अभिजीत ताम्हणे, लोकसत्ता

मुंबई : ऑस्कर विजेत्या पहिल्या भारतीय या प्रसिद्धीपलीकडे भानु अथय्या यांची विविधांगी ओळख त्यांना आदरांजली वाहणारी अनेक माध्यमे करून देत असतानाच, चित्रपटक्षेत्रावर आपला अभ्यासू आणि कलात्म ठसा उमटवणाऱ्या या वेषभूषाकर्तीने साठ वर्षांपूर्वी रंगवलेली चित्रे पाहाण्याची संधी एका चित्रलिलावामुळे मिळते आहे.

हा चित्रलिलाव येत्या २ डिसेंबरला होणार असला, तरी यापैकी अनेक चित्रे आताही संकेतस्थळावर पाहाता येतात आणि त्यातून भानु राजोपाध्ये-अथय्या यांचा चित्रप्रवासही उमगतो.

भानु अथय्या यांनी निधनानंतर आपल्या आठवणी कशा जतन व्हाव्यात याच्या पूर्ण विचारांती, स्वत:ला मिळालेले ऑस्कर मानचिन्ह ज्यांनी दिले त्यांनाच, म्हणजे अमेरिकेतील अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस या संस्थेला परत केले होते. ते त्या संस्थेच्या संग्रहालयात राहील याची तजवीज केली होती. मात्र आठवण म्हणून जपलेली स्वत:ची चित्रे गुणग्राहकांच्या हातीच पडावीत, यासाठी त्यांनी मुंबईतील एका छोटेखानी लिलाव संस्थेची निवड केली. रीतसर करारमदार होऊन ही काही चित्रे लिलाव संस्थेकडे आली आणि भानु यांच्या अखेरच्या दिवसांतच लिलावाच्या तारखा ठरल्या. या चित्रांतून अथय्या यांचा तरुणपणीचा जीवनपटच सामोरा येतो..