15 August 2020

News Flash

खाऊ खुशाल : ‘परदा’ जो उठ गया तो..

मांसाहारी पदार्थाच्या प्रत्येक हॉटेलमध्ये बिर्याणी मिळत असली, तरी प्रत्येक बिर्याणीची कृती वेगळी असते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत ननावरे

मांसाहारी पदार्थाच्या प्रत्येक हॉटेलमध्ये बिर्याणी मिळत असली, तरी प्रत्येक बिर्याणीची कृती वेगळी असते. अस्सल खवय्ये हा फरक अचूक हेरतात. सर्वाना आवडेल आणि पारंपरिक बाजही जपेल, अशी बिर्याणी करणं हे आव्हान असतं. बाजाराच्या बदलत्या समीकरणांमुळे हा पारंपरिक पदार्थ लोकांसमोर नावीन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्याचं कौशल्यही आत्मसात करावं लागतं. मुंबईत कफ परेड येथील नसरीन नवानी गेल्या सहा महिन्यांपासून एक वेगळा प्रयोग करत आहेत. त्यांच्या ‘मसाला-एस’ या ब्रॅण्डअंतर्गत मुंबईत पहिल्यांदाच ‘परदा बिर्याणी’ घरपोच मिळण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नसरीन नवानी याची जडणघडण मुंबईत झाली असली तरी त्यांचा वंशवृक्ष काश्मीर, अफगाणिस्तान, दुबई, पाकिस्तान इत्यादी प्रांतात पसरलेला आहे. साहजिकच अतिशय वेगळे खाद्यसंस्कार त्यांच्यावर झाले आहेत. या सर्व भागांतील पारंपरिक पदार्थ त्याच पद्धतीने तयार करण्याचं बाळकडू त्यांना फार लहाणपणापासून मिळालं आहे. आपल्यातील हे सुप्त गुण त्यांनी दुबई येथील स्वत:च्याच हॉटेलमध्ये पडताळून पाहिले. आता त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. भाऊ  एम. रोशन, नवरा अनिल नवानी आणि मुलगा रुशेल यांच्या मदतीने ‘मसाला-एस’ मुंबईकरांना घरगुती पद्धतीने तयार केलेले तरीही कधीही न चाखलेल्या चवीचे पदार्थ अतिशय माफक दरात घरपोच पोहोचवतात.

‘मसाला-एस’ हे घरगुती पद्धतीने तयार केलेल्या राजेशाही पदार्थाचे माहेरघर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इथे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चव, रूप, गंध आणि मांडणी यात वेगळेपणा आहे. परदा बिर्याणीपासून इथल्या वेगळेपणाला सुरुवात होते. मुंबईकर बिर्याणीचं हे नावही कदाचित पहिल्यांदाच ऐकत असतील आणि इथून बिर्याणी मागवल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बिर्याणी पाहतील व खातील. ‘मसाला-एस’मधून बिर्याणी मागवल्यानंतर ती नेहमीप्रमाणे प्लास्टिक किंवा अ‍ॅल्युमिनिअमच्या डब्यातून न येता केकसाठी वापरल्या जाणाऱ्या खोक्यातून येते. त्या खोक्यावरील पावाचे चित्र पाहून आपली फसगत झाली की काय अशी शंका येऊ  शकते. पण खरी गंमत इथूनच पुढे आहे. मधून किंवा बाजूने गोलाकार कापून आवरण वेगळं केल्यावर कधीही न अनुभवलेला असा मसाल्यांचा सुगंध खवय्यांना साद घालतो. वाफांमधून निरनिराळे मसाले आणि केशर, केवडा, गुलाबाच्या अर्काचा एक वेगळाच सुवास वातावरण सुगंधित करतो.

या बिर्याणीचं वैशिष्टय़ म्हणजे ती खाताना रायता किंवा करीची आवश्यकता भासणारच नाही इतक्या लाजवाबपणे भात, मांस आणि सर्व मसाले एकजीव झालेले असतात. चिकन असो वा मटण, ताजं मांसच वापरलं जातं. हे मांस शिजवण्याआधी काही तास दही आणि मसाल्यांमध्ये लपेटलेलं असतं. बिर्याणी तयार करताना दिवसभरासाठीची बिर्याणी एकत्र तयार करून ठेवली जात नाही. ती मागणीनुसारच केली जाते. ऑर्डर आल्यावर मैदा आणि गव्हाच्या पीठाचं आवरण तयार करून त्यामध्ये एकजीव केलेली बिर्याणी भरून हे आवरण विशिष्ट कालावधीसाठी भाजलं जातं. या आवरणाची खासियत म्हणजे, हे आवरण बिर्याणीच्या वजनाने अजिबात फाटत नाही आणि आवरणाच्या बिर्याणी खाण्यासाठी तुम्ही जेव्हा ते उघडता तेव्हा ते मस्त खुसखुशीत भाजलेलं आवरणही एखाद्या ग्रेव्हीसोबत खाता येतं. बिर्याणीच्या जोडीला दिला जाणारा रायताही खास असतो. यामध्ये टोमॅटोचा वापर केला जात नाही. त्यामुळे वापरण्यात आलेल्या ताज्या, घट्ट दह्य़ाची चव टिकून राहते.

बिर्याणीमध्ये मुघलाई बिर्याणी (अंडे, चिकन, मटण), लखनऊ  परदा बिर्याणी, सिंधी दम बिर्याणी, बटर चिकन बिर्याणी, हैद्राबादी प्रॉन्झ बिर्याणी, रान बिर्याणी आणि यकनी पुलाव असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय शाकाहारींसाठी मुघलई आणि परदा बिर्याणीचे व्हेज आणि पनीर असे दोन पर्यायही आहेत. पण ‘मसाला-एस’चा मेन्यू केवळ इथेच संपत नाही, तर वेगवेगळे स्टार्टर्स, ग्रेव्ही, रोल्स आणि गोड पदार्थही यात आहेत. त्यापैकी मटण गलौटी, शामी, कोहिनूर कबाब, बटर चिकन, मटण खिमा, पाया, पालक घोश्त, प्रॉन्झ करी, गुलाब खीर आणि शाही तुकडा यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘मसाला-एस’ यांचे पदार्थ सध्या

स्कूट्सी आणि स्विगी या ऑनलाइन फूड अ‍ॅपवरून मागवता येतात. दक्षिण मुंबई परिसरात जवळपास सगळीकडे पदार्थ पोहोचविण्याची व्यवस्था ते करतात.

मसाला-एस : मॉम मेड मिल

* कुठे- कुलाबा

* कधी- सोमवार ते रविवार सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.

ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क साधा – ९००४८१९७७७ / ९८९२९००७७७

nanawareprashant@gmail.com

@nprashant

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2018 1:25 am

Web Title: article about parada biryani
Next Stories
1 मी स्पायडरमॅन आहे का? न्यायाधीशांना उर्मट उत्तर देणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात
2 पवार आजोबांनी असा पुरवला नातीचा हट्ट
3 प्लास्टिक पिशव्यांच्या तुटवड्याची दूध वितरकांची तक्रार खोटी : रामदास कदम
Just Now!
X