प्रत्येक कलावंताला सर्वात महत्त्वाची असते ती दाद! पहिल्याच मैफलीत अशी उत्स्फूर्त दाद मिळणे ही तर त्याच्यासाठी अपूर्वाचीच गोष्ट. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘शागीर्द’ या कार्यक्रमाद्वारे स्वरमंचावर पदार्पण करीत असलेल्या कलावंतांनाही रसिकांकडून अशीच मन:पूर्वक दाद हवी आहे. या दोन्ही युवा कलाकारांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या सादरीकरणाला त्यांचे गुरू स्वत: उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देणार आहेत.
गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची शिष्या तेजश्री आमोणकर आणि जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांच्या गायन व वादनाचा आविष्कार बुधवारी, २२ जुलै रोजी मुंबईतील रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोन्ही कलावंतांसाठी हा कार्यक्रम जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच तो रसिकांसाठीही आहे. तेजश्री आमोणकर यांच्याबरोबर संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर आणि तबल्यावर प्रदीप दीक्षित तर ताकाहिरो अराई यांच्याबरोबर तबल्यावर शेखर गांधी साथसंगत करणार आहेत.
‘लोकसत्ता’च्या रसिक वाचकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे दि. २२ रोजी पृथ्वी एडिफिस प्रस्तुत ‘शागीर्द’ हा कार्यक्रम होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वाना प्रवेश खुला असणार आहे. २५ जुलै रोजी हा कार्यक्रम ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. दोन्ही दिवशी हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसात वाजता सुरू होईल.

केव्हा? बुधवार,
२२ जुलै सायंकाळी ६.४५ वाजता
कुठे? शिवाजी मंदिर, दादर
प्रवेश :  सर्वाना खुला. प्रथम येणारास प्राधान्य.