28 February 2021

News Flash

आम्ही मुंबईकर : व्रतस्थ चाळ..

कोकणपट्टय़ातून मुंबईत आलेले बहुतांश ब्राह्मण मंडळी गोरेगावकर लेनमध्ये स्थिरावले.

गोरेगावकर लेन

स्वातंत्र्यपूर्व मुंबईच्या जडणघडणीत केवळ ब्रिटिशांचाच नव्हे तर काही भारतीयांचाही हातभार लागत होता. स्थानिक कुशल कारागिरांना व्यवसायासाठी संधी चालत आली होती. बांधकाम आणि त्याच्याशी निगडित अनेक कामे करणारे मोठे कंत्राटदार निर्माण झाले. त्यापैकीच एक म्हणजे हरिश्चंद्र गोरेगावकर. आपल्याला हव्या असलेल्या भूखंडावर ब्रिटिशांनी वास्तू उभारण्याचा सपाटा लावला होता. त्याच वेळी नको असलेले भूखंड भाडेपट्टय़ाने देऊन निधी संकलन सुरू केले होते. गिरगावच्या समुद्रकिनाऱ्यावरचा एक भूखंड हरिश्चंद्र गोरेगावकर यांनी १८६३ च्या सुमारास भाडेपट्टय़ाने घेतला. हळूहळू त्यांनी या भूखंडावर सहा इमारती उभ्या केल्या. साधारण १९०५ ते १९१० या काळात या चाळी उभ्या राहिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दोन चाळी तीन मजली आणि चार चाळी दोन मजली अशा एका रांगेत उभ्या असलेल्या एकूण सहा चाळींमध्ये सुमारे १९० ते २०० खोल्या. गिरगाव चर्चकडून चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सेंट्रल प्लाझा चित्रपटगृहाला लागून एक छोटी गल्ली दिसते. तीच गोरेगावकर लेन.

कोकणपट्टय़ातून मुंबईत आलेले बहुतांश ब्राह्मण मंडळी गोरेगावकर लेनमध्ये स्थिरावले. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांबद्दल भारतवासीयांच्या मनात असंतोष खदखदत होता. ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सुरू असलेल्या चळवळींमध्ये अनेक तरुण सहभागी होत होते. गिरगाव परिसरात प्रभात फेऱ्या काढल्या जात होत्या. त्यामध्येही गोरेगावकर लेनमधील तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. गोरेगावकर लेनमधील तरुणही त्या वेळच्या नेते मंडळींच्या संपर्कात आले होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या चाळींमध्ये येऊन गेले होते. तर गोरेगावकर लेनमध्ये झालेल्या भगिनी निवेदिता यांच्या भाषणाच्या आठवणींना आजही काही रहिवाशी त्या काळात हरवून जातात. हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे गाडगे महाराजही गोरेगावकर लेनमध्ये येऊन गेले होते. या सर्व दिग्गज मंडळींशी संबंध असलेले काही जण गोरेगावकर लेनमध्ये वास्तव्याला होते. ज्येष्ठ समाजसेवक साने गुरुजी यांचे बंधू या चाळीत वास्तव्यास होते. त्यामुळे अधूनमधून साने गुरुजी या चाळीत येत असत. समाजसुधारक, पत्रकार, लेखक समतानंद अनंत हरी गद्रे याच चाळीतील रहिवाशी. स्पृश्य-अस्पृश्यामधील दरी दूर करण्यासाठी समतानंद अनंत हरी गद्रे यांनी चळवळ उभी केली. या चळवळीत पंडित पानसेशास्त्री, र. धों. कर्वे, स्वा. विनायक दामोदर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी आदी मान्यवरांनी त्यांना साथ दिली. दलित समाजातील दाम्पत्याला सत्यनारायणाच्या पुजेला बसवून एक मोठी चळवळ त्यांनी सुरू केली. सत्यनारायणाला रव्याच्या शिऱ्याऐवजी झुणका-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची नवी प्रथा सुरू केली. समतानंद अनंत हरी गद्रे म्हणजे गोरेगावकर लेनमधील रहिवाशांमधील एक वैभवच मानले जाते. वैविध्यपूर्ण साहित्याचा ठेवा वाचनप्रेमींपर्यंत पोहोचविणारे परचुरे प्रकाशन आणि मौज प्रकाशन याची कार्यालये याच गोरेगावकर लेनमध्ये स्थिरावली आहेत. त्यामुळे साहित्यिकांचा येथे राबता आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेले अनेक स्वयंसेवक या चाळीत वास्तव्यास आहेत. आणिबाणीच्या काळातही गोरेगावकर लेन स्वयंसेवकांसाठी आधार बनली होती.

स्वातंत्र्य चळवळ असो वा समाजसुधारणा गोरेगावकर लेनमधील रहिवाशी नेहमीच पुढे राहिले आहेत. आजची पिढीही याच मार्गाने पुढे जात आहे. चाळीतील घराघरांतून रद्दी गोळा करून त्यातून उभा राहणारा निधी वनवासी कल्याण आश्रमापर्यंत पोहोचविण्याचे कार्य तरुण मंडळी करीत आहेत.

पारतंत्र्यकाळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यापासून प्रेरणा घेऊन काही रहिवाशांनी गोरेगावकर लेनमध्येही गणेशोत्सव सुरू केला. मात्र भाद्रपद महिन्यात घरोघरी गणपतीची मूर्ती आणून पूजा करण्यात येत होती. तसेच पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात अडथळा येत होता. त्यामुळे सर्वानुमते भाद्रपदाऐवजी माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आणि १९४६ मध्ये गोरेगावकर लेनमध्ये माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले. त्याची झुळूक गोरेगावकर लेनमधील चाळींनाही लागली. चाळ क्रमांक ४ मधील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मात्र विकासकाच्या ताब्यात इमारत देण्याऐवजी रहिवाशांनी एकत्र येऊन चाळीचा पुनर्विकास करण्यावर एकमत झाले आणि रहिवाशी कामाला लागले. संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या मिळविण्यापासून इमारत उभारण्यापर्यंत सर्व कामे रहिवाशांनीचे केली.

उत्तम दर्जाचे बांधकाम असलेला टॉवर गोरेगावकर लेनमध्ये उभा राहिला आहे. रहिवाशांनी बांधलेला हा टॉवर मुंबईकरांसाठी आदर्श ठरला आहे. पारतंत्र्यकाळ असो वा स्वातंत्र्योत्तर गोरेगावकर लेनमधील रहिवाशांनी समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचेच काम आतापर्यंत केले आहे. हेच व्रत घेऊन पुढची पिढी मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे या चाळीला व्रतस्थ चाळ म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

prasadraokar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:47 am

Web Title: article on goregaonkar lane
Next Stories
1 खाऊ खुशाल : चमचमीत दाबेली
2 मुंबईत दारासमोरुन बकऱ्या चोरल्या, माहिती देणाऱ्याला १ लाखाचे इनाम
3 दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊसला आग, जिवित हानी नाही
Just Now!
X