बालसंगोपन आणि शिक्षणासोबत योगही अभ्यासता येणार

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमांत येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९-२०) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. नववीपासून विद्यार्थी हा पर्यायी विषय म्हणून घेऊ शकतील. त्याचप्रमाणे ‘बालसंगोपन आणि शिक्षण,’ ‘योग’ या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयांची ओळख सीबीएसईच्या शाळांमध्येच करून देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या विषयाचा समावेश येत्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रमांत करण्यात येणार आहे. मंडळाच्या विषय रचनेत सहावा पर्यायी विषय म्हणून कौशल्य विकास अभ्यासक्रम किंवा तृतीय भाषा घेता येते. त्यामध्ये आता नववीपासून ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा विषय विद्यार्थी घेऊ शकतील. या विषयाची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी, विद्यार्थ्यांना विषयाची ओळख करून देण्यासाठी शाळा आठवीच्या वर्गासाठी कार्यशाळा घेऊ शकतील. ही कार्यशाळा एकूण १२ तासांची असणे अपेक्षित आहे. आठवीला या विषयाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

उच्चमाध्यमिक स्तरावर (अकरावी आणि बारावी) ‘बाल संगोपन आणि शिक्षण’, ‘योग’ या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नर्सरी शाळा, पूर्वप्राथमिक शाळा, बालसंगोपनगृहांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. त्याचबरोबर ‘योगाभ्यासाचाही शालेय स्तरापासून समावेश झाला आहे. योगाचा प्रसार झाल्यामुळे अनेक खासगी प्रशिक्षण संस्थांही उभ्या राहिल्या आहेत. मात्र, या संस्थांमध्ये प्रशिक्षक मिळत नाहीत. या पाश्र्वभूमीवर व्यावसायिक विषयांमध्ये बालसंगोपन आणि शिक्षण, योग या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.सध्या नववी आणि दहावीच्या वर्गासाठी आता १७ कौशल्य विकास विषयांचे तर उच्च माध्यमिक वर्गासाठी ३९ विषयांचे पर्याय उपलब्ध आहेत. देशभरातील ६ हजार ५४३ शाळांमध्ये शिकवले जाणारे हे विषय साडेसहा लाख विद्यार्थी अभ्यासत आहेत.