कांदिवलीतील दुहेरी हत्याकांड * प्रमुख सूत्रधार विद्याधर राजभर अद्याप फरार
प्रख्यात चित्रकार हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरीश भंबानी यांच्या हत्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अखेर दहा दिवसांनंतर हेमाचा पती व चित्रकार चिंतन उपाध्याय याला मंगळवारी अटक केली. या हत्येमागील नेमका हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या हत्याकांडातील फरारी आरोपी विद्याधर राजभर याच्यासोबत कट आखून हेमाचा काटा काढला, असा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. याबाबत अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरूनच चिंतनविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी यांची हत्या झाल्याचे १२ डिसेंबर रोजी स्पष्ट झाले होते. कांदिवली येथील नाल्यात या दोघांचे मृतदेह आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आजाद राजभर, प्रदीप राजभर, विजय राजभर आणि शिवकुमार ऊर्फ साधू राजभर यांना अटक केली होती. हेमासाठी काम करणारा विद्याधर मात्र अद्याप फरार आहे. विद्याधरच्या स्टुडिओमध्ये हेमा आणि हरीश यांची हत्या करून त्यांचे मृतदेह टेम्पोने नाल्यात टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांना चिंतनवर संशय होता. परंतु कुठलाही पुरावा हाती लागत नव्हता. कांदिवली पोलिसांसमवेत अन्य पोलीस ठाण्यातील काही अधिकारीही तपास करीत होते. त्याच वेळी गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही समांतर तपास सुरू होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंतनची सलग चौकशी केली होती. दररोज त्याला चौकशीसाठी बोलाविले जात होते. परंतु काही हाती लागत नव्हते. परिस्थितीजन्य पुरावे चिंतनच्या विरोधात जात होते. परंतु त्यावरून त्याला अटक करता येणे अशक्य होते, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
गुन्हे अन्वेषण विभागातून बाहेर पडलेल्या चिंतनला कांदिवली पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले. अतिरिक्त आयुक्त फत्तेहसिंह पाटील तसेच उपायुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चौकशीनंतर चिंतनला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंतनला महानगरदंडाधिकाऱ्यांकडे हजर केले असता त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्याधर हा चिंतनसाठीही काम करीत असल्यामुळेच तो त्याच्याशी सतत संपर्कात होता, असा दावा चिंतन यांचे वकील अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात केला.

परिस्थितीजन्य पुरावे चिंतनच्या विरोधात?
हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विद्याधर राजभर याला अद्याप पोलीस अटक करू शकलेले नाही. विद्याधरच्या अटकेनंतरच हत्येमागील खरा हेतू स्पष्ट होणार आहे. विद्याधरच्या अटकेची वाट न पाहता चिंतन उपाध्यायला अटक करण्यामागे परिस्थितीजन्य पुरावे त्याच्या विरुद्ध असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गेले चार-पाच दिवस चिंतनची गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली युनिटमार्फत चौकशी सुरू होती. हेमा आणि चिंतन यांच्यातील भांडणाचे अनेक लघुसंदेश मिळविण्यात यश आले होते. अटकेतील आरोपींचे तसेच चिंतनच्या मोबाइल फोनचे सीडीआर पोलिसांनी तपासले. परंतु गुन्हे अन्वेषण विभागाला काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. सोमवारी मध्यरात्री कांदिवली पोलिसांनी चिंतनला चौकशीसाठी पाचारण केले. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्या उत्तरात विसंगती आढळून आली. त्यानंतरच त्याच्या अटकेचा मध्यरात्री उशिरा निर्णय घेण्यात आला. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड अर्जात पोलिसांनी म्हटले आहे की, हेमाच्या हत्या कटासाठी चिंतनची विद्याधरशी अज्ञात ठिकाणी भेट झाली होती. या भेटीतच कट शिजला. हत्याकांडानंतरही फरारी आरोपी विद्याधर हा चिंतनच्या सतत संपर्कात होता.