वर्षभरात चार रेल्वे स्थानकांत प्रत्येकी २०० अपघात

प्रवाशांची गर्दी, फलाट आणि गाडीतील अंतर, पुलाऐवजी रुळांचा होणारा वापर यामुळे ठाणे, कल्याण, अंधेरी, बोरिवली या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई आणि उपनगरात मिळून २०१७ मध्ये एकूण तीन हजार १४ जणांचा विविध रेल्वे अपघातांत मृत्यू झाला. तर तीन हजार ३४५ जण जखमी झाले आहेत. सर्व स्थानकांमध्ये ठाणे, कल्याण, अंधेरी, बोरिवली येथील अपघातांचा आकडा प्रत्येकी २००च्या वर आहे. त्यातही ठाणे अधिक अपघातप्रवण असून त्याखालोखाल कल्याण, अंधेरी, बोरिवली स्थानकांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांत गर्दीचे स्थानक म्हणून ओळख झालेल्या दिवा स्थानकातही १४९ प्रवाशांचे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांना  मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून २०१७ मधील रेल्वे प्रवासी अपघातांची माहिती देण्यात आली आहे. हे अपघात रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना, लोकल गाडय़ांमधून पडून, ओव्हरहेड वायरचा शॉक लागून, रुळांच्या शेजारी असणाऱ्या खांबांना धडक लागणे, लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि फलाटांमधील रिकाम्या जागेत पडून झाले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे हद्दीत आत्महत्यांचे प्रमाणही अधिक आहे.

२०१६ मध्ये एकूण ३,२०२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात एक हजार ७९८ जणांचा मृत्यू झाला. तर ६५७ जणांचा लोकल गाडय़ांमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०१७ मध्येही तीन हजार १४ प्रवाशांचा मृत्यू आणि तीन हजार ३४५ प्रवासी जखमी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या कमी आहे. मात्र काही ठरावीक स्थानकांमध्ये अपघातांचे प्रमाण जास्तच आहे.

लोकल गाडीतून पडून ६५४ जणांचा आणि रूळ ओलांडताना १,६५१ जण मृत्यू झाला आहे. अपघात टाळण्याकरिता सर्व स्थानकांच्या दोन रुळांच्या मध्ये तारांचे कुंपण, रुळांच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच, पुरेसे पादचारी पूल, सरकते जिने प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले तर अपघाताची संख्या कमी होईल. मात्र या सुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश येत आहे.

२०१७ मध्ये झालेल्या एकूण अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात ठाणे स्थानक परिसरातील आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी मृत्यू आणि जखमी प्रवाशांची संख्या मिळून २९२ आहे. कल्याण स्थानकातही २५८ प्रवाशांचे, अंधेरी स्थानकात २२० आणि बोरिवली स्थानकात २०३ प्रवाशांचे अपघात झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.