News Flash

चित्रकार हेमा उपाध्याय यांची हत्या

कांदिवली परिसरातील डहाणूकरवाडी स्मशानभूमीजवळ उपाध्याय आणि भांबानी यांचे मृतदेह आढळून आले.

चित्रकार हेमा उपाध्याय यांची हत्या
हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील भंबानी यांची हत्या व्यावसायिक वादातून आणि पैशांच्या देवघेवीतून झाली असल्याची माहिती समोर आली आहे

कांदिवली येथील नाल्यात त्यांच्या वकिलाचाही मृतदेह सापडला
चित्रकार, छायाचित्रकार आणि मांडण शिल्पकार म्हणून जगविख्यात असलेल्या हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरीश भांबानी (६५) यांचे मृतदेह रविवारी कांदिवली येथील एका नाल्यात आढळले. या घटनेमुळे मुंबईतील कलाजगताला धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणात हेमा यांच्या पतीसह तिघांची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवली परिसरातील डहाणूकरवाडी स्मशानभूमीजवळ उपाध्याय आणि भांबानी यांचे मृतदेह आढळून आले. नाल्यामध्ये कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या एका कामगाराला रविवारी नाल्यात दोन वेगवेगळी खोकी दिसली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या खोक्यांमध्ये हे मृतदेह आढळून आले. या दोघांचीही हत्या गळा दाबून करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोघांची शनिवारी हत्या करून त्यांचे मृतदेह खोक्यांमध्ये ठेवण्यात आले असावेत, अशी शक्यता आहे.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंतही हेमा उपाध्याय घरी न पोहोचल्याने त्यांचे मदतनीस हेमंत मंडल यांनी तर मृत हरीश भांबानी हेही घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कोण होत्या हेमा उपाध्याय?
हेमा उपाध्याय या छायाचित्रकार व शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना छायाचित्र व शिल्पकलेतील प्रावीण्याबाबत ‘गुजरात कला अकादमी’ व ‘राष्ट्रीय कला अकादमी’ यांच्याकडून गौरविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून दिली जाणारी राष्ट्रीय शिष्यवृत्तीही त्यांना मिळालेली होती. रोम येथे २००९ मध्ये झालेले ‘मॅक्रो म्युझियम’ प्रदर्शन तसेच अन्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्येही त्यांच्या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. हेमा या प्रसिद्ध शिल्पकार चिंतन उपाध्याय यांच्या पत्नी आहेत. बडोद्यात जन्मलेल्या हेमा उपाध्याय नव्वदीच्या दशकात मुंबईत आल्या. २००१मधील त्यांच्या ‘स्वीट स्वेट मेमरीज’ या प्रदर्शनातून त्यांच्या मांडणशिल्प, चित्रकला, छायाचित्रकला आदी सर्व गुणांची ंओळख कलारसिकांना अनुभवता आली. छोटय़ा आकारांत झोपडय़ा, घरे एकत्रित केलेली त्यांची मांडणशिल्पे प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांची प्रदर्शने देश-विदेशांत गाजली. एका प्रदर्शनात त्यांनी २ हजारांहून अधिक हुबेहुब वाटावी अशी कागदी झुरळे तयार करून त्यांनी सर्वाना चकित केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 7:01 am

Web Title: artist hema upadhyays murder
Next Stories
1 मालाड येथे पुलाचा काही भाग कोसळून तीन वाहनचालक जखमी
2 रेल्वे वसाहतीतील रहिवाशांचा ‘रेल रोको’ अनियमितत, अशुद्ध पाणीपुरवठा
3 मागासवर्गीयांची २९ हजार पदे रिक्त
Just Now!
X