महालक्ष्मी रेल्वे स्थानकाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं साहित्य सातरस्त्यावरून चिंचपोकळीला जाणारा सानेगुरुजी मार्ग आणि भायखळ्याच्या बकरी अड्डय़ावरून चिंचपोकळीला जाणारा ना. म. जोशी मार्ग यांच्या संगमावर आर्थर रोड कारागृहापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पडलं. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाची उभारणी करणाऱ्या कंत्राटदाराच्याच मदतीने लखू इराणी यांनी या मोकळ्या जागेवर तीन मजली इमारत उभी केली. लखू इराण्याची चाळ या नावानेच ही इमारत अल्पावधीतच प्रसिद्ध झाली.

लखू इराण्याची चाळ

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

लखू इराणी चाळ इंग्रजी ‘व्ही’ आद्याक्षराच्या आकाराची. या इमारतीमध्ये १८५ निवासी खोल्या आणि ६० दुकाने आहेत. दोन खोल्यांच्या घराला पुढे आणि मागे गॅलरी. घरात खेळती हवा राहावी यासाठी वायुविजनाची व्यवस्था. त्यामुळे ही चाळ पटकन मनात भरते. या चाळीच्या दर्शनी भागात एक भलंमोठ्ठं घडय़ाळ बसविण्यात आलं होतं. या घडय़ाळाच्या ठोक्यावर अनेक गिरणी कामगारांचा कारभार चालत होता. त्यामुळे घडय़ाळाची चाळ या नावाने ही चाळ कामगारवर्गात प्रसिद्ध होती.

मुंबईत एकापाठोपाठ एक कापड गिरण्या उभ्या राहिल्या आणि ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने तरुण रोजगारासाठी मुंबईत आले. गिरण्यांमध्ये नोकरी करणारे अनेक तरुण चाळीत एक खोली घेऊन एकत्र गुण्यागोविंदाने राहात होते. असेच काही तरुण लखू इराणी चाळीच्या आश्रयाला आले. तसेच गिरण्यांमध्ये नोकरी करणाऱ्या काही तरुणांनी चाळींमध्ये भाडय़ाचे घर घेतले आणि गावावरून आपला कुटुंबकबिला मुंबईत आणला. लखू इराण्याच्या चाळीत अशाच काही तरुणांनी आपली बिऱ्हाडे थाटली. सातारा, कोल्हापूर आणि कोकण पट्टय़ातील अनेक कुटुंबे लखू इराण्याच्या चाळीत गुण्यागोविंदाने नांदत होती.

भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध देशभरातून उठाव होऊ लागला होता. मुंबई त्याला अपवाद नव्हती. रोजगारानिमित्त मुंबईत आलेल्या अनेक तरुणांनी नोकरी सांभाळून देशकार्याला वाहून घेतले होते. लखू इराण्याच्या चाळीतील अनेक तरुण स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय झाले. मुंबईत झालेल्या ‘चले जाव’ चळवळीतही चाळीतील रहिवाशी हिरिरीने सहभागी झाले होते. त्यामुळे लखू इराण्याची चाळ स्वातंत्र्यसैनिकांनाही आपलीशी वाटू लागली होती. परिणामी, स्वातंत्र्यसैनिकांचे या चाळीतील येणे-जाणे वाढत गेले. क्रांतिसिंह नाना पाटील अनेक वेळा या चाळीत आले. या चाळीतील खोली क्रमांक १७५ शिवथर ग्रामस्थ मंडळाची खोली. मुंबईत नोकरी करणारे शिवथरमधील काही ग्रामस्थ या खोलीत एकत्र राहायचे. या खोलीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. या खोलीत स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक गुप्त बैठका होत. क्रांतिसिंह नाना पाटील, कॉ. बापूसाहेब जगताप यांचाही याच खोलीत राबता होता. स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ही खोली ‘स्वराज्य हॉल’ या नावाने परिचित होती. स्वातंत्र्यसैनिक आणि लखू इराण्याची चाळ यांचं एक अतूट नातं बनलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या चाळीने उत्सवच साजरा केला. मात्र या चाळीतील तरुणांनी सामाजिक कार्याचा वसा सोडलेला नाही.

मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि पुन्हा एकदा लखू इराण्याची चाळ गर्जू लागली. मुंबईचा महाराष्ट्रापासून लचका तोडला जाऊ नये यासाठी चाळीतील तरुण या लढय़ात उतरले. पुन्हा एकदा ‘स्वराज्य हॉल’ही सक्रिय झाला. लढय़ातील सक्रिय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या. याची खबर पोलिसांना मिळाली आणि या चाळीवर पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू लागले. चाळीतील तरुणांची धरपकडही सुरू केली. एकदा तर या चाळीवर पोलिसांनी बेछूट गोळीबारही केला.

स्वातंत्र्याची चळवळ असो वा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, चाळीत १९४१ च्या सुमारास वास्तव्यास आलेले गुलाबराव गणाचार्य अन्य रहिवाशांबरोबर आघाडीवर होते. देशसेवेचा वसा घेतलेले गुलाबराव गणाचार्य खटाव मिलमध्ये नोकरीला होते. मुंबईत गिरणी कामगारांचा संप झाला आणि त्यात गुलाबराव गणाचार्य सक्रिय झाले. मिल मजदूर युनियन आणि डाव्या समाजवादी गटाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. चळवळींमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. गोवा मुक्ती लढय़ातही गुलाबराव गणाचार्य यांच्यासोबत चाळीतील रहिवासी उतरले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून ते पालिकेवर निवडून गेले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही विजयी

होऊन ते पालिकेत गेले. विधानसभेच्या १९६७ झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. गुलाबराव गणाचार्य यांच्यामुळे ही चाळ चळवळी, लढे आणि राजकीय पटलावर कायम स्थान मिळवून होती.

या चाळीच्या मोकळ्या भागात बर्फाचा मोठ्ठा कारखाना होता. बाबा केरमानी यांच्या मालकीचा तो कारखाना. कालौघात लखू इराण्याची चाळ बाबा केरमानी यांच्याकडे गेली आणि ही चाळ केरमानी चाळ म्हणून ओळखली जाऊ लागली. आता ही चाळ आर. एच. मेघानी आणि सी. राज जेनांगवाला यांच्या मालकीची असून आनंद इस्टेट म्हणून ही चाळ परिचित आहे. या चाळीत समाजसेवकांची एक फळी घडली. तसेच रहिवाशांमधील कलावंतांनीही कला क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या चाळीच्या गॅलरीत अभ्यास करून उच्चशिक्षित झालेले तरुण आज निरनिराळ्या क्षेत्रात वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

prasadraokar@gmail.com