प्रत्येक राज्याला दहा हजार गायींचे उद्दिष्ट, पशुसंवर्धन अधिकारी हवालदिल

भरमसाठ उद्दिष्ट ठेवून मोहीम यशस्वी करण्याचा सरकारी खाक्या गरीब गायींच्या नशिबी आला आहे. देशातील शुद्ध देशी व गावरान गायींची संख्या वाढविण्याच्या भव्यदिव्य संकल्पासाठी केंद्रीय स्तरावरून २ ऑक्टोबर रोजी गांधीजयंतीदिनी तब्बल दोन लाख गायींना एकाच दिवशी कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भार करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र सोळा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कृत्रिम पद्धतीने गायींना माजावर आणण्याच्या सरकारी कार्यक्रमानंतर गायींच्या गर्भधारणा क्षमतेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले होते, या बाबीकडे राज्यातील पशुसंवर्धन खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

या ‘पाशवी’ मोहीमेत महाराष्ट्रासह वीस राज्यांना प्रत्येकी दहा हजार गायींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या फर्मानाचा कित्ता गिरवत राज्यानेही प्रत्येक तालुक्यातल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून परिसरातील निरोगी व गाभण नसलेल्या गायींची यादी पाठवण्यास सांगितले आहे!

असाच कार्यक्रम २००१ मध्ये झाला होता. मात्र या सामूहिक उपक्रमातून काही गायींना गर्भधारणा झालीच नव्हती. काहींची गर्भधारणा प्रक्रिया विस्कळीत झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर त्या गायींना दुसरा गर्भ राहण्यातही अडचणी आल्या. या गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास मात्र झाला नाही, याची खंत काही अधिकारीच व्यक्त करतात. दीड- दोन वर्षांपूर्वी अशा कार्यक्रमाचे सुतोवाच झाले तेव्हा या जुन्या अनुभवांची उजळणी झाली. त्यानंतर तो कार्यक्रम मागे पडला होता.

एक-दोन गायी असलेल्या गरीब शेतकऱ्याला वळू आणून नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणेसाठी अनुकूल स्थिती निर्माण करणे शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. हीट इंडक्शन तंत्राने गर्भधारणेचे प्रकार सुरक्षित असून गायीच्या शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सच दिले जात असल्याने व त्याचा परिणाम ७२ तासांपर्यंत राहात असल्याने त्याचे अन्य दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते, असे कोल्हापूर येथील कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितले.

एका दिवसाचा उत्सव

गुरांच्या एखाद्या केंद्रावर एकाच वेळी गर्भधारणेचा कार्यक्रम हाती घेणे योग्य असले तरी खेडय़ापाडय़ातील गायींपर्यंत पोहोचून एकाच दिवशी गर्भधारणेचा अट्टाहास करण्याची गरज नाही. त्यापेक्षा गायींना देण्यात येणाऱ्या खाद्याची मात्रा सुधारणे व त्यातून उत्तम जनावरे व दुधाची पैदास करणे यासाठी नियोजनबद्ध दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. एकाच दिवशी कृत्रिम रेतन हा केवळ एका दिवसाचा सोहोळा ठरण्याची भीती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तुटीच्या बाजू..

  • एकाच फार्मवर अनेक गायींची कृत्रिम गर्भधारणा केल्याने वैद्यकीय उपचार तसेच व्यवस्थापनाच्या इतर खर्चात कपात होत असली तरी खेडोपाडी असलेल्या शेतकऱ्यांना असा फायदा होण्याची शक्यता नाही.
  • नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीनेही गर्भधारणा शक्य असताना केवळ एकाच दिवशी गायींना माजावर आणण्याच्या अट्टाहासापायी त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येण्याची भीती.
  • गायींच्या देशी जाती जपणे आवश्यक आहे. मात्र अनेक जातींची शास्त्रीय माहितीदेखील संग्रहित नसताना इतर देशी गोवंशांचे संकर होण्याची भीती.

 

हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात गायींचा समावेश केल्याने या कार्यक्रमाबाबत जागृती वाढेल तसेच कृत्रिम रेतन प्रकाराबाबत लोकसहभाग वाढू शकेल.

कांतीलाल उमप, पशुसंवर्धन आयुक्त