भावेश नकाते प्रकरणावरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली असताना या प्रकरणाचे चित्रीकरण करणाऱ्या असंवेदनशील प्रवाशांबाबत आणि दारावर उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या टोळक्याबाबत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल नेमकी काय कारवाई करणार, याबाबत अद्यापही एकवाक्यता नाही. या चित्रीकरणामध्ये सहप्रवाशांनी भावेशला आत येण्यास जागा दिली नाही आणि बाहेर रेटण्याचा प्रयत्न केला असल्याचेही दिसते. त्यानंतर या चच्रेला उधाण आले असून अशा टोळक्यांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी तीव्र होत आहे.
भावेश नकाते या तरुणाच्या अपघाताचे चित्रीकरण त्याच्याच सहप्रवाशांपकी एकाने केले होते. या चित्रीकरणात कॅमेरा नेमका भावेशवरच कसा रोखला होता, इतर प्रवाशांपकी कोणीच त्याला मदत कशी केली नाही, नेमके काय संवाद चालू होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी हे सर्व प्रश्न विनाचौकशी फेटाळत भावेशचा मृत्यू हा अपघातच होता, असे म्हटले आहे. मात्र तरीही चित्रीकरण करणाऱ्या प्रवाशाचा शोध अद्याप लागलेला नाही.
याबाबत लोहमार्ग पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या व्यतिरिक्त लोहमार्ग पोलिसांपकीही कोणी या प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी दर्शवली नाही. लोकल प्रवासादरम्यान ठरावीक गाडीने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना या टोळक्यांच्या अरेरावीला सातत्याने तोंड द्यावे लागते. महिलांच्या डब्यातही अशी टोळकी सर्रास दिसतात. सामान्य प्रवाशांसह या टोळक्यांचे वाद आणि प्रसंगी हाणामारी, ही प्रकरणेही नवीन नाहीत. मात्र विविध प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी मागणी करूनही अद्याप लोहमार्ग पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, अशी कारवाई करणे रेल्वे अधिनियमाच्या १४५व्या कलमानुसार शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्या सहकार्याशिवाय ही कारवाई करणे शक्य नसल्याचे या अधिकाऱ्यांनी नमूद केले.