केवळ दरवाजा लावून प्रश्न सुटणार नाही तर लोकलमधील गटबाजी आणि नियमबाह्य़ गोष्टींनाही आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकलमधील दादागिरी केवळ पुरुषांच्या डब्यापुरती मर्यादित नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ पाहणाऱ्या महिलांच्या डब्यातही गटबाजी आणि दारातील ठिय्या आंदोलन असते. रांगा लावून जागा अडवण्यापासून गटाव्यतिरिक्त इतर कोणालाही पुढच्या स्थानकावर बसू न देण्याची खबरदारीही या डब्यांमध्ये घेतलेली असते.
लोकलच्या पहिल्या वर्गाच्या महिला डब्याला दरवाजे बसवण्याचा रेल्वेचा निर्णय काही दिवसांतच मागे घ्यावा लागला. एक तर पहिल्या वर्गासाठी निम्माच डबा दिला जातो. सकाळी गर्दीच्या वेळी दुसऱ्या वर्गाएवढाच हा डबा खच्चाखच भरलेला असतो. दरवाजाच्या ठिकाणी किमान पाच जणी उभ्या असतात. दोन्हीकडे दरवाजे लावले की दहा जणींची जागा आपोआपच कमी होते. या दहा जणी फलाटावरच राहिल्या तर पुढच्या लोकलमधील गर्दी साहजिकच वाढते, त्याही लोकलला दरवाजे असले की आणखी दहा जणींचा प्रश्न निर्माण होणार, असे लोकलने नियमित प्रवास करणाऱ्या नेहा परुळेकर यांनी सांगितले. शिवाय लोकल थांबता थांबताच अर्धे प्रवासी उतरतात. मात्र हे दरवाजे उघडायला एवढा वेळ लागत होता की तोपर्यंत चढणाऱ्यांचीही त्रेधातिरपीट उडत असे, असे निर्णय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असले तरी त्याआधी लोकलमधील प्रवासीसंख्या कमी करण्यासाठी पर्यायी उपाय करावे लागतील, असे मत त्यांनी मांडले.
अर्थात गर्दीच्या वेळेलाच महिलांच्या डब्यात समस्या येत नाहीत. कमी गर्दी असतानाही आत उभे राहून जागा मिळण्याची वाट पाहण्याऐवजी दरवाजात ठाण मांडून बसणाऱ्या महिलांचे काय करावे तेदेखील नियमित प्रवाशांना समजत नाही. इथे चांगला वारा लागतो, या वाक्यापासून माझे गाठोडे ठेवलेय, आत गर्दी होती, तुमचे काय जाते, तुम्ही मधल्या बाजूने उतरा, आम्ही रोज इथेच बसतो, बाकीच्यांना समस्या येत नाही, तुम्ही पहिल्यांदा आला आहात वाटते.. येथपर्यंत कोणतेही वाक्य तोंडावर फेकले जाते. अर्थात वाद वाढला तर शिवीगाळ आणि शारीरिक हाणामारीपर्यंतही प्रकरण जाते. गर्दी जेवढी जास्त तेवढे वाद अधिक असे हे समीकरण आहे, असे उषा गोडसे यांनी सांगितले. याशिवाय दुपारच्या वेळेत रिकाम्या लोकलमध्येही वारा खायला दरवाजावर हिंदूकळणाऱ्या महाविद्यालयीन कन्यकांचा गट असतो. त्या गप्पांमध्ये एवढय़ा रममाण झालेल्या असतात की एखादीची ओढणी बाहेरच्या खांबाला अडकण्याचीही भीती असते. अशा वेळी दरवाजा लावण्याची गरज खरेच अधोरेखित होते, असे आणखी एक महिला प्रवासी म्हणाल्या.
ठाण्याहून सकाळी ९.५४ वाजता सुटणाऱ्या जलद लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातील १६ जागांसाठी चक्क रांग लावली जाते. मागून येणाऱ्या व चटकन लोकलमध्ये चढून जागा पटकावणाऱ्या महिलांऐवजी रांगा लावून जागा मिळवण्याचा हेतू यामागे असला तरी त्यात गटबाजी होते. ही प्रथा माहिती नसलेल्या स्त्रियांनाही जागा न देण्याची अरेरावी केली जाते. त्यातच या जागांवर बसण्यासाठीही आधीच क्लेम लागलेले असतात, हे नियमबाह्य़च आहे, असे प्राची परांजपे हिने सांगितले.