कर व्यवस्थेच्या विरोधकांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका

वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही ‘अतिशय महत्त्वाची’ सुधारणा होती आणि तिचा फक्त दोन तिमाहींपुरता विकासात अडथळा आणणारा परिणाम झाला, असे सांगून सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) विकासाची गती कमी होण्यासाठी जीएसटीच्या अंमलबजावणीला दोष देणाऱ्या ‘टीकाकार व शंकेखोर’ लोकांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी टीका केली.

जीएसटीमुळे भारताच्या आर्थिक विकास दराच्या गतीला फटका बसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी जेटली यांनी राजन यांचे नाव न घेता हे विधान केले.

जीएसटीमुळे भारताची आर्थिक विकासाची गती कमी झाली, असे सांगणारे टीकाकार आणि शंकेखोर लोक तुम्हाला नेहमीच भेटतील, असे युनियन बँक ऑफ इंडियाच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात व्हिडीओ लिंकद्वारे बोलताना जेटली म्हणाले.

दोन तिमाहींच्या काळासाठी अडथळा आल्यानंतर विकासदर ७ टक्के व नंतर ७.७ टक्के होऊन गेल्या तिमाहीत ८ टक्क्यांवर पोहोचला. २०१२-१४ या कालावधीत साध्य झालेल्या ५ ते ६ टक्क्यांच्या दरापेक्षा तो बराच जास्त होता, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.

स्वातंत्र्यानंतर करविषयक सर्वात मोठी सुधारणा असलेल्या आणि १ जुलै २०१७ रोजी अमलात आलेल्या वस्तू व सेवा करामुळे आर्थिक विकास दरावर केवळ दोन तिमाहींपुरता प्रतिकूल परिणाम झाला, यावर जेटली यांनी भर दिला.