इथे घाऊक बाजार आहे आणि एकाच वेळी जास्त संख्येने वस्तू खरेदी केल्यास त्या स्वस्त मिळतात. हे इथलं आकर्षण आहे. अनेक चिनी मोबाइल या बाजारात १५०० ते ३००० रुपयांपर्यंत मिळतात. तर ४ गिगाबाइटपर्यंतच्या मेमरी कार्डची किंमत १५० रुपयापर्यंतही मिळतात. काही अभ्यासकांच्या मते १९४० ते १९५० या काळात येथे तस्करीच्या वस्तू विकल्या जात होत्या. मात्र सध्या या बाजारावर चिनी वस्तूंचा प्रभाव दिसून येतो.

मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड या आजच्या पिढीच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंची रेलचेल असते. म्हणजे येथे वेगवेगळे ब्रँड अस्तित्वात आहेत. महागडय़ा आणि मोठय़ा ब्रँडचे मोबाइल येथे आहेत. अर्थातच ही बाजारपेठ खिशाला परवडणारी आहे. इथल्या इलेक्ट्रॉनिक आणि मोबाइलशी निगडित वस्तूंची विश्वासार्हतेची हमी मात्र देता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुमारे १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर मोहम्मद अली रोडवर मनीष मार्केट या नावाची मोठी बाजारपेठ वसली आहे. या बाजारात प्रामुख्याने मोठमोठय़ा ब्रँडचे नक्कल केलेले मोबाइल वा जुने मोबाइल विकले जातात. गेल्या काही वर्षांत नवीन मोबाइल विकणारी दुकानेही सुरू झाली आहेत. साधारणपणे या बाजारावर चिनी वस्तूंचा प्रभाव दिसून येतो. मनीष मार्केटच्या मागच्या बाजूला लोहार चाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तू घाऊक भावात विकल्या जातात.

मोहम्मद अली रोडवर उजव्या हाताला दर्शनी भागात मनीष मार्केट लिहिलेली पाटी दिसून येते. यातून आत गेल्यावर उजव्या व डाव्या बाजूला छोटय़ा गल्ल्या गेल्या आहेत. याच्या दोन्ही बाजूला मोबाइल, घडय़ाळ, चष्मे यांची दुकाने दिसतात. या बाजारात प्रवेश केल्यानंतर दिव्यांच्या झगमगाटाने डोळे दिपून जातात. मोबाइलची बाजारपेठ पाहत पाहत पुढे जात असताना दुकानदार आपुलकीने तुम्हाला खरेदी करण्यासाठी आमंत्रित करीत असतात. येथे आयफोन ४ पासून आयफोन ७ पर्यंतच्या सर्व प्रकारचे फोन उपलब्ध आहेत. येथे आयफोन ४ ची किंमत १० ते १५ हजारांपासून सुरू होते. तर आयफोन ७ साठी केवळ २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात. या सर्व किमती अवाक करणाऱ्या आहेत. या फोनची खरेदी करताना दुकानदार वर्षांची वॉरंटी असल्याचे सांगत असला तरी हे फोन नक्कल केलेले आहेत. त्यामुळे हे फोन किती काळ टिकतील याची शाश्वती कमीच असते. सध्या मनीष मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ६० ते ७० दुकाने आहेत. मनीष मार्केटच्या परिसरात सुमारे ५० ते ६० दुकाने आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दररोज तरुणाईची मोठी गर्दी असते. त्यातही आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त. मोबाइल विकत घेण्याबरोबर मोबाइलचे विविध भाग घेण्यासाठीही येथे मुंबई व उपनगरातून ग्राहक येत असतात. नामवंत कंपन्यांचे मोबाइलचे भाग विकत घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. मात्र मनीष मार्केटमध्ये हे भाग अगदी निम्म्याहून कमी किमतीत मिळतात. मोबाइलबरोबरच फॅन्सी लायटर, विविध प्रकारचे चष्मे, ब्लू टूथ, की-चेन, फॅशनेबल घडय़ाळे खरेदी करण्यासाठी मुलांबरोबर मुलीही आवर्जून येतात. या मनीष मार्केटच्या मागच्या बाजूला या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे गोदाम आहे. या गोदामात मनीष मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात.

मीनल गांगुर्डे

meenal.gangurde8@gmail.com