छायाचित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोरिवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात या चारही आरोपींना मंगळवारी सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी काल याप्रकरणी शिवकुमार उर्फ साधू राजभर यास वाराणसी येथून तर प्रदीप राजभर, आझाद राजभर आणि विजय राजभर यांना मुंबईतून अटक केली होती. न्यायाधीशांनी या चारही आरोपींना १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या हत्याप्रकरणासंबंधी अधिक तपासाचे आदेश दिले आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भांबानी यांचे मृतदेह रविवारी कांदिवली येथील एका नाल्यात आढळले होते. दरम्यान, हेमा यांचे पती हेमंत उपाध्याय आणि अन्य दोन जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. हेमा आणि त्यांच्या पतीमध्ये व्यावसायिक वाद सुरू होते. जुहूमधील घरात हेमा राहात होत्या तर त्यांचे पती दिल्लीत राहतात. तसेच हेमा आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या खटल्याचे काम भंबानी पाहात होते.