दुरवस्थेबाबत पालिके ला अहवाल सादर करण्याचा निर्णय

नीलेश अडसूळ
मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोत खुले करावे, अशी मागणी होऊनही गतवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या तलावांवरील नियोजन, व्यवस्था, विसर्जनाची पद्धत यांकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे लक्ष असणार आहे. याचा अहवाल तयार करून पालिकेला सादर करण्यात येणार आहे.

गतवर्षी बऱ्याच विसर्जनस्थळांवर दुरवस्था दिसून आली. काही ठिकाणी विसर्जनादरम्यान मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त भाविकांनी समितीकडे तक्रार करत कृत्रिम तलावाला विरोध दर्शवला होता. यंदा तसे होऊ नये म्हणून समितीचे पदाधिकारी कृत्रिम तलावांवर लक्ष ठेवणार आहेत. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर गर्दी होऊ नये या उद्देशाने गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने मोठय़ा संख्येने कृत्रिम तलाव उभारले. परंतु काही तलावांवर दिवे नव्हते, कुठे मनुष्यबळ नव्हते, काही ठिकाणी विसर्जनादरम्यान मूर्तीची विटंबना होत होती तर काही ठिकाणी तात्पुरते विसर्जन करून मूर्ती बाजूला काढून ठेवल्या जात होत्या. हे दृश्य भाविकांनी पाहिल्याने मोठय़ा प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भाविक, मंडळांनी समन्वय समितीकडे तक्रारी के ल्या.

या तक्रारींची दखल घेऊन यंदा नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जनाच्या परवानगीसाठी समितीने पालिकेशी समन्वय साधला. परंतु त्या आधीच कृत्रिम तलावांची पूर्वतयारी पालिकेने सुरू केली असल्याने समितीचा नाइलाज झाला.

पालिकेचा निर्णय झाला असल्याने समितीने यामध्ये हस्तक्षेप केला नाही. परंतु कृत्रिम तलावांचे नियोजन, व्यवस्था, विसर्जनाची पद्धती यांकडे समिती काटेकोरपणे पाहणार आहे. समितीचे विभागवार सभासद आपापल्या विभागांतील कृत्रिम तलावांची पाहणी करणार आहेत. यावेळी हे सभासद पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करतील, तसेच दुरवस्था आढळल्यास ती नमूद करून त्याचा आहवाल पालिकेला सादर करण्यात येणार आहे.

नैसर्गिक जलस्रोतांची मागणी यंदा पूर्ण झाली नाही. परंतु कृत्रिम तलावांवरील ढिसाळ कारभारही चालवून घेतला जाणार नाही. पालिकेच्या कंत्राटदाराने गणेशमूर्ती या व्यवस्थित आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने विसर्जन करायला हव्या. म्हणूनच यंदाचा विसर्जन अहवाल पालिकेला देणार आहोत. विसर्जनाची जबाबदारी गणेश मंडळे उत्तमरीत्या पार पाडू शकतात,  शिवाय त्यांना अर्थसाहाय्यही होईल, यादृष्टीने मंडळांना कृत्रिम तलावांचे कंत्राट पुढच्या वर्षी मंडळांना द्यावे, अशीही मागणी केली आहे.

– नरेश दहीबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती