प्रसाद रावकर

गिरण्यांच्या परिसरात गिरणगाव आकार घेऊ लागले तसतसे गिरणी कामगारांच्या निवाऱ्यासाठी तेथेच चाळी उभ्या राहू लागल्या. यातील प्रत्येक चाळ हे जणू एक कुटुंबच असे. असेच एक कुटुंब म्हणजे रुस्तम चाळ.

लोअर परळ भागातील आताच्या गणपतराव कदम मार्गावर १९२१ च्या सुमारास एक तीन मजली इमारत उभी राहिली. बाई खैरमानी इराणी यांनी ही इमारत बांधली. मोठय़ा प्रमाणावर सागाच्या लाकडाचा वापर करून ही इमारत उभी करण्यात आली. प्रत्येक मजल्यावर २० खोल्या. अशा ६० खोल्या आणि तळमजल्यावर १० दुकाने.  हळू हळू गिरणी कामगारांच्या वास्तव्याने ही चाळ गजबजून गेली. शैरमानी इराणी यांनी पती रुस्तम यांचे नाव इमारतीला दिले आणि ही इमारत रुस्तम बिल्डिंग नावाने या भागात परिचित झाली.

तो पारतंत्र्याचा काळ होता. मुंबईसह देशभरात स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक सक्रिय होत होते. रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासीही स्वातंत्र्य चळवळीमुळे भारावून गेले होते. चाळीतील रहिवासी गोपाळ मांजरेकर चळवळींमध्ये सक्रिय होते. गोपाळ मांजरेकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन चाळीतील काही तरुणही जमेल तसा चळवळींना हातभार लावत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशभरात एकच जल्लोष झाला. रुस्तम बिल्डिंगनेही स्वातंत्र्योत्सव जल्लोषात साजरा केला. स्वातंत्र्योत्तर काळात गोपाळ मांजरेकर यांनी समाजसेवेचा वसा घेतला. चाळीतील रहिवासी असो वा परिसरातील नागरिक, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत करण्यासाठी ते धाव घेत. लोअर परळ भागातील भौगोलिक स्थितीचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. जलवाहिन्या, मलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे कसे विस्तारले आहे याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे या संदर्भातील कोणतीही समस्या निर्माण झाली की या भागातील रहिवासीच नव्हे, तर आमदार, नगरसेवक आणि चक्क पालिका अधिकारीही गोपाळ मांजरेकरांच्या घराकडे धाव घेत. त्यामुळे लोअर परळमधील नागरिकांसाठी रुस्तम बिल्डिंग आणि मांजरेकरांशी एक अतूट नाते बनले होते. एडवर्ड मिलमध्ये नोकरीला असलेले गोपाळ मांजरेकर कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. त्या काळी गिरणगाव कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. मांजरेकरही याच विचारसरणीत सामील झाले. कालौघात शिवसेनेचा जन्म झाला आणि त्यांनी शिवसेनेला आपलेसे केले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून माजरेकरांनी चाळीतील रहिवाशांना वृक्षारोपणाची गोडी लावली. इतकेच नव्हे तर चाळीच्या आसपास मांजरेकरांनी वृक्षारोपण केलेले वृक्ष आजही त्यांची आठवण करून देतात.

गिरणगावातील अन्य चाळींप्रमाणेच रुस्तम बिल्डिंगचा कारभारही गिरण्यांच्या भोंग्यावरच सुरू असायचा. रुस्तम बिल्डिंगमधील ६० बिऱ्हाडे एक कुटुंब म्हणून नांदत होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि गोपाळ मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली चाळीतील काही रहिवाशांनी चळवळीत उडी घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा आवाज बुलंद करणाऱ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली चाळीतील काही तरुणही सक्रिय झाले होते. स्वातंत्र लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घडलेल्या घडामोडींना चाळीतील जुने रहिवासी आजही उजाळा देण्यात हरवून जातात.

निवांत वेळ मिळाल्यानंतर चाळीतील रहिवासी गप्पा-टप्पा, बैठे खेळ यात रमून जात असत. चाळकरी मोठे उत्सवप्रिय. चाळीतील रहिवासी महादेव कांदळगावकर एक उत्तम चित्रकार होते. प्रत्येक उत्सवादरम्यान ते चाळीतील मोकळ्या जागेतील भिंतीवर देवदेवतांची चित्रे, देखावे रेखाटायचे. १९७८ सालच्या गणेशोत्सवापूर्वी त्यांनी चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील जिन्याजवळील भिंतीवर गणपतीचे चित्र रेखाटले आणि चाळकरी भारावून गेले. रहिवाशांनी या चित्रातील गणरायाची पूजा केली आणि चाळीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दरवर्षी हा नित्यनियमच बनून गेला. आजतागायत गणपतीची मूर्ती न आणता केवळ भिंतीवर गणरायाचे चित्र रेखाटून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा रहिवाशांनी जपली आहे. भिंतीवर गणरायाचे चित्र रेखाटणारे महादेव कांदळगावकर आज हयात नाहीत. पण कांदळगावकर यांच्या पश्चात सुधीर सावंत यांनी हा वसा घेतला. पुढे शैलेश वारंग यांनी भिंतीवर गणरायाचे चित्र रेखाटण्याची जबाबदारी लीलया पेलली. आता सुधीर सावंत यांचे पुत्र शार्दूल सावंत ही जबाबदारी सांभाळत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिंतीवरील गणरायाचे चित्र नारळाच्या पाण्याने धुतले जाते. चित्र धुतल्यानंतर परातीत साठणारे पाणी झाडांना घालून गणेशोत्सवाची सांगता करण्यात येते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवे कार्यकर्ते घडविण्याचे कार्य चाळीत अविरतपणे सुरू आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव म्हणून चाळीचा गणेशोत्सव परिचित आहे. अनेक पारितोषिकेही गणेशोत्सवाला मिळाली आहेत. चाळीत साजरी होणारी प्रदूषणमुक्त होळीनेही समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. फटाके खरेदी न करता त्यासाठी लागणारे पैसे जमवून अनाथाश्रम, अंध मुलांना मदतीचा हात देण्यात येतो. वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण अशा कार्यक्रमांमध्ये चाळीतील तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असतात हे विशेष. प्रख्यात ढोलकीवादक आनंद पांचाळ, व्हायोलिन वादक चंद्रकांत बाईत यासारखे काही कलावंत या चाळीने समाजाला दिले. कलागुण जोपासले जावे, समाजसेवक घडावे यांसाठी लहानपणापासून चाळीतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा रहिवाशांनी जोपासली आहे. म्हणूनच कला उपासकांची चाळ असा उल्लेख रुस्तम बिल्डिंगचा केला तर त्यात वावगे ठरणार नाही.

डागडुजीनंतर भक्कमपणे उभी

काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात खैरमानी इराणी अपयशी ठरल्या. त्यामुळे १९८४ साली त्यांना ही इमारत गमवावी लागली. त्यानंतरच्या काळात या इमारतीची देखभाल सुधीर हेंद्रे करीत होते. मात्र कर भरणा न झाल्यामुळे १९९६ मध्ये या इमारतीचा लिलाव झाला.

अशोक मस्तकार यांनी ही इमारत लिलावात घेतली. आता तेच या इमारतीचे मालक आहेत. मात्र आजही चाळ रुस्तम बिल्डिंग या नावानेच ओळखली जाते. कालपरत्वे ८० च्या दशकाच्या अखेरीस या इमारतीची अवस्था बिकट बनली होती. तब्बल ८०० टेकूंच्या आधाराने ही चाळ कशीबशी उभी होती. १९९० मध्ये

चाळीची दुरुस्ती करण्यात आली. मात्र चाळीची दुरुस्ती कशा पद्धतीने करायची, बांधकाम साहित्य किती प्रमाणात आणि कोणते वापरायचे याचा पूर्ण अभ्यास चाळीतील रहिवाशांनी केला आणि कंत्राटदाराला सूचना करून रहिवाशांनी आपल्या देखरेखीखाली दुरुस्ती करून घेतली. आज ही इमारत भक्कमपणे उभी आहे.

prasadraokar@gmail.com