रोजगार वाढणार असल्याचे मॅट रिडले यांचे मत

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलन यांचा विकास येत्या काळात अनेकांचे रोजगार हिरावून घेणार आणि एकूणच मानवासमोर गंभीर आव्हाने उभी राहणार, अशी भीती सामान्यजनांपासून अभ्यासकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. परंतु यापासून मानवी समाजास कोणताही धोका नसून त्याविषयीची भीती अनाठायी असल्याचे मत उत्क्रांतीवादनिष्ठ विज्ञानलेखक आणि पत्रकार मॅट रिडले यांनी व्यक्त केले.

गेल्या दोनशे वर्षांत मानवी समाजाने तंत्रज्ञान आणि स्वयंचलनाचा अनुभव घेतला आहे. या काळात रोजगार कमी न होता, उलट वाढलेलेच पाहायला मिळाले. तंत्रज्ञान-स्वयंचलनामुळे आधी एखाद्या समूहाला ज्या क्षेत्रात रोजगार मिळे, तो पुढे दुसऱ्या क्षेत्रात मिळू लागला, काम सोपे झाले आणि आर्थिक उत्पन्नही वाढले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही हेच होणार आहे. त्यामुळे रोबोंविषयी भीती बाळगण्याची गरज नाही, असे ठाम मत रिडले यांनी या वेळी व्यक्त केले.

‘टाटा लिट लाइव्ह’ या गुरुवारपासून सुरू झालेल्या साहित्य महोत्सवात शनिवारी झालेल्या परिसंवादात रिडले बोलत होते. ‘विज्ञानाची भाषा’ या सूत्राभोवती गुंफलेल्या या परिसंवादात वैद्यक लेखक इशरत सईद यांनी विज्ञान लेखनापासून उत्क्रांती, विषाणू, रोगप्रसार, स्वच्छता, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक विषयांवर रिडले यांच्याशी संवाद साधला.

‘द ओरिजिन्स ऑफ व्हर्च्यू’, ‘जीनोम’, ‘रॅशनल ऑप्टिमिस्ट’ ते अगदी अलीकडच्या ‘द इव्होल्यूशन ऑफ एव्हरीथिंग’ या गाजत असलेल्या पुस्तकांचे लेखक असलेल्या रिडले यांनी या वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या कुतूहलवजा भीतीच्या सध्याच्या वातावरणात त्याकडे कसे पाहावे, याची विचारदिशाच उपस्थितांना दिली.

सध्याच्या काळात आपला बहुतांश वेळ कामाच्या ठिकाणी खर्च होतो, स्वत:साठी मोकळा वेळ फार कमी उरतो, अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता-स्वयंचलनामुळे तशी उसंत मिळणार असल्याचे रिडले म्हणाले. विज्ञान लेखनाची भाषा सोपी ठेवण्यावरच भर द्यायला हवा. एड्ससारख्या रोगाविषयीचे लेखन असो वा पिकांच्या नासाडीविषयीचे, जगभरची माध्यमे विज्ञानविषयक बातम्यांना राजकीय रंग देण्याचाच प्रयत्न करतात. सर्वच गोष्टींकडे राजकीय चौकटीत पाहण्यापेक्षा त्यातील शास्त्रीयता समजून घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. विचारांची देवाणघेवाण आणि प्रावीण्य प्राप्त करण्याच्या मानवी समाजाच्या वृत्तीवर रिडले यांचे व्याख्यान रविवारी टाटा साहित्य महोत्सवात होणार आहे.

आजची सत्रे :

  • क्रिकेट हा धर्म का आहे?

वक्ते : बोरिआ मजूमदार, मायकेल ब्रेअर्ली, राजदीप सरदेसाई, सीबॅस्टिअन फॉल्क्स

  • भारतीय साहित्यातील नवे प्रवाह

वक्ते : आतिश तासीर, शुभांगी स्वरूप

  • स्मार्टफोन आणि भारतीय लोकशाही

वक्ते : रवी अग्रवाल

  • इस्लाम आणि आधुनिकता

वक्ते : डेबोरा मोगाक, नाझिया इरम, नीयाझ फारुकी.