रस्त्यालगत रद्दीच्या दुकानासमोर पुस्तके रचलेली. त्यात विश्वकोश, याशिवाय जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके. दुसऱ्या बाजूला मोटार गाडय़ांचे सुटे भाग विखुरलेले. त्या दुकानातच मोटार गाडय़ांच्या वस्तूंवरील ग्रीसने काळाकुट्ट झालेला शर्ट घातलेला एक तरुण. त्या रस्त्याच्या पुढे डाव्या दिशेला हिंदी चित्रपटांचे मोठ-मोठे भित्तीचित्र. एक परदेशी तरुणी या भित्तीचित्राकडे निरखून पाहत बसलेली. हे चित्र आहे दक्षिण मुंबईतील एका बाजाराचे. काही दशकांपूर्वी आठवडी बाजार म्हणून सुरू झालेल्या याला आज ‘चोर बाजार’ या नावाने ओळखले जाते.

दक्षिण मुंबईत अनेक बाजार आहेत. स्वत:ची स्वतंत्र ओळख असलेल्या या बाजारांपेक्षा चोर बाजार हा वेगळा वाटतो. दर आठवडय़ाच्या शुक्रवारी चोर बाजाराच्या रस्त्यावरील पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढते. आठवडी बाजारातून चोर बाजाराची सुरुवात झाली असावी. काहींच्या मते या परिसराला पूर्वी ‘शोर’बाजार म्हटले जात होते. मात्र अपभ्रंशातून या बाजाराचे नाव चोर बाजार असे पडले. त्यानंतरही चोरलेल्या वस्तूंचा बाजार म्हणून चोर बाजार प्रसिद्ध झाला. शुक्रवारी पहाटेपासून सुरू होणारा बाजार सायंकाळपर्यंत असतो. लहानपणापासून चोर बाजाराविषयी अनेक दंतकथा ऐकल्या गेल्या आहेत. या बाजारात खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या जवळील महागडय़ा वस्तू चोरी होतात, हा पुरुषांचा बाजार असल्याने येथे महिला बंदी असते, यासारख्या अनेक दंतकथा ऐकून या बाजारात जाणे टाळले जाते. मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे या बाजारात आल्यावरच लक्षात येते.

गरिबांना स्वस्त दरात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम चोर बाजार करीत आहे. या बाजारातील चपला, कपडे हे दुय्यम दर्जाचे आहेत. घरोघर फिरून जुन्या कपडय़ांवर भांडी देणाऱ्या बोहारणींकडून खरेदी केलेले जुने कपडे या बाजारात विकले जातात. बोहारणींकडून घेतलेल्या जुन्या कपडय़ांवर रंगरंगोटी केली जाते. असे कपडे या बाजारात १०० ते १५० रुपयांपर्यंत विकले जातात. ठाणे स्थानकालगत बोहारणींचा बाजार भरतो. बोहारणींनी जमा केलेले कपडे या बाजारातच दलालांना विकले जातात. आणि दलाल असे कपडे विविध राज्यांच्या स्थानकाजवळ वा अशाच बाजारांमध्ये विकतो. मुंबईतील चोर बाजारातही जुन्या कपडय़ांवर रंगरंगोटी केलेली आढळून येते. चपला, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, पितळेच्या मूर्ती आदी वस्तूही दुय्यम स्वरूपाच्या असतात. आजही चोर बाजार आणि भेंडी बाजारात राहणारी कुटुंबे या भागातून आठवडय़ाची खरेदी करतात. वाहने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाग घेण्यासाठी मात्र मुंबईच्या विविध भागातून ग्राहक येत असतात. यात तरुणांची संख्या विलक्षण असते. चोर बाजारात जुने, वापरलेले मोबाइलही काही हजारांत उपलब्ध होतात. फुटपाथवर एका छोटय़ाशा टेबलावर कपडे घेऊन बसलेल्या विक्रेत्यांकडेही भरपूर गर्दी पाहायला मिळते. चिंचोळ्या गल्लीत दोन्ही बाजूची बाजारपेठ वसलेली आहे. बाजाराचा फेरफटका मारल्यानंतर मटण स्ट्रीटच्या चौकात उभे राहिल्यावर तुम्हाला संपूर्ण बाजारपेठ दिसते.

जुन्या वस्तूंची बाजारपेठ म्हणून चोर बाजाराला ओळखले जात असले, तरी या बाजारातील दोन दुकानांचे आकर्षण अगदी मुंबईकरांपासून ते परदेशी पर्यटकांनाही आहे. हिंदी चित्रपटांची भित्तीचित्रे मिळणारे ‘मिनी मार्केट’ आणि पुरातन वस्तूंच्या दुकानांबद्दल ग्राहकांमध्ये कमालीचे आकर्षण आहे. या मिनी मार्केटमध्ये ‘रोटी’, ‘अपना खून’, ‘शोले’, ‘चोर मचाये शोर’, ‘काबिला’ यासारख्या जुन्या चित्रपटांचे भित्तीचित्र पाहायला मिळतात. अनेकदा चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक या दुकानातून त्यांना आवश्यक असलेल्या चित्रपटांचे भित्तीचित्र मागवून घेतात आणि जुन्या वस्तू येथून खरेदी करतात. यात सुभाष घई आणि संजय लीला भन्साळी यासारखे बडे दिग्दर्शक येथे अधेमधे हजेरी लावतात.

ग्रामोफोन, जुन्या प्रकारातील घडय़ाळे, रोमन अंकातील खिशात ठेवायचे घडय़ाळ आवडीनुसारही बनवून दिले जाते. कॅसेट्सही या बाजारात मिळतात. संगीतप्रेमी आवर्जून कॅसेट्स खरेदीसाठी चोर बाजारात येतात. अनेक दिग्दर्शक चित्रपटांसाठी लागणाऱ्या आवश्यक पुरातन वस्तू चोर बाजारातून खरेदी करतात. सुभाष घई, संजय लीला भन्साळी यांसारखे अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक चित्रपटांसाठी आवश्यक पुरातन वस्तू या बाजारातून खरेदी करतात.

दक्षिण मुंबई तेथील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गजबजलेल्या बाजारांमुळेही ओळखली जाते. मनीष मार्केट, मंगलदास मार्केट, तांबा काटा मार्केट, झव्हेरी बाजार, फॅशन स्ट्रीट या विशिष्ट वस्तूंसाठी मिळणाऱ्या बाजारांबरोबरच चोर बाजारालाही विशेष महत्त्व आहे. व्हिक्टोरिया राणीने मुंबईला भेट दिली होती, तेव्हा तिच्या सामानातून व्हायोलिन चोरीला गेले होते. ते व्हायोलिन चोर बाजारात सापडले होते. आणि त्यानंतर दुसऱ्या एका घटनेत अभिनेते सोहराब मोदी यांना भारत सरकारने दिलेला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराचे पदक या बाजारात विक्रीला आले होते. अशा कथाही येथे सांगितल्या जातात.

चोर बाजारातील एक रस्ता ‘मटण स्ट्रीट’ या नावाने ओळखले जातो. या मटण स्ट्रीटवरील दुकानांमध्ये पूर्वी मटणाची विक्री केली जात असे. आता सर्वच दुकानांत कपडे आणि वस्तूंच्या विक्रीसाठी वापरली जातात. चोर बाजाराजवळील एक मिठाईच्या दुकानातील दुधीचा हलवाई येथे प्रसिद्ध आहे. किसलेल्या दुधीमध्ये मावा आणि तूप घालून तयार केलेला हलवा खात खात चोर बाजाराची सैर म्हणजे मौजेचा कळसच.

चोर बाजार पूर्वी जसा होता, तसा आताही आहे. काही वस्तूंमध्ये बदल झाला आहे. म्हणजे टेपरेकॉर्डरपासून मोबाइलही चोर बाजारात मिळतो.

मीनल गांगुर्डे meenal.gangurde8@gmail.com