परीक्षकांच्या सूचनेनुसार सादरीकरणात सुधारणा करण्याचा प्रयत्न

मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागीय प्राथमिक फेरीतून पात्र ठरलेल्या सहा महाविद्यालयांच्या एकांकिकेचे कलाकार विभागीय अंतिम फेरीसाठी कसून तालीम करत असतानाच, विभागीय अंतिम फेरीपर्यंत न पोहोचू शकलेल्या एकांकिकांचे कलाकारही स्वस्थ बसलेले नाहीत. प्राथमिक फेरीत परीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार हे कलाकार आपल्या एकांकिकेच्या सादरीकरणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिको स्पर्धेची मुंबईतील प्राथमिक फेरी पार पडली. विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सहा महाविद्यालयांवरच सर्व नाटय़प्रेमींचे लक्ष केंद्रित झाले असले तरी ज्या महाविद्यालयांची निवड पुढच्या फेरीसाठी झालेली नाही, त्यांच्या तालमीही तितक्याच उत्साहाने सुरू आहेत. परीक्षकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार बदल करण्याबाबत लेखक-दिग्दर्शक प्रयत्नशील आहेत. विभागीय अंतिम फेरीला हजर राहून इतरांकडून नवीन गोष्टी शिकण्याचा विचार कलाकार करत आहेत. शिवाय एकमेकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या एकांकिके तील चांगल्या गोष्टी आणखी चांगल्या करण्याकडे कलाकारांचा कल आहे. या सर्व महाविद्यालयांचे ‘लोकांकिका’ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरीही त्यांची जिद्द कायम आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आणखी काही स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा विचार सुरू आहे. कारण आम्हाला आमचा विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. याच्या आधीही अनेक स्पर्धांमध्ये आम्ही प्राथमिक फेरीतून बाद झालो आहोत. मात्र या सर्व स्पर्धांची अंतिम फेरी पाहायला आम्ही आवर्जून जातो. कारण तेथे इतरांकडून शिकायला मिळते,’ असे डी. टी. एस. एस. महाविद्यालयाची अभिनेत्री पूर्वा घोसाळकर हिने सांगितले.

डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयाच्या एकांकिकेसाठी लेखन-दिग्दर्शन केलेला साईश तोडणकर यानेही याला पुस्ती देत लगेच पुढच्या स्पर्धेसाठी तालीम सुरू केल्याचे सांगितले. ‘परीक्षकांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार बदल करत आहोत. या अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनीच मिळून एकांकिका बसवली आहे. त्यामुळे अनुभव कमी पडला. अशा स्पर्धांमुळे सहभागी होण्याची जिद्द वाढत जाते. आम्ही विभागीय अंतिम फेरी पाहायला जाणार आहोत. त्यातून काही गोष्टी शिकायला मिळतील,’ असे त्याने सांगितले.

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा करण्याचे आमचे हे पहिलेच वर्ष आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्राधान्य अभ्यासालाच असते. मात्र तरीही आम्ही गेली दोन वर्षे महाविद्यालयात नाटक सादर करत आहोत. त्यामुळे आवड निर्माण झाली आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. लोकांकिकाच्या प्राथमिक फेरीतून बाद झालो असलो तरीही परीक्षकांनी केलेल्या सूचनांचा नक्की विचार करू.

 – सुस्मित म्हात्रे, अभिनेता आणि संगीत संयोजक, रसायन तंत्रज्ञान संस्था

लोकसत्ता लोकांकिकेमध्ये सहभागी होणे हा छान अनुभव असतो. ‘लोकसत्ता’मुळे आम्हाला कलागुण सादर करायला व्यासपीठ मिळाले. लोकसत्ताचे आयोजन चांगले होते. परीक्षकांनीही चांगले मार्गदर्शन केले.

– वैभव देवरुखकर, इंदिरा गांधी महाविद्यालय.

आम्ही स्पर्धेत विजयी झालो नाही याचे दुख आहे. पण, ही एकच संधी नाही. पुढच्या वर्षीही या स्पर्धेत भाग घेऊ. पुढील वर्षी आम्ही अधिक तयारीनिशी भाग घेऊ. त्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी आहे. अंतिम फेरीतील एकांकिका पाहून आम्हाला आमच्या एकांकिकेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, हे समजेल.

– आकाश रुके, सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवन.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडत आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकिज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकिज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रोडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.