आज, २२ सप्टेंबरला रक्ताच्या कर्करोगासंबंधीचा जागतिक दिवस (जागतिक सीएमएल दिवस) आहे. त्यानिमित्ताने या क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील संस्थेविषयी..
त्या दिवशी सुरेश सकाळी उठला, पण काही तरी बिघडल्यासारखे वाटत होते. आजचा दिवस नेहमीसारखा नाही, हे त्याला जाणवत होते. अस्वस्थपणा असह्य़ झाला, तेव्हा त्याने डॉक्टर गाठला. रत्नागिरी जिल्ह्य़ातील देवरुखसारख्या निमशहरात तपासणीच्या त्रोटक सुविधांनिशी निदान करणे शक्यच नव्हते. डॉक्टरनी त्याला रत्नागिरीला जायला सांगितले. शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण अचानकच प्रचंड वाढल्याचे स्पष्ट होताच, तातडीने मुंबईत हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मुंबईतील एका इस्पितळात तपासणी झाली, आणि डॉक्टरांनी निदान केले.. ब्लड कॅन्सर. रक्ताचा कर्करोग. क्रॉनिक मायलॉईड ल्युकेमिया (सीएमएल)!
लगेच उपचार सुरू झाले. २१ दिवस केमोथेरपी झाली. त्या वेळी साडेतीन हजारांचं एक इंजेक्शन याप्रमाणे दहा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला, जोडीला गोळ्याही घ्याव्या लागत होत्या. त्या गोळ्यांची किंमत एका पाकिटाला हजारोंच्या घरात होती. दररोज ही गोळी घ्यावी लागणार असल्याने, उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर जाणार हे स्पष्ट होते. मुंबईच्या टाटा इस्पितळात उपचार सुरू झाले. त्याच काळात कुणी तरी, ‘मॅक्स फाऊंडेशन’चं नाव सुचवलं, आणि रक्ताचा कॅन्सर असतानाही जगता येतं, या आत्मविश्वासानिशी पुढे या आजाराशी लढण्यासाठी कॅन्सरग्रस्त सुरेशचं पहिलं पाऊल पडलं.. पहिली दोन वर्षे सुरेशनं उपचाराचा खर्च कसाबसा उभा केला. नोव्हार्टिस या कंपनीची ‘मॅजिक बुलेट’ नावाच्या औषधाची ‘ग्लीवेक’ नावाची महिन्याकाठी जवळपास दहा हजार रुपये किमतीची गोळी दररोज घ्यावी लागणार होती. प्रपंच चालवत असतानाच पुढच्या जगण्यासाठी करावा लागणारा हा खर्च आवाक्याबाहेरचाच होता. तो ‘मॅक्स फाऊंडेशन’च्या वरळीच्या कार्यालयात गेला आणि या महागडय़ा उपचाराच्या खर्चाची चिंता मिटली. गेली बारा-तेरा वर्षे सुरेश नियमितपणे त्या गोळ्या घेतोय. ती गोळी हे त्याचे जीवन आहे.
‘फ्रेंड्स ऑफ मॅक्स’ नावाचा एक आधारगट अशा रुग्णांशी सातत्याने संवाद साधत असतो. एसएमएस, ई-मेल, पत्रव्यवहार आणि फोनद्वारेदेखील रुग्णांशी संपर्कात राहून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाते. दर महिन्याला देशभरातील वेगवेगळ्या केंद्रांत ‘सीएमएल’ग्रस्त रुग्णांचे मेळावे होतात. मुंबईत गेल्या मे महिन्यात अशा रुग्णांचा एक मेळावा झाला. उपचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करून भविष्याच्या वाटचालीचे मार्गदर्शन घेऊन रुग्ण आपापल्या घरी परतले. अशा मेळाव्यांना सुरेशसारख्या अनेक रुग्णांची नियमित हजेरी असते. मॅक्स फाऊंडेशन पाठीशी असल्याने यापुढे या आजाराशी संघर्ष करायचा, असा निर्धार त्यानेच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाने केला आहे.
मुख्यालय अमेरिकेत
‘मॅक्स फाऊंडेशन’चे मुख्यालय अमेरिकेत आहे. दर वर्षी २२ सप्टेंबरला ‘जागतिक सीएमएल दिवस’ पाळला जातो. भारतात दिल्ली, हैदराबाद, कोची, जयपूर, चंदीगढ आदी अनेक शहरांमध्ये आज, मंगळवारी यानिमित्ताने देशभरातील अठरा हजार रुग्णांशी थेट संवाद साधला जाईल. मुंबई केंद्राच्या क्षेत्रात फाऊंडेशनचे काम करणाऱ्या विजी वेंकटेशन या आपल्या २० सहकाऱ्यांसह गेल्या १५ वर्षांपासून रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देत आहेत. मुंबई केंद्रात सुमारे पाच हजार रुग्णांची मॅक्स फाऊंडेशनकडे नोंद आहे. या संस्थेच्या भक्कम पाठबळावर अनेक कर्करुग्ण पंचवीस वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत आहेत.
रुग्णांची सेवा हेच व्रत घेतलेल्या मॅक्स फाऊंडेशनच्या कार्याशी आपण संबंधित आहोत हेच आपल्या आयुष्याचे मोठे समाधान आहे, अशी भावना विजी वेंकटेशन यांच्या शब्दाशब्दांतून ओसंडत असते..

नोव्हार्टिसकडून मोफत गोळ्यांचा पुरवठा
नोव्हार्टिसकडून मॅक्स फाऊंडेशनला या गोळ्या मोफत पुरविल्या जातात, आणि मॅक्स फाऊंडेशनमार्फत त्या कर्करुग्णांना मोफत वाटल्या जातात. देशभरातील जवळपास १८ हजार कर्करुग्ण ‘मॅक्स’च्या या उपकारक उपचाराचा लाभ घेत या आजाराशी सामना करण्यासाठी नवी उमेदही गोळा करत आहेत. कर्करुग्णांना धीर देणे, त्यांची जगण्याची उमेद कधीच हरवणार नाही याची काळजी घेत त्यांना या आजाराशी लढण्याचे जणू शिक्षणच मॅक्स फाऊंडेशनतर्फे दिले जाते.