खेळाडू म्हटलं, की खेळाचा नियमितपणे सराव करण्यासोबतच आहाराकडेही लक्ष द्यावं लागतं; पण मुंबईसारख्या घडय़ाळाच्या काटय़ावर चालणाऱ्या शहरात वेळेवर खाणं होत नाही आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तायक्वांडो हा खेळ खेळणाऱ्या चतन्य जावळे याच्या वडिलांना आणि भावाला यावरून ज्यूस सेंटरची कल्पना सुचली आणि आजपासून तेरा वर्षांपूर्वी ‘श्री अन्नपूर्णा’ या ज्यूस सेंटरची सुरुवात झाली. पाल्र्यातील सुभाष रोडवरील हे ज्यूस सेंटर लहान मुलांपासून ते आजी-आजोबा अशा सर्वासाठीच ‘सोशलाइज’ होण्यासाठीचाही आरोग्यवर्धक अड्डा झाला आहे जिथे दिलखुलास गप्पा मारताना पौष्टिक पेय आणि खाद्यही मिळतं, तेही बजेटमध्ये.

चतन्य, त्याचा भाऊ आणि बहीण असे तिघे मिळून हा व्यवसाय चालवतात. सुरुवातीला फक्त चार ते पाच प्रकारचे ज्यूसच येथे मिळत होते. मात्र, लोकांना सतत तेच तेच प्यायचा कंटाळा येतो. त्यामुळे लोकांना नवीन काय देता येईल याचेही सतत नवनवीन प्रयोग येथे सुरू असतात. म्हणूनच त्यांच्या मेन्यू कार्डवर तुम्हाला फळांच्या नावांपुढे पॅरडाइज, पंच, ट्रीट, डिलाइट, फ्लोट, ब्लॉसम, अल्टिमेट, रेन, कूल, किक, सिम्पल, बेस्ट अशी भरपूर विशेषणं दिसतील. चतन्यची बहीण त्यासाठी अन्नाच्या सकसपणाच्या स्रोताचा सतत अभ्यास करत असते आणि कोणत्या फळामध्ये किती आणि कोणकोणती पोषणतत्त्वे आहेत, कोणत्या फळांची कॉम्बिनेशन्स आरोग्याला चांगली हे प्रयोग करून पडताळून पाहिलं जात असतं. त्याशिवाय लोकांनी सुचवलेलेही काही कॉम्बिनेशन्सही आता त्यांच्या मेन्यूमध्ये समाविष्ट झालेली आहेत.

तुम्हाला माहीत असलेल्या आणि नसलेल्या जवळपास सर्वच फळांचे ज्यूस येथे मिळतात. त्यामध्ये बारा प्रकारच्या नुसत्या फळांचे ज्यूस, ७५ प्रकारची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असलेले फळांचे ज्यूस, विविध फळभाज्यांची कॉम्बिनेशन्स असलेले २१ प्रकार, तेवीस प्रकारचे मिल्क शेक, चार प्रकारचे फालुदा, फ्रुट क्रीमचे तेरा प्रकार, सात प्रकारचे थिक शेक, त्याशिवाय चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीचा केक क्रीम हे भन्नाट आणि वेगळे प्रकारही येथे मिळतात. ज्यूस पिण्याच्या आधी खूपच भूक लागली असेल तर शंभर प्रकारची वेगवेगळी सँडविचेस आणि पिझ्झाचे वेगवेगळे प्रकारही येथे आहेत.

अननस, किलगड, मोसंबी आणि रोझ यांपासून तयार होणारा ‘समर कूल’ हा इथला सर्वात लोकप्रिय ज्यूस आहे. पार्टी आणि लग्नामध्येही त्याला भरपूर मागणी असते.

पारले-जी मिल्क शेक

विलेपाल्रे हे स्थानक त्याच नावाच्या पारले-जी या बिस्किटाच्या कंपनीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या बिस्किटाचा मिल्क शेकही येथे मिळतो. हा मिल्क शेक म्हणजे एक एनर्जी िड्रक आहे. केळं, दूध आणि पारले-जी बिस्किट यांचं कॉम्बिनेशन असलेला हा मिल्क शेक श्री अन्नपूर्णाच्या सुरुवातीच्या मेन्यूकार्डमधील एक आहे. यामध्ये साखर टाकली जात नाही. तर काहींना त्यामध्ये चॉकलेट चिप्स आवडतात. अनेक जण तर फक्त तो पिण्यासाठी म्हणून येथे आवर्जून येतात.

व्हाइट फॉरेस्ट पिझ्झा

तहान आणि भूक भागवणाऱ्या ज्यूससोबत सँडविच आणि पिझ्झामध्येही येथे वेगवेगळे प्रयोग होत असतात. त्यापकीच एक म्हणजे व्हाइट फॉरेस्ट पिझ्झा. पनीर, चीझ, मेओनीज, कॉर्न, मशरूम, कोबी, कांदा हे सर्व पांढरे पदार्थ यामध्ये वापरले जातात. भरपूर चीझ टाकून कव्हर केलेला हा पिझ्झा चवीलाही मस्त लागतो.

अन्नपूर्णा ज्यूस सेंटर

  • कुठे : दुकान क्रमांक १, टाइम फिल्ड, कॉर्पोरेशन बििल्डग, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.
  • वेळ : मंगळवार ते शनिवार – दुपारी १२ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत. सोमवारी बंद