प्रशांत ननावरे @nprashant

nanawareprashant@gmail.com

फास्ट फूडच्या जमान्यात देशी पदार्थ मागे पडतायत अशी आरोळी कायम ठोकली जाते. पण देशी पदार्थाचा नीट अभ्यास करून त्याला नावीन्याची जोड दिल्यास तेदेखील लोकांच्या पसंतीस उतरतात. उत्तर भारतातील विशेषत: दिल्ली आणि पंजाबचे मुख्य खाद्य असलेला ‘पराठा’ हा त्याच पंक्तीतला. पोटभर आणि पौष्टिकतेच्या कसोटीवर तंतोतंत खरा उतरणारा. आजघडीला मुंबईत पराठय़ांची अनेक लहान-मोठी हॉटेल्स आहेत. पण आज आपण एका ‘खास’ जागेविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचे पराठे नावानेच नाही तर चवीलाही हटके आहेत.

शारदाश्रम शाळेत असताना महेश देसाई हे अजित आगरकरसोबत क्रिकेट खेळायचे. पुढे वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर महेश यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. सिद्धार्थ महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेताना महेश मिळेल ते काम करत होते. त्यातूनच त्यांचा हॉटेल व्यवसायात शिरकाव झाला. या व्यवसायाचे कुठलेही शिक्षण घेतलेले नसल्याने महेश यांनी सुरुवातीच्या काळात कुलाब्यापासून विरापर्यंतच्या अनेक हॉटेलमध्ये अगदी स्वीपरपासून ते नंतर किचनमध्ये मदतनीस म्हणून काम करताना वेगवेगळे पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. तब्बल वीस वर्षे विलेपार्ले येथील ‘खासीयत’ या हॉटेमध्ये काम केले. पण आणखी किती वर्षे नोकरी करणार असा विचार करून त्यांनी एक लांब उडी घ्यायचे ठरवले आणि दीड वर्षांपूर्वी दहिसरच्या कांदरपाडा येथे ‘खास पराठा अ‍ॅण्ड मोअर’ हे स्वत:चे हॉटेल सुरू केले. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘खासीयत’ने महेश यांना मोठी साथ दिली होती. त्याचीच परतफेड म्हणून स्वत:च्या हॉटेलच्या नावातही त्यांनी ‘खास’ कायम ठेवले.

विलेपार्ले येथे १९९७ साली ‘खासीयत’ हॉटेलने पहिल्यांदा पराठय़ाचे विविध प्रकार सुरू केले, असे महेश सांगतात. त्यामुळे मुंबईत पराठय़ांच्या जन्मापासून ते अलीकडे गल्लोगल्ली पराठय़ांची आधुनिक जॉईंट्स सुरू होण्यापर्यंतचा प्रवास महेश यांनी फार जवळून पाहिला आहे. म्हणूनच ‘खास पराठा’मधील पराठे हे इतर पराठा जॉईंट्सपेक्षा वेगळे आहेत. इथे एकवीस प्रकारचे पराठे मिळतात. त्याशिवाय चीज आणि पनीरमध्येही वेगळे प्रकार आहेत. याव्यतिरिक्त तुम्हाला स्वत:च्या आवडीचे पदार्थ टाकून पराठा बनवून घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर ‘पराठा बास्केट’मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पराठे एकत्रित असतात.

पराठय़ांच्या लांबलचक यादीतील गावठी, मेलोनी आणि फटफटी पराठा हे जरा हटके आहेत. कांदा, बटाटा, लसूण, आले, हिरवी मिरची या शेतात पिकणाऱ्या अतिशय मूलभूत गोष्टी. त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रित वापर असलेल्या पराठय़ाला ‘गावठी पराठा’ नाव देण्यात आलंय. ‘फटफटी पराठा’ हा थोडा क्रंची आहे. कारण त्यात बटाटा, पापड आणि कांद्याच्या हिरव्या पातीचं स्टफिंग असते. तर ‘मेलोनी पराठा’मध्ये पालक, मेथी आणि पुदिनाची पाने असतात. पराठा तयार करताना पिठामध्ये ती मिक्स केली जातातच पण पोळी लाटल्यावर पुन्हा मूठभर त्यामध्ये तिन्ही गोष्टी भरल्या जातात. त्यामुळे ज्यांना हिरव्या पालेभाज्या आवडतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

साधारणपणे पराठय़ाच्या जोडीला दही एवढेच आपल्याला माहीत असते. पण इथे सर्व पराठय़ांसोबत छोले, दाल मखनी, दहय़ाचा रायता, कांदा-कोबी-गाजराची कोशिंबीर, लोणचं असे वेगवेगळे पदार्थ दिले जातात. यापैकी छोले आणि दाल मखनीची चव विशेष आहे. हे दोन्ही पदार्थ अजिबात मसालेदार नसून ते पराठय़ाची चव अजिबात मारत नाहीत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते तयार करण्यासाठी लागणारे मसाले बाजारातून विकत न आणता आवश्यक ते जिन्नस वापरून बनवून घेतले जातात.

खाण्यासोबतच पिण्यासाठीही काही खास ड्रिंक्स येथे आहेत. त्यापैकी ‘सुधारस’चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हिरव्या रंगाचे अतिशय रिफ्रेशिंग असं हे पेय पुदिना, लिंबू, काळं मीठ, आलं यांच्या एकत्रीकरणातून तयार केले जाते. आइस्क्रीम सोडा हे आणखीन एक इतरत्र क्वचितच मिळणारं पेय. ‘खास’मध्ये त्यातही ऑरेंज, स्ट्रॉबेरी, लेमन, सुधा असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. सोडा, व्हॅनिला आईस्क्रीम, मॅप्रोचं सिपर वापरून तयार केलेला आईस्क्रीम सोडा एका आकर्षक बाटलीमध्ये भरून सव्‍‌र्ह केला जातो.

‘खास’चा मेन्यू फक्त पराठय़ांपुरताच मर्यादित नाहीए. म्हणूनच की काय त्याचे नाव ‘खास पराठा अ‍ॅण्ड मोअर’ आहे. वेगवेगळे स्टार्टर्स, पाव भाजी, सँडविच, इडली, डोशाचे प्रकार, भाताचे प्रकार, मिल्कशेक, फालुदा, लस्सी असे इतरही पदार्थ येथे मिळतात. ज्यांना संपूर्ण जेवणाची सवय आहे त्यांच्यासाठी स्पेशल थाळीदेखील आहे. हॉटेल अतिशय छोटेखानी असले तरी नेटके आहे. पोटभर जेवायचे असेल आणि हॉटेलमध्ये जाऊन सब्जी रोटी खायचा कंटाळा आला असेल तर ‘खास’चे ‘पराठे’ तुमची वाट पाहतायत.

खास पराठा अ‍ॅण्ड मोअर

’ कुठे? – शॉप नं. १०, निलांगी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बी.पी.रोड, कांदरपाडा, दहिसर (पश्चिम), मुंबई – ४०००६८

’ कधी? – सोमवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत.