सजणं म्हटलं तर त्यात सर्वच आलं. ‘नखशिखान्त सौंदर्य’ असं ज्याला म्हटलं जातं त्याचा अर्थच मुळी पायाच्या नखांपासून केसांच्या अग्रांपर्यंतच्या रूपदर्शनात दडलेला आहे. अशा वेळी नखं सजावटीपासून दूर कशी ठेवता येतील? पूर्वी कपडय़ांच्या रंगातील ‘नेलपॉलिश’ हे नखांचे सौंदर्य खुलवण्याचे एकमेव साधन होते. मात्र आता त्यातही प्रचंड वैविध्य आले आहे. ‘नेल डिझायनिंग’ असा स्वतंत्र विभागच अनेक पार्लर्समध्ये दिसू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर नखांचं सौंदर्य कसं खुलवता येईल, हे दाखवण्याचा प्रयत्न..

‘फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ असं म्हटलं जातं. एखाद्या पार्टीत, लग्न सोहळय़ात, ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आपली छाप सोडायची असल्यास आपण कपडे, मेकअप, शूज, ज्वेलरी, केस यांच्यावर जास्त लक्ष देतो; पण घाईघाईत उरकण्याच्या नादात अनेक छोटय़ा गोष्टी आपल्याकडून निसटतात. त्यातलीच एक म्हणजे नखं. तुमची नखं व्यवस्थितपणे कापलेली असावीत, नेलपेंट लावायचं झाल्यास ते नखांवर नीट लावलेलं असलं पाहिजे. नेलआर्ट करायची झाल्यास कुठे, कोणत्या प्रसंगासाठी कोणतं डिझाईन निवडताय हे ठरवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कपडे, अ‍ॅक्सेसरीज, मेकअपप्रमाणे नेल स्टायलिंगचे ट्रेंडसुद्धा दरवर्षी बदलत असतात. अर्थात फक्त नवीन ट्रेंड आलाय, म्हणून नाही तर दरवर्षी येणाऱ्या या नवनवीन ट्रेंड्समध्ये काही तरी गमतीशीर, सुंदर कामही असतं. नेल स्टायलिंग हे फक्त एक खर्चीक काम नसून ती एक कला आहे. ‘त्यात काय? फक्त नखांना रंग तर लावायचाय!’ असा विचार करणाऱ्यांनी एकदा तरी हाताच्या दहाही बोटांना व्यवस्थित, बोटावर रंग न लावता, समान लेअर आणि शाईन असेल अशा प्रकारे नेलपेंट लावून दाखवावं. त्यावर डिझाईन करणं ही त्यानंतरची बाब. कठीण वाटत ना? म्हणूनच ‘नेल आर्ट’ असं म्हणतात.

मेटालिक अदा

सध्या नेलकलर्समधला महत्त्वाचा ट्रेंड आहे ‘मेटालिक शेड्स’चा. गोल्ड, सिल्व्हर यांच्यासोबतच रेनबो विथ ग्लिटर, धूपछाव इफेक्ट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. शिमर मेटालिक शेड्स एरवीही वापरल्या जातात, पण सध्या बाजारात मिरर फिनिशचे मेटालिक नेलपेंट आले आहेत. हे एखाद्या पत्र्याच्या तुकडय़ाप्रमाणे यांचा लुक असतो. बाजारात ब्रँडेड मेकअपचं सामान मिळणाऱ्या दुकानांमध्ये ही नेलपेंट्स उपलब्ध आहेत. तुम्हाला स्ट्रीट मार्केट किंवा फेरीवाल्यांकडेसुद्धा मेटालिक नेलपेंट मिळतील, पण त्याचा लुक तितकासा आकर्षक नसतो. त्यामुळे अशी स्वस्तात मस्त नेलपेंट्स घेताना शेड्स नीट तपासा. मिरर फिनिश नेलपेंट हे तुलनेने महाग असतात. साधारणपणे ६०० रुपयांपासून त्यांची किंमत सुरू होते. सध्या ऑनलाइन हे पेंट्स उपलब्ध आहेत. तसेच काही निवडक ब्रँडेड दुकांनामध्ये तुम्हाला हे नेलपेंट्स मिळतील.

मिनिमल नेल डिझाइन

नेलआर्ट कधीच ट्रेंडमधून जात नाही; पण सध्या त्यात कोणते ट्रेंड्स आहेत, हे माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुठे जाताय, यावर तुमच्या नखांचं डिझाईन अवलंबून असतं. कॉर्पोरेट लुक लक्षात घेता, सध्या मिनिमल लुकचं नेलआर्ट्स ट्रेंडमध्ये आहेत. नेलपेंटवर कॉन्ट्रास्ट शेडचा बहुतेकदा सफेद रंगाची उभ्या, आडव्या किंवा तिरप्या रेषा किंवा ठिबके इतकंच त्याचं स्वरूप असतं. याशिवाय भौमितिक मेहेंदी शेप, लेसच्या कापडावर असते तशी नाजूकशी डिझाईन सध्या नेलआर्टमध्ये केली जाते. हे डिझाईन नखांवर आकर्षक दिसतं, पण उठावदार दिसत नाहीत. त्यामुळे पार्टीसोबतच ऑफिसमध्येही तुम्ही सहज कॅरी करू शकता.

छोटी नखं आणि वर्तुळाकार मॅनिक्युअर

लांबच लांब नखं वाढवण्याची तुम्हाला आवड असेल, तर जरा थांबा. सध्या हे लाँग नेल्स आऊट ऑफ फॅशन आहेत. सध्या ट्रेंड आहे, व्यवस्थितपणे कापलेल्या छोटय़ा नखांचा. तुम्हाला नखं वाढवायचीच असल्यास मध्यम उंचीची ठेवू शकता, पण लांब नखांचा ट्रेंड आता गेला आहे. छोटय़ा नखांवर इंग्लिश कलर नेलपेंट छान दिसतात. अर्थात नखं छोटी ठेवायची म्हणजे कशीही कापून चालणार नाहीत, त्यांना व्यवस्थित आकार असणंसुद्धा गरजेचं आहे. सध्या नखांचा वर्तुळाकार आकार ट्रेंडमध्ये आहे. मध्यंतरी चौकोनी किंवा आयताकृती आकारात नखं वाढवली जायची. त्याने नखं रुंद दिसायची; पण सध्या तरुणी नाजूक, छोटी नखं ठेवणं पसंत करताहेत. त्यामुळे पार्लरमध्ये मॅनिक्युअर करायला जाताना नखांना आवर्जून गोलाकार द्या.

थ्री-डी डिटेल

सध्या बाजारात ख्रिसमसची तयारी सुरू झाली आहे. लग्नाचा सीझन तर आहेच. नंतर न्यू इयरच्या पाटर्य़ा सुरू होतील. अशा वेळी नखांना रॉयल लुक द्यायचा असेल, तर सध्या थ्री-डी डिझाईन्सची क्रेझ आहे. फर, नेल स्टड, क्रिस्टल, टिकल्या लावून तुम्ही नखांना थ्री-डी लुक देऊ  शकता. यातील काही सोप्या पद्धती घरच्या घरी स्टड वापरून करता येतात. त्याशिवाय नेल सलूनमध्येसुद्धा अशा प्रकारचे डिझाईन्स केले जातात.

कलरफुल ट्रीट

नेलकलरमध्ये सध्या व्हाइट, काळा हे दोन रंग चर्चेत आहेत. अर्थात सगळ्यांनाच दहाही बोटांना काळ्या रंगाचे नेलपेंट लावायला आवडत नाही. अशा वेळी एक-दोन बोटांना काळा रंग आणि बाकीच्या बोटांना न्यूड किंवा ट्रान्सपरंट नेलपेंट लावू शकता. न्यूडसोबत लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, गुलाबी हे ‘कँडी शेड’ सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

  • कुठे मिळतील? : नेलकलर तुम्हाला ब्युटी शॉप्समध्ये सहज उपलब्ध आहेत. नेलआर्टसाठी सध्या मुंबईच्या बहुतेक सर्वच मॉल्समध्ये नेलपार्लर्स सुरू झाले आहेत. लोखंडवाला, बोरिवली, बांद्रा, खार भागांतसुद्धा अनेक नेलपार्लर्स आहेत. नेलकलर्सच्या किमतींची सुरुवात साधारणपणे १०० रुपयांपासून सुरू होते आणि ब्रँडनुसार त्यांच्या किमती बदलतात. नेलआर्ट करण्याचा खर्च डिझाईननुसार १,००० रुपयांपासून सुरू होतो. ब्युटी शॉप्समध्ये नेल अ‍ॅक्सेसरीज, स्टड मिळतात. त्यांच्या मदतीने तुम्ही बेसिक नेलआर्ट घरच्या घरी करू शकता. त्यांच्या किमती साधारणपणे ५० रुपयांपासून सुरू होतात.