिया, सोनम, वरुण धवन, अर्जुन कपूर असू शकेल. पण त्यांना तिथवर पोहोचायचे असेल तर कसे, हा प्रश्न पुन्हा पुन्हा आ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो.

मी टूच्या वादळात बॉलीवूडमध्ये कधी काळी कास्टिंग काऊच म्हणून चर्चिली गेलेली काळी बाजू पुन्हा उघड झाली आहे. काहींनी न घाबरता या लाटेत आपापले लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मांडले, तर काहींनी नाव पुढे येऊ न देता आपले अनुभव सांगितले. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, करीना कपूर, सोनम कपूर, अलिया भट यांनी पाठिंबा दर्शवला, पण यावर भाष्य करून आपल्यालाही असे अनुभव आल्याचे कुणी सांगितले नाही. करण जोहर, शाहरुख खानपासून ते कपूर खानदानापर्यंत कोणीही यावर भाष्य केलेले नाही.

मनोरंजन क्षेत्रात आजही फक्त नफ्याचाच आणि एकमेकांच्या ओळखीने काम मिळवण्याकडे कल आहे. इथे कलेला वाव नाही. त्यामुळे याच क्षेत्रात असलेल्यांची मुलेच त्यांचा वारसा पुढे नेताना दिसतात. त्यामुळे कंगना राणावत, अमृता पुरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना हे अनुभव आले. काहींनी ही परिस्थिती जवळून अनुभवली, मात्र प्रत्येक वेळी त्यांना ती व्यवस्था पूर्णपणे नाकारताही आली नाही. अशा वेळी अगदी मुख्य प्रवाहातील चित्रपट नाही तर नाही, त्यातल्या त्यात आपल्याला आपला अभिनय सिद्ध करता येईल असे चित्रपट शोधत या कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र या वेळी मी टू चळवळीने जोर धरला असल्याने निदान त्यानिमित्ताने तरी शोषण करणाऱ्या या मंडळींना चाप बसेल, अशी काही व्यवस्था इंडस्ट्रीत निर्माण होईल ही आशा कलाकारांना वाटते आहे.

भारतात विविध गुणी आणि कलावंत मंडळींची वानवा नाही. कला ही मुंबई, दिल्ली, चंदिगढपुरती मर्यादित नाही तर तळागाळातील लोकांमध्येही आहे. पण त्यातून कुणी पुढे येताना दिसत नाही. नवाजुद्दीन सिद्दिकी, इरफान खानसारख्या अभिनेत्यांना आजही संघर्ष चुकलेला नाही. साकिब सालेम, नवाजुद्दीनसारख्या कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव याआधी कित्येक वेळा सांगितले आहेत. हे अनुभव फक्त लैंगिक शोषणाचेच नाही तर कृष्णवर्णी असणे, साधेपणा याही गोष्टी त्यांच्या कारकिर्दीसाठी अडथळा ठरल्या आहेत. त्यामुळेच बॉलीवूडमध्ये आपले कुणी तरी ओळखीचे असेल तर निदान पहिली संधी सहजपणे मिळू शकते, हा अनुभव दृढ होऊ लागतो. ‘कहो ना प्यार है’ चित्रपट करण्यासाठी अमिशा पटेलची राकेश रोशन यांच्या कुटुंबाशी असलेली ओळख कामी येते. कंगना राणावत, बिपाशा बासू, अमृता पुरी यांना अनेक प्रयत्नांनंतर बॉलीवूडचे दरवाजे खुले झाले, परंतु राणी मुखर्जी, विद्या बालन, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन यांचे कुणी तरी ओळखीचे असणे कामी आले. आता त्यांनी त्यांची निवड सिद्ध करून दाखवली असली तरी त्यांचा प्रवास अधांतरी नव्हता. त्यांना बॉलीवूडने लगेच आपल्यात सामावून घेतले. पण आजवर असे कित्येक गुणी कलावंत क्षमता असूनही धडपडत राहिलेले दिसतात. सध्या मी टू वादळात ज्यांची नाव अडकली आहे, हे बरेचसे चेहरे नवोदित आहेत. ज्यांच्यावर आरोप झालेत तेही फिल्मी घरातले नाहीत. क्वानसारख्या टॅलेंट संस्थेतही ज्या अभिनेत्रींना ऑडिशनच्या नावाखाली गैरप्रकार सहन करावे लागले त्याही नवोदितच होत्या. याआधीही साजिद खान असो किंवा सुभाष क पूर दरवेळी नव्या कलाकारांना, मॉडेल्सना अशा अनुभवांची शिकार व्हावे लागते. निदान मी टूमुळे या गोष्टी बाहेर येतील, अजून काही चेहरे उघडे पडतील आणि एकूणच व्यवस्थेत काही तरी बदलाची पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी या बदलासाठी बॉलीवूडच्या आघाडीच्या क लाकार मंडळींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वत: सुरक्षित वातावरण अनुभवले म्हणून इंडस्ट्रीत तसे प्रकारच होत नाही, असे म्हणत दुर्लक्षच केले तर बॉलीवूडमध्ये फक्त घराणेशाहीच सुखेनैव नांदताना दिसेल..