31 October 2020

News Flash

खाऊ खुशाल : ‘फॅन्सी’ पदार्थाचा प्रणेता

ओमप्रकाश यांच्यानंतर सत्तरच्या दशकात त्यांचा मुलगा अरुण यांनी खऱ्या अर्थाने 'बॅचलर्स'चा विस्तार केला.

एकेकाळी सार्वजनिक ठिकाणच्या पदार्थाना ‘रस्त्यावरचे पदार्थ’ म्हणूनच हिणवलं जायचं किंवा खाल्लेच तर ती केवळ चैन मानली जायची. ज्यावेळी चौपाटीवर केवळ नारळपाणी मिळायचं त्याकाळी म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात गाझियाबाद येथून मुंबईत दाखल झालेल्या ओमप्रकाश अगरवाल या तरुणाने गिरगाव चौपाटीवर वेगवेगळ्या फळांचे तुकडे करून एकाच प्लेटमध्ये विकण्याची नामी शक्कल लढवली. त्याच्याच जोडीला फळांचे ज्युसही तो विकत असे. ज्या काळात तरुणांचा संसार विशीच्या आतच बहरत असे, त्यावेळी ओमप्रकाश वयाच्या सत्ताविसाव्या वर्षांपर्यंत ब्रह्मचारीच होता. त्यावरूनच त्यांचे मित्र त्यांना ‘ब्रह्मचारी ज्युसवाले’ म्हणत. मग हळूहळू त्यांनी सुरू केलेला व्यवसायदेखील याच नावाने ओळखला जाऊ  लागला. पण मग इंग्रजाळलेल्या मुंबईत १९४०च्या दरम्यान ब्रह्मचारीचं ‘बॅचलर्स’ असं इंग्रजी नामांतरण झालं आणि आज गेली ८७ वर्षे ते खवय्यांना अचंबित करीत आहेत. अचंबित यासाठी कारण मुंबईत आजघडीला रस्त्यावर पॉप्युलर असणाऱ्या बहुतांश फॅन्सी पदार्थाच्या विक्रीची सुरुवात ‘बॅचर्ल्स’ने केली आहे, असा त्यांचा दावा आहे.

ओमप्रकाश यांच्यानंतर सत्तरच्या दशकात त्यांचा मुलगा अरुण यांनी खऱ्या अर्थाने ‘बॅचलर्स’चा विस्तार केला. आणि सहा वर्षांपूर्वी आदित्यच्या रूपाने तिसरी पिढी खवय्ये मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. गिरगाव चौपाटीसमोरील रेल्वेलाईनला लागून असलेल्या फुटपाथवरील ‘बॅचलर्स’ मुंबईकरांच्या सर्वाधिक परिचयाचं असलं तरी आता मुंबईत विविध ठिकाणी बॅचलर्सच्या शाखा सुरू झाल्या आहेत.

‘बॅचलर्स’चं वैशिष्टय़ म्हणजे १९३० साली सुरू झालेली फ्रूट प्लेट अजूनही येथे मिळते. केळं, मोसंबी, कलिंगड, अननस, चिकू, पपई या फळांच्या सोबतीला आता अंजिर, किवी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी यांचादेखील त्यात समावेश असतो. अतिशय चांगल्या प्रतीची फळं यामध्ये वापरली जातात. तसंच फ्रूट प्लेट इतकी मोठी असते की ती खाल्लात तर तुमचं जेवण होऊ  शकतं. येथे मिल्कशेक १९५० मध्ये मिळायला सुरुवात झाली.

सत्तरच्या आसपास स्नॅक्सचे पदार्थ म्हणजेच पिझ्झा, सँडविच सुरू झाले. त्यावेळेस पावभाजी आणि छोले भटुरेसुद्धा मिळत असत. गेलॉर्डसारख्या फॅन्सी हॉटेलमध्ये लोक पिझ्झा, सँडविच खायला जात असत. तेव्हा आम्ही ते रस्त्यावर विकायला सुरुवात केली, असं आदित्य सांगतात. १९८० साली ‘बॅचलर्सने स्वत:चं आइसक्रीम तयार करायला आणि विक्रीला सुरुवात केली. आइसक्रीम बनवण्याच्या मशीनही त्यांनी स्वत:च्या गरजेप्रमाणे तयार करून घेतलेल्या आहेत. ताज्या फळांचे आणि इतर मिळून तीसेक फ्लेवर्सची आइसक्रीम येथे बनवली जातात.

त्याच्यापाठोपाठ क्रीमची कॉन्सेप्ट १९८० च्या दशकात ‘बॅचलर्स’ने सामान्यांच्या आवाक्यात आणली. ज्युसच्या मेन्यूमध्ये टंग ट्विस्टर हा इथला वेगळा ज्युस आहे. जिभेवर प्रत्येक चव वेगवेगळ्या ठिकाणी जाणवते. त्यादृष्टीने वैज्ञानिकरीत्या हा ज्युस तयार केलेला आहे. यामध्ये तिखट, मसालेदार, मिंट, चॉकलेट, व्हॅनिलाचा गोडवा इतक्या चवी एकत्रित करण्यात आल्यात. दूध आणि मीठ एकत्रित जात नाही. त्यामुळे त्याच्यासोबत बटाटय़ाचे वेफर्स देण्याची पद्धत आहे. एक सीप घेतल्यावर वेफर्स खाल्ल्याने तुमच्या जिभेचं पॅलेच क्लीअर होतं आणि तुमची जीभ पुन्हा नवीन सीपसाठी तयार होते. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा ज्युस सर्वाधिक पॉप्युलर आहे.

मुंबईत चिली आणि अद्रक आइसक्रीमची सुरुवात बॅचलर्सने केली. १९८७ ला चिली आणि १९९० ला अद्रक आइसक्रीम सुरू झालं. याहूतर्फे २०१३ मध्ये इथल्या क्लासिक चॉकलेट मिल्कशेकला ‘बेस्ट चॉकलेट मिल्कशेक इन द वर्ल्ड’ हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. हा रिअल चॉकलेटपासून तयार होतो. ज्यामध्ये कोको पावडर, चॉकलेट सॉस, सिरप, मेल्टिंग चॉकलेट असतं. ड्रिंक, सीप आणि इट चॉकलेट या प्रकारात तो मोडतो.

फालुदा लच्छेदार रबडीपासून तयार केला जातो. त्यामध्ये दूध वापरत नाहीत. इथे वर्षभर थंडाई मिळते. शिवाय थंडाई मिल्कशेक आणि थंडाई आइसक्रीम पण आहेच. फ्युजन शेक्समध्ये दोन गोष्टी ब्लेंड केल्या जात नाहीत. पहिल्यांदा दोन वेगळे ज्युस बनवले जातात आणि नंतर मिक्स करतात. त्यामुळे दोन्ही ज्युसची चव, रंग आणि पोत टिकून राहतो. महाराजा हा फुल्ली लोडेड डेझर्ट आहे. ज्युस, फ्रुट्स, आइसक्रीम आणि क्रीम असं सर्व काही यामध्ये असतं.

सँडविचेस, रोल्स आणि पिझ्झाही आहेत. सुरुवातीला पिझ्झाचा ब्रेड जाडा असायचा. आता तो थोडा पातळ करण्यात आल्याने मस्त क्रिस्पी लागतो. व्रॅपसुल्स हा इथला नवीन रॅप आहे. ते झिरो फिगरवाले नाहीएत तर मस्तपैकी भरगच्च असतात. जुन्या मुंबईचा साक्षीदार आणि अनेक फॅन्सी पदार्थाचा प्रणेता असलेल्या ‘बॅचलर्स’ला एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवी.

बॅचलर्स

  • कुठे ?: ६, एलफिन्स्टन हाऊस, १७ मर्झबान रोड, स्टर्लिंग सिनेमाच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० ००१
  • कधी ?: सोमवार ते रविवार सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 4:13 am

Web Title: article on bachelorrs juice center
Next Stories
1 इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडली, जेजे रूग्णालयात केले दाखल
2 ‘आयपीएल’साठी पाणी विकत घेणार का?
3 दलितवस्तीत दोन दिवस रहा-मोदींचे खासदारांना निर्देश
Just Now!
X