चिंचणी-संजानच्या संदर्भातील गेल्या चार भागांमध्ये आपण महामुंबई कशी आकारास येत गेली ते पाहिले. संजान-चिंचणी हे महामुंबईचे उत्तर टोक होते तर त्याचे दक्षिण टोक होते जगप्रसिद्ध बंदर चौल. भारताला वेळोवेळी भेट देणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांनी त्यांच्या नोंदीमध्ये चौलचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो. इसवीसन पूर्व दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून ते अगदी अलीकडे ब्रिटिश कालखंडापर्यंतचे सर्व पुरावे आजवर चौलच्या उत्खननामध्ये सापडले असून ते त्या अस्तित्वावर शिक्कामोर्तबच करतात.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात ग्रीक व्यापाऱ्याने किंवा नौवहन करणाऱ्या तज्ज्ञाने लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीन सी’ या पुस्तकामध्ये सेम्यला असा तर टोलेमीच्या पुस्तकात सिम्यला असा चौलचा उल्लेख येतो. टोलेमीने दुसऱ्या शतकात नाइल नदीच्या मुखाशी वसलेल्या अलेक्झांड्रीया शहराशी चौलच्या असलेल्या व्यापारी संबंधाविषयी माहिती ग्रथित केली आहे. त्याने अनेक व्यापारी बंदरांचे तत्कालीन संबंध अशा प्रकारच्या कहाण्या व इतर माहितीतून उभे केले आहे. याशिवाय १०व्या शतकातील मासुदीने आणि इब्न मुहल्लारनेही सैमुर असा उल्लेख केला आहे. मुहल्लारच्या पुस्तकामध्ये तर इथून सैमुर लाकूड निर्यात होत असल्याचा स्पष्ट उल्लेख येतो. नंतर चेमूर असाही उल्लेख सापडतो.

हे सारे उल्लेख केवळ प्रवाशांच्या नोंदीमध्ये नाहीत तर शिलालेख आणि ताम्रपत्रांमध्येही सापडतात. कान्हेरीच्या लेणी क्रमांक ७ मध्ये पाण्याच्या टाकाचे दान चेमूलच्या सोनाराचा मुलगा सुलासदत्ता याने दान दिल्याचा उल्लेख येतो. तर कान्हेरीच्याच तिसऱ्या शतकातील लेणी क्रमांक २७ मध्ये चेमुलाच्या सिवपुत्ताने लेणीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. खारेपाटणच्या ११व्या शतकातील अनंतदेव पहिला याच्या ताम्रपटामध्ये चेमुल्या असा बंदराचा उल्लेख आहे. तर १६व्या शतकामध्ये निझामाने इथे लावलेले दिशादर्शकही सापडले असून त्यावरून हे त्या काळातील मोठे व्यापारी बंदर होते, असेच लक्षात येते. नाशिकच्या लेणी क्रमांक १० मध्ये असलेल्या उसवदाताच्या शिलालेखातही या बंदराचा उल्लेख आढळतो. एवढे हे बंदर सर्वदूर प्रसिद्ध होते.

चौलच्याच परिसरामध्ये सातवाहन काळातील बौद्ध लेणीही सापडली आहे. बौद्ध धर्म हा नागर धर्म असल्याने तो आणि व्यापार हे दोन्ही हातात हात घालून गेल्याचे अनेक पुरावे जगभरात सापडले आहेत, चौल हेदेखील त्याला अपवाद नाही. चौलच्या लेणींमध्ये स्तूप कोरलेला दिसतो. बौद्ध परंपरेतील थेरवादी परंपरेमध्ये स्तूप पाहायला मिळतो. विहार आणि चैत्य अशा दोन्ही रचना इथे पाहायला मिळतात.

शिलाहारांच्या कालखंडात तर चौल हे समृद्ध व्यापारी बंदरांपैकी एक होते. नवव्या शतकातील आदित्यवर्मन या राजाने चौलच्या स्थानिक राजाला लष्करी मदत केल्याचा संदर्भ सापडतो. चौलच्या राजाचा संबंध श्रीस्थानक अर्थात ठाण्याहून राज्य करणाऱ्या शिलाहार राजाशीही होता. म्हणून तर उत्तर कोंकणातील शिलाहार राजा पहिला अनंतदेव याच्या खारेपाटण ताम्रपटामध्ये चौलचा उल्लेख सापडतो. काही वर्षांपूर्वी चौल प्रकाशात आले ते तिथे सापडलेल्या गधेगळावरील शिलालेखामुळे. आता चौल नागाव परिसरात सापडलेल्या तत्कालीन मुंबईवर राज्य करणाऱ्या १४व्या शतकातील हंबीरराव या राजाच्या शिलालेखामुळे चौल-मुंबई- नागाव संबंधांवर नव्याने प्रकाश पडणार आहे. एकूणच या सर्व नोंदी तत्कालीन मुंबईच्या संदर्भात चौलचे असलेले महत्त्व अधोरेखित करणाऱ्याच आहेत.

चौलसारखे व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले आणि सर्वाधिक महसूल मिळवून देणारे बंदर आपल्या ताब्यात राहावे, यासाठी वेळोवेळी अनेक राजसत्तांनी प्रयत्न केले. त्याचे दाखलेही इतिहासात मिळतात. पोर्तुगीजांनी तर चौल ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. स्थानिक राजांनी त्या वेळेस एकत्र येऊन पोर्तुगीजांच्या बलाढय़ आरमाराला तोंड देण्यासाठी मोर्चेबांधणी केली. पोर्तुगीजांचा वावर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होता. त्यामुळे त्यांचा पाडाव करण्यासाठीदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर कटाची आणखी झाल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. त्याचे संदर्भ एवढय़ाचसाठी महत्त्वाचे आहेत कारण या मोर्चेबांधणीनंतर झालेले युद्ध चौलनजीक समुद्रात झाले, त्याचा जोरदार फटका पोर्तुगीजांचा बसला, आरमाराचे नेतृत्व करणारा वरिष्ठ पोर्तुगीज अधिकाऱ्याचा मुलगा त्या युद्धात मारला गेला. ते युद्ध पोर्तुगीज हरले. चौलचे हे युद्ध १६व्या शतकाच्या पूर्वार्धातच पार पडले.

पहिल्या शतकापासून ते अगदी अलीकडे म्हणजे मुंबई बंदराचा विकास झाल्यानंतर चौलचे महत्त्व कमी होण्यापर्यंतच्या सर्व लेखी नोंदी अशा प्रकारे इतर कोणत्याच बंदराच्या संदर्भात सापडत नाहीत. भौगोलिक महत्त्व विशद करणाऱ्या लेखकांनी भारतीय किनारपट्टीवरील मध्यवर्ती बंदर असा त्याचा विशेष उल्लेख केला आहे. असे असले तरी त्या संदर्भातील फारसे पुरातत्त्वीय काम कुणीच हाती घेतलेले नव्हते. म्हणूनच पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाने त्याकडे आपला मोर्चा वळवला. २००२ ते २००६ या कालखंडामध्ये येथे उत्खनने पार पडली आणि चौलच्या इसवीसन पूर्व कालखंडापासून ते अगदी अलीकडेपर्यंतच्या सर्व नोंदी त्याच्याशी जुळत गेल्या. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर म्हणून असलेला सर्वात मोठा

पुरावाही तज्ज्ञांच्या हाती लागला. मुंबईशी अनन्यसाधारण असा असलेला चौलचा संबंध त्यानंतर अधिक गहिरा होत गेला. आता दोनच वर्षांपूर्वी सापडलेल्या हंबीररावाच्या शिलालेखानंतर तर मुंबईचा इतिहास बदलण्याची नवीन शक्यताच निर्माण झाली आहे.

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab