News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : तुज चित्र म्हणू की शिल्प?

मुंबई ही अमूर्तवादी तैलचित्रांच्या ‘चळवळी’ची भूमी.

‘रॅम्पार्ट रो’ म्हणजे किल्ल्याच्या तटावरचा संरक्षक रस्ता. मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीतून निघून डाव्या हाताला वळलं की जो रस्ता ‘लायन गेट’पर्यंत जातो, त्याचं जुनं नाव रॅम्पार्ट रो आणि नवं? कैखुश्रू दुभाष मार्ग! याच रस्त्यावर आज ज्याला ‘आर्टिस्ट्स सेंटर’ म्हणतात, तिथं प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपमधल्या चित्रकारांनी चित्रप्रदर्शनं केली असल्यानं मुंबईच्या केवळ राजकीय इतिहासातच नव्हे, तर कलेच्या इतिहासातही या रस्त्याचं स्थान मोठं आहे. ‘काळा घोडा महोत्सव’ या रस्त्यावरच भरतो, हा त्या इतिहासाच्या मानानं एक योगायोगच! याच रस्त्यावर काही खासगी आर्ट गॅलऱ्या निघाल्या, त्यापैकी ‘हासिएन्दा’ (वारसाहक्काचं घर, या अर्थाचा स्पॅनिश शब्द) आणि ‘चेतना आर्ट गॅलरी’ या आता विरून गेल्या आहेत. पण हल्लीच कफ परेडहून इथं स्थलांतरित झालेली ‘गॅलरी सेव्हन’ आणि काही वर्षांपूर्वी एक बडे चित्रदलाल म्हणून ओळखले जाणारे विक्रम सेठी यांनी स्थापलेली ‘आयसीआयए’ (नावापुरती तरी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कन्टेम्पररी इंडियन आर्ट’) ही खासगी गॅलरी अशा दोन गॅलऱ्या बऱ्यापैकी चालू असतात. त्यापैकी ‘गॅलरी सेव्हन’नं तर आपली सगळी वैशिष्टय़ं जपून, जुने-जाणते चित्रकार राखून नव्यांपैकी ‘जाणत्यां’ची चित्रप्रदर्शनं सुरू ठेवली आहेत. मुंबई ही अमूर्तवादी तैलचित्रांच्या ‘चळवळी’ची भूमी. केवळ शंकर पळशीकर- व्ही. एस. गायतोंडे- प्रभाकर कोलते हे मुंबईत होते/ शिकले म्हणून नव्हे; तर तहहयात अमूर्तवादी, एकेकाळचे अमूर्तवादी आणि आता मांडणशिल्पकार, शाब्दिक मार्गदर्शनाच्या अजीर्णानंतर स्वत:ची वाट शोधणारे अगदी नवे अमूर्तवादी अशा अनेक प्रकारच्या तरुणांना गेल्या तीन दशकांत मुंबईकरांनी पाहिलं आहे आणि रामकुमारसार ते गणेश हलोई यांच्यासारख्या अमूर्तिकरणवाद्यांनाही मुंबईतच दाद मिळाली आहे, म्हणूनसुद्धा. या चळवळीला एके काळी ‘गॅलरी सेव्हन’चं योगदान होतं, ते आजही कायम असल्याची साक्ष पटवणारं प्रदर्शन म्हणजे प्रदीप नेरुरकर यांच्या चित्रांचं!

रॅम्पार्ट रोवर ‘आर्टिस्ट्स सेंटर’च्या अलीकडेच, तळमजल्यावरची आणि बंदिस्त पोर्चमुळे जरा झाकोळलेली ‘गॅलरी सेव्हन’ रस्त्यापेक्षा फुटपाथवरून चटकन दिसते. आत सध्या नेरुरकर यांची असलेली चित्रं विविधरंगी असल्यामुळे फुटपाथवरल्या चित्रप्रेमीचंही लक्ष तिथं वेधलं जातं.. आत गेल्यावर आणि सारी चित्रं पाहून झाल्यावर एक प्रश्न मात्र पडतोच :

यांना ‘चित्रं’ कसं म्हणणार? किंवा का म्हणावं?

सध्या सोयीसाठी आपण ‘चित्रं’ असाच उल्लेख करू. नेरुरकरांची ‘चित्रं’ही कडेनं पाहिली असता त्यांचा जाडपणा जाणवेल. कापशी लगद्याचं कागदासारखं सलग प्रतल मिळवून, ते रंगांत संपूर्ण भिजवून आणि अशी अनेक प्रतलं एकमेकांना जोडून- वेळप्रसंगी आधाराला गॉझसारखा (काही कागदी पाकिटांना अस्तरासारखा असतो, तसा) कपडा लावून ही ‘चित्रं’ सिद्ध झाली आहेत. म्हणजे एक प्रकारे, ती शिल्पंच आहेत. फक्त सपाट असणारी आणि लाकडी ट्रेसारख्या फ्रेममध्ये लावल्यावर चित्रांसारखीच दिसणारी शिल्पं!

नेरुरकर याआधी हॅण्डमेड कागदावर काम करायचे. मोजकेच गोंदणासारखे सांकेतिक आकार, रेषा किंवा त्रिकोणांचा अगदी थोडका वापर करूनही चित्राच्या अवकाशाला गूढार्थ आणणं, असं हे आधीचं काम होतं. तशा काही खाणा-खुणा गॅलरीचं दार उघडून आत शिरल्यावर लगेच पाठीमागे जे मोठं चित्र आहे, त्यात सापडतात. पण इथेही कुठल्या पेनानं किंवा ब्रशनं काम न करता खोदून काढल्यासारख्या रेषा नेरुरकर यांनी रेखल्या आहेत. त्याहीमुळे ‘शिल्प’ म्हणण्याचा मोह बळावतो.

चित्र किंवा शिल्प- काहीही म्हटलं, तरी ते तुम्हाला जे काही दिसतंय त्याचं ‘सगुण-सदेह’ वर्णन झालं. त्याच्या पलीकडे – निर्गुण -विदेहीपणाकडे पाहण्याचं निमंत्रण चित्रकार तुम्हाला देतो आहे.. आधी समोरून चित्राची भूमी किंवा ‘त्वचा’ पाहा, मग तिचा जणू उभा छेद वाटावा इतके थर पाहा आणि आतली हालचाल, त्यासाठी झालेली तगमग समजून घ्या आणि मग पुन्हा समोर येऊन भूमी अशीच का आहे याचा विचार करा.. हे सारं करत असताना या आकारांमधून काहीही- काहीही आठवलं, तरी ते ‘भलतंच’ मानून सोडून देऊ नका!

उलट, गॅलरीबाहेर येऊनसुद्धा या चित्राकडे पाहताना मला असंच का वाटलं असावं, याचा विचार सुरू ठेवून स्वत:ला प्रश्न विचारत राहावेत. अमूर्तकला कुणाला ‘कळते’ असं असतं की नाही ते माहीत नाहीत नाही.. पण ती एक तर ‘भिनलेली असते’ किंवा नसते, एवढं खरं.

फूल आणि स्त्रीदेह

पारिजातक, गुलाब, सूर्यफूल, झेंडू, बोगनवेल, ऑर्ड, अशी अनेक फुलं.. ही सारी फुलं पुरुषाला दिसतात का? दिसत असतील, पण मग फुलांमधून पुरुष काय पाहतो? याचं एक संभाव्य उत्तर दिलीप शर्मा यांनी दिलं आहे- स्त्रीदेह आणि फूल यांचा नाजुकपणा पुरुषाच्या दृष्टीने सारखाच. दिलीप शर्मा यांच्या चित्रांमधल्या स्त्रीदेहांनी फुलंच परिधान केली आहेत किंवा फुलांच्या पाकळ्यांसारखा आकार आलेल्या निऱ्या/घडय़ा असलेले पोशाख घातले आहेत. ‘योगा’साठी मुद्दामहून जे नायलॉनचे तंग कपडे घातले जातात, तसे कपडे या चित्रांमधल्या अनेक स्त्रीदेहांच्या अंगावर आहेत. ‘धतुरा’ या एकमेव चित्रात पुरुष (पाठमोरा) आहे.

शर्मा हे मूळचे मुद्राचित्रणकार. त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषयही ‘राजस्थानातील ‘ठप्पा’ प्रिंट’ हा होता. पुनरावृत्त होत जाणारा एकसाची आकार, हा त्यांच्या चित्रांमध्ये तिथून आला. शिवाय, अगोदर मुद्राचित्रणाद्वारे आऊटलाइन कागदावर उमटवून मग त्यात हलके जलरंग भरता-भरता शर्मा ‘चित्रकार’च झाले आणि पेन्सिलीनंच कागदावर आकार काढून जलरंग भरू लागले. त्यांच्या चित्रांतले रंग एक तर फिके किंवा अगदी भडक म्हणावेत असे असतात. रंगलेपन पातळच असतं. जाड रंगलेपन आणि जर्द छटा नसतात. त्यामुळे या सर्व चित्रांना नटवा हळवेपणा येतो. तरीही, देशी-विदेशी संस्कृतीचा मेळ घालणारी ही चित्रं ठरतात.

अमुक फूल अमुकच चित्रातल्या स्त्रीसाठी का वापरलं, याचा थांग ही चित्रं पाहाताना फारसा लागत नाही. अपवाद म्हणून, बोगनवेल या चित्रातल्या स्त्रीनं अगदी बोगनवेलीसारखी कमान टाकली आहे. या आणि अन्य एक-दोन चित्रांना अगदी मंद रंगांत खजुराहोसारखी पाश्र्वभूमी आहे.

याखेरीज फायबरची पण पोर्सेलीनसारखी चकचकीत/ गुळगुळीत दिसणारी दोन शिल्पंही प्रदर्शनात आहेत. एकात कमळातली व्हीनससारखी उभी मॉडेल, दुसऱ्यात पेन्सिलींच्या ‘शरपंजरा’सारख्या टोकांवर पडलेला चित्रकार, अशी ही शिल्पं. त्यांची नावं ‘आर्टिस्ट’ आणि ‘म्यूस’ अशी आहेत. चित्रकार पुरुष, स्फूर्तिदेवता स्त्री – हे जुनंच रोमँटिक समीकरण हाही चित्रकार (बहुधा) मानतो!

काहीही असो, या चित्रांमागली मेहनत प्रेक्षकाला दिसते. ‘फ्लॉवर पेटल्स’ या मालिकेत अगदी छोटय़ा ड्रॉइंग्जचे समुच्चय एकाच फ्रेममध्ये आहेत (अशा तीन मोठय़ा फ्रेमपैकी पहिलीत  ६०, दुसरीत ४८ तर तिसरीत ३५ चित्रं आहेत). यापैकी पहिल्या दोन फ्रेममध्ये चित्रकारानं अन्य सांस्कृतिक आकारांची (अगदी काही राष्ट्रपुरुषांचे रोज शाळेबिळेत दिसणारे चेहरेसुद्धा) सरमिसळ केली आहे. तर तिसऱ्या फ्रेममध्ये  ३५ फुलांच्या आकारांची पेन्सिल ड्रॉइंग्ज आहेत. या प्रत्येक फुलाचा नीट अभ्यास दिलीप शर्मा यांनी केला आहेच. तेव्हा स्त्रीदेहांपेक्षा फुलांकडे या चित्रांतून जास्त लक्ष जावं, हे अधिक बरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2016 3:18 am

Web Title: artist centre mumbai gallery
Next Stories
1 पोखरणची वाट अरुंदच!
2 पर्जन्य जलसंधारणाने अवघे गाव समृद्ध!
3 एमआयडीसीच्या जागेवरील सोसायटय़ांचा प्रश्न सुटणार
Just Now!
X