पाळीव प्राण्यांमध्ये श्वानांपाठोपाठ मांजरींचा समावेश होतो. अनेक कुटुंबांत मांजरी पाळल्या जातात. त्या मांजरांना कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणेच लळा लावला जातो. देशी मांजरांच्या पालनासोबत सध्या मांजरप्रेमींच्या घरात पर्शियन मांजर आणि हिमालयीन मांजर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. हिमालयीन मांजराचे ब्रीड सध्या प्राणीप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. संपूर्ण शरीरावर पांढरे केस आणि नाक, शेपटी, पाय आणि तोंडाकडच्या भागावर असलेला काळा रंग हिमालयीन मांजराची ओळख करून देतो. बहुतांश पर्शियन मांजरांच्या ब्रीडप्रमाणेच हिमालयीन मांजरांचे दिसणे आहे. युरोपात या मांजराचा इतिहास आढळतो. युरोपातील थंड वातावरणात हिमालयीन मांजरी अधिक उत्तमरीत्या राहू शकतात. या मांजरांचे विशेष म्हणजे मादय़ा अधिक प्रमाणात उत्साही असतात तर हिमालयीन बोक्यांचा स्वभाव काहीसा आळशी असतो. हिमालयीन मांजराच्या शरीरावर असणाऱ्या तीन काळ्या रंगांच्या खुणांमुळे या मांजरांना हिमालयीन नाव पडल्याचे सांगण्यात येते. संपूर्ण शरीरावर पांढरे मोठे केस हे या मांजरांचे शारीरिक वैशिष्टय़ आहे. काही हिमालयीन मांजरांच्या शरीरावर लांब तर काही मांजरांच्या शरीरावर लहान केस आढळतात.

सतत ग्रूमिंगची आवश्यकता

हिमालयीन मांजरांच्या संपूर्ण शरीरावर लांब केस असल्याने दिवसातून तीन वेळा या मांजराचे ग्रूमिंग करणे आवश्यक आहे. केस सोडवणे, शरीरावरून हात फिरवणे यासारखी काळजी या मांजराची घ्यावी लागते. केसांमध्ये गुंता झाल्यास मांजराला आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे शरीरावरील केस गळत असल्यास केसांचा गुंता (फर बॉल) पोटात जाऊन या मांजराला आजार उद्भवू शकतात. त्यासाठी घरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

आहार आणि आरोग्य महत्त्वाचे

हिमालयीन मांजराचा मांसाहार असला तरी काही हिमालयीन मांजरांच्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे खाण्याच्या सवयी असतात. काही मांजरांना दूध आवडत नसल्यास इतर पौष्टिक आहाराकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक असते. काही मांजरांच्या प्रकृतीनुसार दूध वज्र्य करावे लागते. अलीकडे योग्य प्रमाणात दिले जाणारे तयार अन्न या मांजरांना देऊ शकतो. काही मांजरांना पॉलिस्टिक किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी मांजरांचे केस त्यांच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे.

हुशार आणि चपळ

हिमालयीन मांजरी इतर मांजरांच्या तुलनेत हुशार असल्याचे निदर्शनास येते. स्वभावाने अतिशय प्रेमळ असल्या तरी काही प्रमाणात या मांजरांना राग असतो. सतत खेळत राहणे ही या मांजरांची आवडती कृती आहे. पर्शियन मांजराच्या तुलनेत हिमालयन मांजरी अधिक चपळ असतात.

शारीरिक सौंदर्य

शरीरावर संपूर्ण केस असल्याने, आकाराने मध्यम असलेल्या हिमालयन मांजरी पाहताक्षणीच पसंतीस पडतात. गोलाकार शरीरयष्टी आणि चपट चेहरा या मांजराच्या शारीरिक सौंदर्यात भर घालतात. शरीरावर असणारे संपूर्ण केस आणि गोंडस चेहरा यामुळे हिमालयीन मांजर अधिक भावतात. मूळचे युरोपातील असल्याने थंड वातावरणाची सवय असलेल्या हिमालयन मांजरांना भारतातील वातावरणाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यासाठी हिमालयन मांजर पाळणाऱ्या पालकांनी वातानुकूलित खोलीत आपल्या मांजराला ठेवणे आवश्यक असते. गरम वातावरणाचा या मांजरांना त्रास होत असल्याने या मांजरी थंड वातावरणाच्या शोधात असतात.