News Flash

सर्वाचेच पाय खोलात, कोण कोणाला मदत करणार?

विधान परिषदेची आज निवडणूक

विधान परिषदेची आज निवडणूक

राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो, हे उद्या (शनिवारी) होणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक  प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तत्त्वे, निष्ठा गुंडाळून आपापल्या स्वार्थासाठी परस्परांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. ‘लक्ष्मी दर्शना’मुळे गाजलेल्या या निवडणुकीत ‘ज्याचा दाम जादा त्यांचा विजय पक्का’ मानला जात आहे.

पुणे, नांदेड, सातारा-सांगली, जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया या विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. सहा जागांसाठी ३० उमेदवार िरगणात आहेत. मतमोजणी २२ तारखेला होणार आहे. सध्या चार मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी एका मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार आहेत. राज्यातील १४७ नगरपालिकांची निवडणूक पुढील रविवारी होत आहे. यामुळेच विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकावी, अशी भाजपची मागणी होती. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. सध्याच्या संख्याबळानुसार नगरपालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा भाजपचा प्रयत्न होता.

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खेळ होतो. मताला पाच लाखांपासून २५ लाखांपर्यंत भाव फुटतो. उमेदवार जेवढा तगडा तेवढा मतदाराचा भाव जास्त, असे गणित असते. सहा मतदारसंघांमध्ये निवडून येण्याकरिता काही कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची चर्चा आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाच हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा उमेदवार आणि राजकीय पक्षांना फटका बसला आहे.

सारेच उलटेपालटे

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. मग राष्ट्रवादीने आपले संख्याबळ कायम ठेवण्याकरिता विविध पर्यायांचा उपयोग केला. भाजप किंवा शिवसेनेशी पडद्याआडून हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. काँग्रेसनेही मग डाव टाकला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा साऱ्यांनीच वापर केला आहे. एकनाथ खडसे हे सध्या रिकामे असल्याने भाजपला जळगावमध्ये चिंता होती.

कारण खडसे यांच्या निकटवर्तीयाचा पत्ता कापण्यात आला होता. राष्ट्रवादीने माजी राज्यमंत्री गुलाब देवकर यांना रिंगणात उतरविले होते. खडसे यांच्या भीतीमुळेच भाजपच्या धुरीणांनी थेट राष्ट्रवादीबरोबरच हातमिळवणी केली. जळगावमध्ये राष्ट्रवादीने माघार घेतली. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नाहीत. अपक्ष िरगणात राहण्यामागे खडसे यांचा हात असल्याची कुजबुज भाजपच्या गोटात आहे.

भंडारा-गोंदिया या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजप जळगावच्या मदतीची परतफेड करील, अशी चर्चा आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे गोपाळ अगरवाल यांनी प्रफुल्लभाईंना आव्हान दिल्याने राष्ट्रवादीने भाजपचा उमेदवार रिंगणात राहील याची खबरदारी घेतल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय परिणय फुके हे रिंगणात असून, राष्ट्रवादीला अपशकुन करण्याकरिता ऐन वेळी काँग्रेस कोणती भूमिका घेते हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विरुद्ध सारे, अशी लढत आहे. काँग्रेसचे अमर राजूरकर यांच्या विरोधात निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. इथे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप सारे एकत्र आहेत.

सातारा-सांगली हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या वेळी या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. जयंत पाटील, उदयनराजे भोसले या साऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे िरगणात आहेत. आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली.

पुण्यात चुरस

पुणे मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिल भोसले आणि भाजपचे अशोक येनपुरे यांच्यात लढत होत आहे. काँग्रेसचा उमेदवार िरगणात राहणे, पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली फाटाफूट यामुळे राष्ट्रवादीला जास्तच प्रयत्न घ्यावे लागले आहेत. काँग्रेसचे संजय जगताप हे सुद्धा िरगणात आहेत. पुण्यात राष्ट्रवादीला धक्का देणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. पण भाजपमध्येही सारे काही आलबेल नाही.

यवतमाळमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे यांच्यात लढत होत आहे. शिक्षण आणि साखर कारखाने क्षेत्रातील मातबर सावंत यांना शिवसेनेने मराठवाडय़ातून आयात केले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी नांदेडप्रमाणेच येथेही एकत्र आहेत.

कोण बाजी मारणार?  सध्या राष्ट्रवादीचे चार आमदार असून, आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. नांदेड कायम राखून सातारा-सांगली किंवा यवतमाळपैकी एक जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जळगावची जागा कायम राखण्याबरोबरच भंडारा-गोंदियाची जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यवतमाळसाठी शिवसेनेने सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:26 am

Web Title: article about legislative council election
Next Stories
1 पेट टॉक : तिबेटियन स्पॅनिअल
2 नितीशकुमारांकडून समर्थन
3 खाऊखुशाल : वाटेवरची चविष्ट पोटपूजा
Just Now!
X