विशिष्ट उद्देशाने रंगभूमीवर काम करताना ते व्यक्तिकेंद्रित न होता संस्थाप्रधान असावे, कारण काळानुरूप व्यक्ती बदलतात; पण संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू राहते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी शनिवारी केले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
माझी रंगभूमीवरील आजवरची संपूर्ण कारकीर्द संस्थाप्रधानच राहिली, असे सांगत काकडे म्हणाले, ‘नाटय़ क्षेत्रात प्रा. भालबा केळकर हे माझे गुरू होते. त्यांच्याकडून मिळालेले प्रशिक्षण आणि अनुभवामुळे नाटय़विषयक जाणिवा समृद्ध झाल्या. काही उद्देशाने रंगभूमीवर काम करायचे असेल तर ते संस्थाप्रधान असले पाहिजे, हे उमगले. नाटक म्हणजे केवळ अभिनय नव्हे, त्यात इतर सर्व घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे प्रसंगी स्वत:ची कल्पकता बाजूला सारून प्राधान्याने नवीन प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.’ ‘रंगायन’, ‘आविष्कार’ या संस्थांची स्थापना आणि वाटचालीच्या आठवणींना काकडे यांनी या वेळी उजाळा दिला. विशेषत: रंगायनने प्रायोगिक चळवळीचा पाया रोवला गेला. विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, श्री.पु. भागवत अशा अनेक सर्जनशील व्यक्तिमत्त्वांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. मात्र दुर्दैवाने सत्तरच्या दशकात आम्ही विभक्त झालो. त्यानंतर आविष्कार संस्थेची स्थापना केली. तिला पुढे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. गेली ४४ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. सध्या या संस्थेची सहावी पिढी कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.  
‘मी पुण्यामधील पुरुषोत्तम करंडकाशी संलग्न आहे. रौप्यमहोत्सवी वर्षांत राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करताना जो काही मनस्ताप, व्याप होतो, तो मी सगळा अनुभवला आहे. त्यामुळे ‘लोकांकिका’ पहिल्याच वर्षांत महाराष्ट्रभर सादर होत असल्याचे पाहून मन भरून आले, अशा शब्दांत त्यांनी ‘लोकांकिका’चे कौतुक केले.

‘लोकसत्ता’ने राबविलेल्या या एकांकिका स्पर्धेस पहिल्याच वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लोकांकिका’ हा शब्द खूप आवडला. आजची तरुणाई उद्याच्या रंगभूमीची आशा आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे त्याचे मी स्वागत करतो. या उपक्रमातून तरुणाईला व्यासपीठ मिळणार असल्याने तो पुढे गेला पाहिजे. तसेच त्यांच्या धडपडीतून उद्याची रंगभूमी प्रगत होणार आहे.
– अरुण काकडे

प्रत्येक वर्षी वाट पाहावी अशी स्पर्धा..
‘लोकसत्ता’चा हा अप्रतिम उपक्रम आहे.  पहिल्याच वर्षी स्पर्धेचे आयोजन अतिशय नीटनेटके होते. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने महाविद्यालयातील तरुणांसाठी आव्हानात्मक ठरली आहे. दर वर्षी या स्पर्धेची महाविद्यालयीन तरुण आतुरतेने वाट पाहतील, असे नियोजन पाहायला मिळाले. नवे लेखक, दिग्दर्शक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेगवेगळ्या संहिता महाराष्ट्राला हव्या आहेत.  तरुणाईसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे.   
– अशोक समेळ (लेखक, दिग्दर्शक)

वेगळे विषय हाताळण्यात आले..
चांगल्या विषयांना अभिनय आणि तंत्रज्ञानाची उत्तम जोड असे स्वरूप येथे पाहायला मिळाले. सर्वच एकांकिकांनी वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. विषयांची निवड आणि वैचारिक गुंतवणूक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला.  आंतरमहाविद्यालयांमध्ये अशा पद्धतीने स्पर्धा होत असल्या तरी इतक्या मोठय़ा प्रमाणात एकांकिका ‘लोकांकिका’च्या निमित्ताने पाहायला मिळाल्या.
– देवेंद्र पेम (निर्माता)

चांगले व्यासपीठ मिळाले..
लोकांकिका स्पर्धेतील तरुण कलाकारांचे प्रामाणिक प्रयत्न येथे पाहायला मिळाले. चांगली ऊर्जा बाळगून तरुणांनी या एकांकिका सादर केल्या. तांत्रिक अंगानेही चांगले काम पाहायला मिळाले. त्यामध्ये निश्चितच सुधारणा होण्याची गरज आहे. एकांकिका स्पर्धामध्ये प्रेक्षकांची उपस्थित सहसा पाहायला मिळत नाही. ‘लोकसत्ता’च्या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांनी आणि महाविद्यालयीन तरुणांनीही भरभरून साथ दिली, हे स्वागतार्ह म्हणावे लागेल.    
– आनंद म्हसवेकर (दिग्दर्शक)