‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’, ‘डोनाल्ड ट्रंप’, ‘नरेंद्र मोदी’, ‘व्लादिमीर पुतीन’ यांसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांमागे कोट्यावधी लोक अगदी परमेश्वराच्या भक्तीत न्हाउन गेलेल्या भक्तांसारखे कसे काय उभे राहतात? हा खरेच मती गुंग करणारा प्रश्न आहे. कारण या मंडळींनी कधीही ‘शिवाजी महाराज’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘नेपोलियन’ यांप्रमाणे थेट रणसंग्रामावर उतरुन शौर्य गाजवले नाही. किंवा कधी ‘महात्मा गांधी’, ‘नेल्सन मंडेला’ यांप्रमाणे देशहितासाठी अन्नत्याग केल्याचेही ज्ञात नाही. शिवाय यांचा वैचारीक व्यासंग ‘लोकमान्य टिळक’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘लेनिन’ यांसारखा असेल का? याबाबतही शंका उपस्थित करावी अशी बेताल विधाने रोजच्या रोज ही मंडळी करत असतात. तरीही दिवसागणीक यांचा भक्तसंप्रदाय वाढतच चालल्याचे दिसुन येत आहे.

माझ्या मते या नेत्यांकडे असलेली जबरदस्त संभाषण शैली हीच यांच्या लोकप्रियतेची खरी चावी आहे. यांची पटकथा कोणी का लिहेना पण यांचे सादरीकरण एखाद्या दर्जेदार अभिनेत्याला लाजवेल इतके प्रभावी असते. परंतु या पुढाऱ्यांच्या मोठमोठ्या जत्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवल्या जात असतानाच असाच एक खेळ आपला मराठी माणुस ‘राज ठाकरे’ गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात खेळतो आहे. वक्तृत्वाचे खेळ महाराष्ट्राला तसे नवीन नाहीत. याआधी ‘आचार्य अत्रे’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘श्रीपाद डांगे’, ‘प्रबोधनकार ठाकरे’, ‘पु.ल. देशपांडे’ यांसारख्या अनेक तेजस्वी व्यक्तिमत्वांनी असे खेळ यशस्वीपणे राबवले आहेत. पण तुर्तास आपण फक्त ‘राज ठाकरे’ यांच्या संभाषण शास्त्राचा विचार करु. कारण राज यांची शैली, विषयाची मांडणी, उभे राहण्याची पद्धत, प्रत्येक शब्दावरील दाब, उच्चर, सुचक हालचाली, सभेची पुर्वतयारी, सभेत निर्माण केले जाणारे वातावरण हे महाराष्ट्रातील इतर पुढाऱ्यांच्या तुलनेने नक्कीच पुढारलेले आहे. अगदी बारीक निरिक्षण केले तर राज यांच्या संभाषण कौशल्यात ‘बाळ ठाकरें’पेक्षाही जास्त मला ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ डोकावताना दिसतो.

मानसशास्त्रीय परिभाषेत हिटलर सामुदायीकरीत्या खेळत असलेल्या या खेळाला ‘Suggestion’ असे म्हणतात. हा सामुदायीक संमोहनशास्त्राचाच एक प्रकार आहे. या तंत्राव्दारे स्वत:च्या आदेशानुसार दुसऱ्या माणसाचे वर्तन नियंत्रीत करता येते. शिवाय स्वत:च्या सोयीप्रमाणे त्यांचा वापरही करता येतो. ‘हिटलर’, ‘स्टॅलिन’, ‘फ्रांसेस हरारे’ सारखे जादुगार, ‘मायकल जॅक्सन’ सारखे पॉपस्टार हा खेळ मोठ्या पातळीवर खेळायचे. हा तंत्रशुद्ध खेळ देशात ‘नरेंद्र मोदी’ आणि राज्यात सध्या ‘राज ठाकरे’ खेळत आहेत.

याची सुरवात केली ती हिटलरने उंच व्यासपीठ, व्यासपीठावरील इतर पुढारी मुख्य वक्त्यापासुन बरेच दुर बसलेले, शक्यतो मुख्य वक्ता एकटाच व्यसपीठावर उभा असे. त्याच्यावर पाडलेला स्पॉट लाईट, प्रेक्षकांमध्ये अंधार एकंदरीत सर्व व्यवस्था प्रेक्षकांचे लक्ष जराही विचलीत न होता केवळ वक्त्यावरच राहील अशी केलेली सोय. शिवाय जोडीला मंत्रमुग्ध करणारे संगीत, या सर्व गोष्टींनी हिटलर प्रेक्षकांना मोहुन टाकायचा. त्याच्या तथाकथील उत्स्फुर्त वाक्यांवर प्रेक्षक टाळ्या कुटायचे. त्याच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जायच्या. वास्तविक घोषणा देणारे पैसे चारुन प्रेक्षकांमध्ये रोवले जायचे. या सर्व धुंद करणाऱ्या वातावरणाचा सामान्य बुद्धीमत्तेच्या माणसावर पार खोलवर परिणाम होतो. एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या समुहात माणसाच्या सद्सद् विकेक बुद्धीला, त्याच्या तर्काला पार गाढुन टाकण्याची क्षमता असते. हिटलरने मानशास्त्रीय क्लुप्त्या वापरुन अनेक विचारवंतांचा बुद्धीभ्रंष केला.

आज गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी केलेले भाषण आठवावे. त्यांनी हिटलरचेच तंत्र जसाच्या तसे वापरल्याचे आपल्या ध्यानात येईल. सभेसाठी अगदी नियोजन पद्धतीने निवडलेला मराठी संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा गुढी पाडवा हा सण. मराठी अस्मीतेला आव्हान देण्यासाठी निवडलेला हा योग्य दिवस म्हणता येईल. सुस्पष्ट भाषाशैली, अचुक संदर्भ, अधुन मधुन हलके फुलके विनोद, प्रेक्षकांमधुन जय मराठी जय महाराष्ट्र सारख्या दिल्या जाणाऱ्या घोषणा, वृत्तमाध्यमांचे लाईव्ह कव्हरेज त्यामुळे कोणताही विशेष राजकीय कार्यक्रम नसताना, इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत कार्यकर्त्यांची टंचाई असताना, काही विशेष कामगीरी न बजावताही विरोधी पक्षांसकट संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष फक्त ‘राज ठाकरे’ यांच्यावरच खिळुन होते. फक्त वक्तृत्वाच्या जोरावर फुटेज खाणारा महाराष्ट्रातील सध्याचा एकमेव पुढारी म्हणजे ‘राज ठाकरे’ होय. थोडक्यात काय तर निवृत्त झाल्यानंतरही ‘सचिन तेंडुलकर’ ‘विराट कोहली’च्या फलंदाजीतुन डोकावताना दिसतो. तसाच हिटलरचा अप्रत्यक्ष सहभाग ‘राज ठाकरें’च्या संभाषण कौशल्यातुन दिसतो.