चांगल्या घटनांऐवजी भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई उद्यान विवादास्पद घटनांसाठीच चर्चेत राहिले आहे. २००६ मध्ये कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेला हरणांचा मृत्यू, २०१० मध्ये राजकुमार हत्तीच्या हल्ल्यात गर्दुल्याचा मृत्यू , २०१६ मध्ये पेंग्विनचा मृत्यू यामुळे हे उद्यान गाजत राहिले. त्यात राणीबागेचे अनेक आराखडे व कामांचा झालेला विलंब यामुळे कधी काळी मुंबईची शान असलेल्या राणीच्या बागेचा आब उतरला आहे आणि लहानपणीची राणीची बाग केवळ स्वप्नातच शिल्लक राहिली आहे.

उद्यानाची कथा

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…
gaganyan astronauts
गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

तब्बल १५५ वर्षांपूर्वी म्हणजे १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डनची ५५ एकर जागेत स्थापना करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हे फक्त उद्यान होते. देशविदेशातील दुर्मीळ झाडांच्या या उद्यानात त्यानंतर प्राणिसंग्रहालयांचे पिंजरे आहे. या उद्यानात १५५ वृक्ष विदेशी जातींचे तर १३१ वृक्ष देशी आहेत. उद्यानाच्या सुरुवातीलाच अवाढव्य बुंधे असलेले आफ्रिकी वंशाचे बाओबाब, ऑस्ट्रेलिअन चेस्टनट वृक्ष, मादागास्करचा गम कोपाल वृक्ष, अत्यंत मऊ खोड असलेली भूर्जपत्राची मोठी झाडे, अत्यंत सुंदर फुले देणारा ब्रह्मदेशातील उर्वशी, पानांची मागची पाने जोडून द्रोणासारखी दिसणारा कृष्णवड, पांढऱ्या सालीचा अर्जुन, पांढरा साग अशी अनेक दुर्मीळ झाडे इथे एका फेरीत पाहता येतात. मात्र हे उद्यान केवळ वनस्पतीतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी यांच्यापेक्षा पुढे पोहोचलेले नाही. दररोज तब्बल आठ ते दहा हजार पर्यटक या उद्यानात सहजी मावतात. बागांमध्ये या प्रचंड वृक्षांच्या सावलीत विसावलेल्या या पर्यटकांना झाडांबद्दल माहितीच कळत नसल्याने त्याचे वेगळेपणही समजत नाही.

प्राणिसंग्रहालयाप्रमाणे झाडांची दुरवस्था झाली नसली तरी एवढय़ा वर्षांत या झाडांच्या वेगळेपणात भर घालावी किंवा अधिकाधिक झाडांची माहिती प्रदर्शित करावी यासाठीही उद्यान विभागाकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. दहा वर्षांपूर्वी वृक्षप्रेमींच्या सततच्या आग्रहामुळे तेव्हा साडेतीन लाख रुपये खर्च करून अ‍ॅक्रेलिकवर झाडांची नावे लिहिण्यात आली, पण ती झाडांवर लागलेली कोणाला दिसली नाहीत. या बागेतील झाडांवर ‘सेव्ह राणीबाग’ समितीने पुस्तकही तयार केले, मात्र पुस्तकातही उल्लेख असलेल्या सुंदरी या खारफुटीच्या प्रजातीवर या चक्क कुऱ्हाड चालवण्यात आली. उद्यानाच्या डाव्या बाजूला माकडाच्या पिंजऱ्याजवळ हे प. बंगालच्या सुंदरबनातील झुडुप चांगले फोफावले होते. मात्र त्याची फांदी तुटल्यावर संपूर्ण झाडच बुंध्याला एक फूट उंचीपर्यंत तोडण्यात आले. या पावसाळ्यात या झाडाला फांद्याच आल्या नाहीत. उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचा झाडांबाबत हा असा उदास दृष्टिकोन आहे, असे सेव्ह राणीबागच्या संस्थापक सदस्य शुभदा निखार्गे म्हणाल्या.

आरे कॉलनीतील प्रस्ताव

भायखळा येथील प्राणिसंग्रहालय हलवून ते आरे कॉलनीत १०० एकर जागेत नेण्याची पहिली टूम २००४ मध्ये काढण्यात आली होती. पंचतारांकित हॉटेल, जलतरण तलाव अशा सुविधांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राणिसंग्रहालयाचे गाजर दाखवून भायखळा येथील ५५ एकर जागा विकासकांसाठी खुली होईल असे आरोप झाल्याने हा प्रस्ताव काहीसा मागे पडला. मात्र त्यानंतरही दर दोन ते तीन वर्षांनी निवडणुकांच्या तोंडावर हा प्रस्ताव पुढे आणला जातो. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा आरे कॉलनीतील प्राणिसंग्रहालयाचा मुद्दा चर्चेला आला होता. मात्र प्रखर विरोध लक्षात घेऊन भायखळाचे प्राणिसंग्रहालय कायम ठेवून हा प्रस्ताव पुढे रेटला गेला. त्यातच तेव्हाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या योजनेसाठी लकडा लावण्यात आला. त्यानंतर ऑगस्टमध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अधिकारी पाहणीसाठी येणार होते. प्राण्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचा परिसर, वातावरण याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी आता करावी लागते. मुंबईत याआधीच एक प्राणिसंग्रहालय असल्याने दुसऱ्या प्राणिसंग्रहालयाबाबत वेगळे प्राणी असावेत तसेच स्थानिक वातावरणाची सवय नसलेले परदेशी प्राणी ठेवता येणार नाहीत, असे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता वर्षभरानंतर या योजनेबाबत सर्व पातळ्यांवर शांतता आहे.

सिंगापूर धर्तीवर ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प

महानगरपालिकेत तेव्हाचे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली बँकाँकच्या एचकेएस डिझायनर अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी या कंपनीने २००७ मध्ये तब्बल ४५० कोटी रुपयांचा आराखडा बनवण्यात आला होता. सिंगापूरच्या धर्तीवर काचेच्या पिंजऱ्यांमध्ये प्राण्यांना ठेवण्यात येणार होते. मात्र या आराखडय़ात उद्यानातील सर्व पदपथांचे मार्गच बदलण्याचा प्रस्ताव होता, त्यातच अर्धीअधिक झाडे प्राण्यांच्या पिंजऱ्याच्या आत जाणार असल्याने दुर्मीळ झाडावर गदा येणार होती. या प्रस्तावाला दोन्ही पातळ्यांवर विरोध सुरू झाला. एक तर वृक्षप्रेमींचा विरोध होता तर शहरात इतर विकासकामे रखडलेली असताना प्राणिसंग्रहालयासाठी एवढय़ा प्रचंड खर्चाची गरज आहे का, असे आक्षेप घेतले गेले. हे काम पेलवणारे नाही हे लक्षात आल्यावर तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी खर्चाची रक्कम एक तृतीयांशवर आणायला सांगितली.

१५० कोटी रुपयांचा आराखडा

आयुक्तांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा एचकेएस कंपनीनेच २०११ मध्ये देशी पद्धतीवर येत १५० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला. पर्यटकांसाठी करण्यात येणारे ‘फाइव्ह डी थिएटर’ वगैरेसारखे पांढरे हत्ती असलेले भाग प्रकल्पातून वजा करण्यात आले. याबाबतही सुरुवातीला आक्षेप घेतले गेले. मात्र तेव्हाचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक अनिल अंजनकर यांनी उद्यानातील झाडांना धक्का न लागता आराखडा करण्यासाठी जागेच्या मर्यादा घालून दिल्या. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या बांधकामाचा आराखडा तयार झाला. त्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून परवानगीही मिळाली. मात्र या सगळ्यात काही ठिकाणी सुरू असलेले िभतींचे बांधकाम व पिंजऱ्याच्या रचनांबद्दलचे आक्षेप यासाठी सेव्ह राणीबाग पुरातन वास्तू जतन समितीकडे गेली. या समितीकडून २०१५ मध्ये निर्णय देण्यात आला. दरम्यानच्या काळात भिंती बांधल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रशासकीय इमारतीचे (ज्यात आता तळमजल्यावर पेंग्विन ठेवण्यात आले आहेत) काम पूर्ण झाले. सेव्ह राणीबाग समितीने आराखडय़ाबाबतचे आक्षेप आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे मांडल्यानंतर आता या समितीला विश्वासात घेऊन त्याप्रमाणे उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

आजमितीला या प्राणिसंग्रहालयात १६ जातींचे एकूण १४३ सस्तन प्राणी, ३० जातींचे २९६ पक्षी व ६ जातींचे ३२ सरपटणारे प्राणी व जलचर प्राणी असे एकूण ४७१ प्राणी/पक्षी अस्तित्वात आहेत. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आशियाई हत्ती, हिमालयीन काळे अस्वल, पाणघोडे, तरस, नीलगाय, भेकर, चितळ, सांबर, चौिशगा इत्यादी सस्तन प्राणी, मिलिटरी मॅकॉव, भूतान पिकॉक फेझंट, आफ्रिकन करडे पोपट, रोझी पेलीकन, रेड क्राऊण्ड क्रेन, रंगीत करकोचे इत्यादी विविध जातींचे पक्षी तसेच मगर, सुसर इत्यादी सरपटणारे प्राणी यांचा समावेश आहे.

विकास आराखडय़ात प्राणिसंग्रहालय

मुंबई शहराच्या आधीच्या म्हणजे १९६७ व १९९१च्या विकास आराखडय़ामध्ये भायखळा येथील जागा उद्यान या नावाने नमूद करण्यात आली होती. मात्र २०१५ मध्ये आलेल्या २०१४-२०३४ या विकास आराखडय़ात तिथे केवळ प्राणिसंग्रहालय दाखवण्यात आले. त्याबद्दल आक्षेप घेतल्यावर सुधारित आराखडय़ात प्राणिसंग्रहालय व कंसात उद्यान असा उल्लेख केला आहे, मात्र त्यालाही वृक्षप्रेमींचा विरोध आहे.

पवईचे पक्षीउद्यानही रखडले

भायखळा प्राणिसंग्रहालयात असलेल्या पक्ष्यांसाठी पवईच्या डॉ. आंबेडकर उद्यानात पक्षिसंग्रहालय करण्याचे प्रस्तावित होते. मात्र आता हा प्रस्तावही मागे पडला आहे.

prajakta.kasale@expressindia.com