वर्षांरंभासोबत आणखी एका महत्त्वाच्या वस्तूचे घरोघरी अगदी न चुकता आगमन होत असते. भिंतीवर टांगलेली, पर्समध्ये छोटय़ा स्वरूपात असलेली, संगणकाच्या शेजारी हवी असलेली ही वस्तू म्हणजे दिनदर्शिका. आता तर मोबाइलवरच ‘प्लॅनर’सह डिजिटल दिनदर्शिका उपलब्ध झाल्या आहेत. तरीही आपापल्या संस्कृतीनुसार त्या त्या दिवसाचे तिथीमाहात्म्य सांगणाऱ्या छापील दिनदर्शिकांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व कमी झालेले नाही. खरे तर दिवस एकच.. त्याचे महात्म्यही सारखेच.. तरीही निर्मितीमध्ये वैविध्य जपून ‘आपला’ म्हणून असा ग्राहक कालनिर्णय, श्री महालक्ष्मी, आनंदी वास्तू आदी दिनदर्शिकांनी निर्माण केला आहे. परंतु, पारंपरिक पद्धतीने निघणाऱ्या या दिनदर्शिकांबरोबरच अनेक प्रयोगशील व विविध विषयांची माहिती देणाऱ्या दिनदर्शिकाही दरवर्षी निघत असतात. दिनदर्शिकांच्या निर्मितीतील या ‘हटके’ प्रयोगांविषयी..

मुलांसाठीही दिनदर्शिका
दिनदर्शिका हा प्रकार प्रौढांबरोबरच बालकांच्याही औत्सुक्याचा भाग बनावा या विचारातून ‘सहित’ या संस्थेने खास बालकांसाठी ‘बालदिनदर्शिकी’ तयार केली आहे. खेळकरपणा, खोडकरपणा, उत्साह ही बालविश्वाच्या भावजीवनाची वैशिष्टय़े असतात. त्याच खेळकरपणा, उत्साहाबरोबरच लहान मुला-मुलींना वाचनाकडे उद्युक्त करण्यासाठी ज्येष्ठ बालसाहित्यकार अनंत भावे व दिनदर्शिकेचे संपादक किशोर शिंदे हे गेली काही वर्षे सातत्याने बालदिनदर्शिकेचा प्रयोग करत आहेत.
यंदाच्या दिनदर्शिकेत अनंत भावे यांच्या बारा बालकवितांबरोबरच लहान मुलांना वाचण्यासाठी अनेक उत्तम लेखकांच्या पुस्तकांची नावेही दिली आहेत. रंगीबेरंगी चित्रांच्या आणि कवितांच्या माध्यमातून ही बालदिनदर्शिका बालकांना वाचनाचे महत्त्वही पटवून देते. याशिवाय मोठय़ांसाठी ‘सहित’ने ‘काव्यदर्शिका’ ही मराठी कवितेतील ‘गझल’ या काव्यप्रकाराचा अंतर्भाव असणाऱ्या दिनदर्शिकेचीही निर्मिती केली आहे. यात बारा मान्यवर मराठी गझलकारांच्या गझली व त्यांची छायाचित्रेही असणार आहेत. यात सुरेश भट, ईलाही जमादार, प्रदीप निफाडकर, रमण रणदिवे आदींच्या गझल वाचायला मिळणार आहेत. ‘काव्यरसिक काव्यदर्शिकेला उत्तम प्रतिसाद देतात. आमच्या या दोन्ही दिनदर्शिकांना महाराष्ट्रभरातून चांगली मागणी असून त्यांचा खप पाच हजार प्रतींच्याही वर आहे. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हा प्रयोग करत असून या प्रयत्नाचे ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनीही कौतुक केले आहे,’ असे ‘सहित’च्या शिंदे यांनी सांगितले.
विज्ञान प्रसारासाठी..
विज्ञानाची माहिती देण्याबरोबरच ‘समाजा’च्या विविध पैलूंचा समावेश ‘लोकविज्ञान’ या दिनदर्शिकेमध्ये केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य परिस्थिती समजून घेता येते व तार्किक पातळीवर योग्य उत्तरे देता येतात. नेमके हेच आमच्या दिनदर्शिकेचे उद्दिष्ट आहे, असे ‘लोकविज्ञान’ दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा श्रीकृष्ण गुट्टीकर सांगतात. पुस्तकातून साध्य होणारे उद्दिष्ट एखादी दिनदर्शिकाही पूर्ण करू शकते व तिच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम करता येते. म्हणून ‘या दिनदर्शिकेतील सर्व माहिती पुराव्यावर आधारित आहे. माहितीची अचूकता जपण्याचा आमचा प्रयत्न असतो,’ असे गुट्टीकर यांनी सांगितले.
या वर्षीच्या ‘लोकविज्ञान’ दिनदर्शिकेत क्रोस्सेल अल्ब्रेख्त या जर्मन जीवरसायन शास्त्रज्ञाची माहिती देणारा लेख आहे. त्याशिवाय भारतातील निरनिराळ्या जातींतील १२ बेडूक, सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती सांगणारा लेख आह्े. गर्भसंस्कारातील वैज्ञानिक भाग, साथ डेंग्यूची व घबराटीची, विज्ञान संशोधन म्हणजे मानवी अस्तित्वाची ओळख, प्राचीन भारतीय खगोलशास्त्र असे विविध लेख समाविष्ट आहेत. याशिवाय १२ शास्त्रज्ञांचा शोध व त्यांच्या कार्याची माहिती देणारा प्रेरणादायी लेखही वाचकांना वाचावयास मिळणार आहे.
गेली २८ वर्षे सातत्याने वयाच्या ८१व्या वर्षीदेखील श्रीकृष्ण गुट्टीकर लोकविज्ञान दिनदर्शिका काढत आहे. मुंबईपेक्षाही बाहेरील जिल्ह्य़ांमध्ये ‘लोकविज्ञान’चा खप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला, वर्धा, इंचलकरंजी येथील शाळांमधून लोकविज्ञान दिनदर्शिकेची मोठी मागणी आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमात या दिनदर्शिकेतील माहितीचा उपयोग करून घेत असतात, असेही श्रीकृष्ण गुट्टीकर यांनी त्यांना आलेल्या शिक्षकांच्या प्रतिक्रियेवरून नमूद केले. या वर्षी ७५०० दिनदर्शिकेची मागणी आली असून पुढच्या वर्षी भौतिकशास्त्रावर आधारित लेख असणार आहे. उर्वरित पान ४ वर

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

 

शहरांची दिनदर्शिका
‘शहर’ केंद्रस्थानी ठेवून ‘आम्ही मुंबईकर’ ही दिनदर्शिका काढण्याचा प्रयोग चार वर्षांपूर्वी झाला. आता हा प्रयोग पुणे, नाशिक असा प्रवास करतो आहे. ‘आम्ही मुंबईकर’ या दिनदर्शिकेचे मुंबईव्यतिरिक्त इतर शहरांमध्येदेखील आकर्षण वाढत असल्याचे या दिनदर्शिकेचे राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.
या वर्षी ‘आम्ही मुंबईकर’ या दिनदर्शिकेत १९५० ते २०१५ पर्यंत प्रत्येक दशकात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश केला आहे. यामध्ये १९५० पासून अनुक्रमे नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, नूतन, हेमा मालिनी, रेखा, झीनत अमान, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय, प्रियांका चोप्रा, विद्या बालन या लोकप्रिय अभिनेत्रींचा समावेश करण्यात आला आहे. ललिता ताह्मणे, दिलीप ठाकूर, कल्पना राणे यांसारख्यांनी या अभिनेत्रींबद्दल लेख लिहिले आहे. मुंबईतील महत्त्वांच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून दिनदर्शिकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणाऱ्या ‘आम्ही मुंबईकर’ या दिनदर्शिकेचे हे चवथे वर्ष आहे.
या वर्षीचा खप ३ ते ४ लाखांपर्यंत पोहोचला असून २१ हजार ‘मी नाशिककर’च्या प्रती विकल्या आहेत, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. ‘आम्ही मुबंईकर’ या दिनदर्शिकेसोबत दुसऱ्या शहरातदेखील या प्रकारची दिनदर्शिका काढतात. मागील वर्षी ‘मी पुणेकर’ ही दिनदर्शिका काढण्यात आली होती, तर या वर्षी ‘मी नाशिककर’ ही व्यक्तिविशेष दिनदर्शिका काढण्यात आली आहे. मी नाशिककर या दिनदर्शिकेत नाशिक शहरात राहणाऱ्या १२ उत्तुंग व्यक्तींची ओळख करून देणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

अंधांसाठी ‘शुभं करोती’
अंध विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखा, सण व सुट्टय़ांच्या माहितीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ‘शुभं करोती’ या मराठीतील पहिल्या ब्रेल लिपीतील दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. जयंत चिपळूणकर हे गेली आठ वर्षे अंध विद्यार्थ्यांसाठी ही दिनदर्शिका तयार करत आहेत. दर वर्षी वेगवेगळ्या विषयांवर ही दिनदर्शिका काढली जाते. या वर्षी यात ‘योगासन’ या विषयावर माहिती देण्यात आली आहे. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शालेय मुलांच्या सोयीसाठी जून ते मे अशी या दिनदर्शितेची रचना करण्यात येते. अंध मुलांच्या राज्यभरातल्या अनेक शाळांना या दिनदर्शिकेच्या प्रती भेट म्हणून दिल्या जातात.