विनायक परब

 

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार

भाईंदर ते मालाड

विस्तीर्ण असा सागरी किनारा हे मुंबईचे अनन्यसाधारण वैशिष्टय़. साहजिकच याचे प्रतिबिंब येथील पुरावशेषांमध्ये दिसायला हवे. मात्र या सागरी वारसा सांगणाऱ्या पुरावशेषांची नोंद म्हणावी तशी पद्धतशीरपणे झालेली नाही किंवा त्याचा व्यवस्थित पद्धतशीर अभ्यासही झालेला नाही. आजवरच्या मुंबईच्या अभ्यासात राहिलेली ही महत्त्वपूर्ण अशी उणीव आहे. सागरी अभ्यास एवढय़ाचसाठी महत्त्वाचा आहे कारण अश्मयुगीन मानवाने मागे ठेवलेले पुरावशेष इथल्याच किनाऱ्यावर सापडले आहेत. प्राचीन मुंबई अर्थात साष्टीची सुरुवात होते ती, भाईंदरपासून. वसईच्या खाडीपासून सुरू होणाऱ्या या परिसरात सागरी मार्गाने आलेल्यांची पहिली वस्ती याच किनाऱ्यावर मालाडपर्यंत झालेली दिसते. मग ते व्यापारी असोत अथवा इतर कुणी. शिवाय स्थानिक कोळी समाजाची वस्तीही याच किनारपट्टीवर आहे. काही भागामध्ये पूर्वी मिठागरेही होती. मात्र आता ती पूर्णपणे बंद झाली आहेत. मिठागरांचे प्रमाण अगदी दहिसपर्यंत चांगलेच होते. मालाड परिसरामध्ये खाडीचे पाणी मोठय़ा प्रमाणावर आतमध्ये येते तिथेही मिठागरे अस्तित्वात होती.

प्राचीन मुंबईमध्ये मालाड व मरोळ अशी दोन खापणे होती. त्यातील भाईंदर ते मालाड हा परिसर मालाड खापणेमध्ये येतो. हा परिसर खूपच महत्त्वाचा आहे. कान्हेरीची ११७ हून अधिक लेणी, मंडपेश्वर व मागठाणे लेणी या परिसरात येतात. याशिवाय महत्त्वाचे आहेत ते सागरी युद्धाचे चित्रण करणारे एक्सरचे वीरगळ आणि बोरिवली पूर्वेस देवीपाडय़ामध्ये देवी म्हणून पूजला जाणारा वीरगळ. या दोन्ही ठिकाणच्या वीरगळांमध्ये साम्य आहे. ते एकाच कलावंताने केलेले असावेत. दोन्हींची अलंकरणशैली एकच आहे.

साष्टी गवेषणाच्या पहिल्या वर्षी भक्ती गोहिल हिने हा संपूर्ण परिसर एक हाती पिंजून काढला. बोरिवली पूर्वेस पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ असलेल्या देवीपाडय़ामध्ये टाटा वीज संग्रहीच्या बाजूला वीरगळाबरोबरच महत्त्वाचे आहे ते हरसिद्धी माता मंदिर. या मंदिराच्या परिसरामध्ये एका मोठय़ा मंदिराचे पुरावशेष पाहायला मिळतात. त्यामध्ये एक छोटेखानी शिलालेखही आहे. मात्र अक्षरे पुसट झाल्याने तो वाचता येणे अशक्य आहे. येथील देवी वानवती या नावाने ओळखली जाते. जहाजांचे रक्षण करणारी ती वानवती देवी. या देवीची उज्जन व पोरबंदर अशा दोन ठिकाणी शक्तिपीठे आहेत. सागरी मार्गाने व्यापार करणाऱ्या समाजाशी तिची असलेली जवळीक यातून लक्षात येते. मध्ययुगातील व्यापारी प्रामुख्याने जैन होते आणि कोकण किनाऱ्यावर त्यांच्या वस्ती व प्राबल्य आढळते. बोरिवलीची ही हरसिद्धी माता या व्यापारी समाजाचे मुंबईशी असलेले साहचर्य स्पष्ट करणारी आहे.

कांदिवलीतील ठाकूर संकुलाच्या सांडपाणी नलिकेसाठी सुरू असलेल्या खोदकामामध्ये एका देवतेची शिरोविहीन शिल्पाकृती सापडली. परिसरात राहणाऱ्या डॉ. श्रीकांत सर्वगौड यांचे या शिल्पाकृतीकडे प्रथम लक्ष गेले. मूर्तीच्या अलंकरणावरून ती देवीची मूर्ती आहे हे नक्की, मात्र कोणती देवता याचा निश्चित उलगडा झालेला नाही. बौद्ध देवता असलेल्या तारादेवीची शिल्पाकृती असावी, असा कयास आहे. या ठिकाणापासून काही अंतरावरच मागठाणेची लेणी आहेत. एकूणच शैलीवरून ही शिल्पाकृती १२व्या शतकातील असावी, असा अंदाज पुरातत्त्वज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केला आहे.

साष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या वर्षी २०१७ साली एप्रिल महिन्यात दोन दिवसांची एक गवेषण कार्यशाळा प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान वनडोंगर परिसरात मनोरी येथे अश्मयुगीन हत्यारे सापडली. अश्मयुगीन हत्यारांसंदर्भातील प्रसिद्ध तज्ज्ञ तोशाबंता प्रधान यांना विशेष अभ्यासासाठी चंदीगढहून बोलावण्यात आले. त्यांनी केलेल्या चाचणी उत्खननात हे ठिकाण मध्याश्मयुगातील महत्त्वाचे मानवी वस्तीचे ठिकाण असावे, यावर शिक्कामोर्तब झाले. मुंबईत काही ठिकाणी अश्महत्यारे सापडल्याच्या नोंदी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. पण इथे अश्महत्यारे घडविणारे (मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपनीसारखे) ठिकाण असावे, असे लक्षात आले. दुसऱ्या वर्षीच्या संशोधक चमूमध्ये हर्षदा विरकुड, लिआन थोतीयिल, ऋषिकेश शिर्के, राधिका साव, कश्यपि राणे हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना मनोरी येथे पाटील वाडय़ाच्या जोत्याच्या भिंतीवर दोन शिलालेख आढळून आले. त्यापैकी एका शिलालेखामध्ये शके १३११ (इ.स. १३८९) अशी तारीख लिहिल्याचे लक्षात आले. याशिवाय मध्ययुगीन मोनोक्रोम ग्लेझ्डवेअर आणि पोर्तुगीजकालीन मृद्भांडय़ांचे अवशेषही इथे सापडले. रोमहून वारुणी ज्या वैशिष्टय़पूर्ण भांडय़ामध्ये आणली जात असे त्याला रोमन अम्फोरा असे म्हणतात. त्याचे अवशेषही याच परिसरात सापडले, हे विशेष. या परिसरातील गवेषणाचे महत्त्व म्हणजे मुंबईच्या सागरी वारशाचे सापडलेले हे पुरावशेष!

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab