जे.जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्य शासनातर्फे उभारल्या जाणाऱ्या विख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या प्रस्तावित स्मारकाला अनेक ज्येष्ठ कलावंत आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी कडाडून विरोध केला आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयात अनेक मौलिक चित्रे धूळ खात पडली असताना एक नवी गॅलरी उभारण्यासाठी सरकारने खर्च करायचा हा असंगत प्रकार असल्याचा आरोप अनेक कलांवतांनी केला आहे. मात्र या विरोधाकडे सरकारने फारसे लक्ष दिलेले दिसत नाही.

गेल्या शनिवारी सर ज. जी. महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष्मण यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गॅलरी तयार करण्याचा निर्णय जाहीर केला. या प्रस्तावित कला दालनात लक्ष्मण त्याचप्रमाणे जे. जे.च्या तालमीत तयार झालेल्या काही नामांकित चित्रकारांच्या मौल्यवान चित्रकृती मांडण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक कलांवतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर ज. जी. कला महाविद्यालयात अनेक दुर्मीळ आणि दर्जेदार कलाकृती आहेत. परंतु शासानाचे या अनमोल खजिन्याकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे ती चित्रे अक्षरश: धूळ खात पडली आहेत. अशा परिस्थितीत आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारणे अयोग्य आहे, असे मत काही कलांवतांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ कलावंत माधुरी पुरंदरे यांनीही जे. जे. महाविद्यालयात असणाऱ्या दुर्मीळ चित्रांच्या देखभालीसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आम्ही आमची नापंसती कळवली. त्यांनी यावर आमच्या सोबत बठकदेखील घेतली. परंतु चच्रेतून काहीच निष्पन्न झाले नाही. सरकारने लक्ष्मण यांच्या स्मरणार्थ गॅलरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर कलावंतांचे म्हणणे सरकार ऐकून घेण्यास तयार नसल्याचे दिसते. स्वत:कडे असलेली मौलिक चित्रे धूळ खात ठेवायची आणि एक नवी गॅलरी उभारण्यासाठी खर्च करायचा यातला तर्क आमच्या लक्षात येत नसल्याची टीका एका ज्येष्ठ चित्रकाराने केली आहे. तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांनीही विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारचे हे वागणे अत्यंत चीड आणणारे आहे. सरकारकडे या विषयावर वारंवार बोलूनही काहीही उपयोग झाला नाही. दुर्मीळ चित्रांचा विषय तसाच पडून आहे. त्यामुळे या विषयावर बोलणे व्यर्थच आहे.

वासुदेव कामत, ज्येष्ठ चित्रकार

सर ज. जी. कला महाविद्यालयात १८७८ पासूनची सुमारे तीन हजार मौलिक चित्रे आहेत. शासनाचे दुर्मीळ ठेव्याकडे लक्ष नाही. या संबंधी  २००७ सालापासून पत्रव्यवहार करूनही सरकारने कोणताही विधायक प्रतिसाद दिला नाही. आर. के. लक्ष्मण यांचा सर ज. जी. कला महाविद्यालयाशी काहीच संबंध नव्हता. तेव्हा त्यांच्या स्मारकाचे मुळात काही प्रयोजनच नाही. व्यंगचित्रकलेचा सन्मान करावा असे जर सरकारच्या मनात असेल तर शंकरराव किर्लोस्कर यांचे स्मारक उभारले गेले पाहिजे.

 सुहास बहुळकर, ज्येष्ठ चित्रकार