मुंबई विद्यापीठ आणि हॅरिसबर्ग विद्यापीठात करार

कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक शास्त्र, जैवतंत्रज्ञान, विज्ञान, डेटा सायन्स या कालसुसंगत क्षेत्रातील नवे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू होत आहेत. त्यासाठी  मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी पेन्सिलव्हेनिया यांच्यात बुधवारी शैक्षणिक करार झाला.

या करारानुसार विद्यापीठाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबर, पीएचडीही करता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षकांना हॅरिसबर्ग विद्यापीठात प्रशिक्षण घेता येईल. तेथील विद्यार्थी आणि शिक्षक येथे येऊ शकतील. विद्यार्थ्यांना क्रेडिट ट्रान्स्फरचा लाभही घेता येणार आहे. विद्यापीठात सुरू होत असलेल्या इक्युबेशन सेंटरसाठीही उपक्रम राबविण्यासाठी येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव  प्रोफेसर सुनील भिरूड यांच्यासह पेन्सिलव्हॅनिया स्टेटच्या राजदूत कनिका चौधरी, हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीचे वरीष्ठ विश्वस्त गव्हर्नर मार्क सिंगेल, मुख्य कार्यकारी अधिकारी पॅसिफिक  सिंथिआ ट्रॅएगर, हरिसबर्ग विद्यापीठाचे वरिष्ठ व्यवस्थापक डग फायरस्टोन आणि फॉरेन्सिक सायन्सचे संचालक रॉबर्ट फ्युरे यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि ज्ञानाचे आदानप्रदान करून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता वाढवून, विकासाला प्राधान्य देण्यासाठी तसेच बदलत्या काळाच्या गरजांना अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये नवे माहितीचे दालन खुले करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण करार आहे,’ असे मत डॉ. पेडणेकर यांनी व्यक्त केले.