फुटीच्या भितीने शिवसेना सत्तेतही अन् विरोधातही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाच, जनतेच्या भल्यासाठी सरकारवर अंकुश ठेवल्याचे सांगत,  सत्तेतून बाहेर पडण्यासाठी मी मुहुर्त बघणार नाही हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आणखी एक इशारा लक्षात घेता शिवसेना लगेचच सत्तेतून बाहेर पडणार नाही हे तर स्पष्टच झाले. पण त्याचबरोबर भाजप आणि सरकारच्या विरोधातील तोफ गरजत राहणार हेही सुचित केले. म्हणजेच शिवसेना सत्ताही उपभोगणार आणि भाजपवर टीकाटिप्पणी करणार. हे पुढील निवडणुकीपर्यंत असेच सुरू राहणार हाच त्याचा मथितार्थ !

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भूमिका जाहीर करणार, असे सांगण्यात येत होते. वार्षिक दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपलाच लक्ष्य केले. पण त्याच वेळी लगेचच सत्तेतून बाहेर पडणार नाही हे सूचित केले. जनतेच्या भल्याकरिता सत्ता राबवितो, असा युक्तिवादही केला. सत्तेतून बाहेर पडण्याकरिता मुहुर्त बघणार नाही, असे ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी मुर्हुत शिवसेनेसाठी लगेचच योग्य ठरणार नाही.

शिवसेनेसाठी सध्या तरी सत्तेतून बाहेर पडण्याची ही वेळ नाही. कारण सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप दीड वर्षांचा कालावधी आहे. सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता जास्त आहे.  शिवसेनापेक्षा भाजपचा पर्याय बरा, अशी मानसिकता असलेले संधीची वाट बघत आहेत. शिवसेना आताच सत्तेतून बाहेर पडल्यास कार्यकर्त्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच भाजप सत्तेचा वापर करून शिवसेनेची कोंडी करू शकते. तसेच शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास राज्यातील भाजपचे सरकार गडगडण्याची शक्यता नाही. भाजपने १४५ हा बहुमताचा आकडा गाठण्याकरिता अन्य पर्यायांची तयारीही केली आहे.

केंद्र व राज्यातील सत्तेत भागीदार असतानाही ठाकरे यांनी सुमारे तासभराच्या भाषणात केवळ भाजप आणि मोदी यांनाच लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांवर मात्र त्यांनी टीका करण्याचे टाळले.  उद्धव यांनी महागाईवरूनही भाजपला फटकारले. तसेच गुजराती समाजाला लक्ष्य केले.