|| संतोष प्रधान

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना सेवेचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढविलेले व सध्या केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविणारे डॉ. सत्यपाल सिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पूर्वसूरी निवृत्त पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली असून, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना डॉ. सत्यपाल सिंग यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सेवानिवृत्ती स्वीकारत उत्तर प्रदेशमधील बागपत मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंग यांचा पराभव करून ते लोकसभेवर निवडून आले. नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. डॉ. सत्यपाल सिंग यांच्याकडे मनुष्यबळ विकास आणि गंगा स्वच्छता ही दोन खाती आहेत. डॉ. सिंग यांच्या आधी मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषविलेले अरुप पटनायक यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पटनायक हे मूळचे ओडिशा राज्यातील असून, गेल्याच वर्षी त्यांनी सत्ताधारी बिजू जनता दलात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अरुप पटनायक हे पक्षासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला होता. गेल्याच वर्षी ज्येष्ठ नेते कै. बिजू पटनायक यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात अरुप पटनायक यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा कार्यक्रमाला मुख्यमंत्री नवीन पटनायक हे उपस्थित होते.

अरुप पटनायक यांनी भुवनेश्वर अथवा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पटनायक यांचे मूळ गाव हे पुरी लोकसभा मतदारसंघात आहे. पण त्यांना बहुधा भुवनेश्वर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

अरुप पटनायक यांनी भुवनेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपने सनदी सेवेतून निवृत्ती पत्करलेल्या अपारजिता सरंगी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. सरंगी यांनी भुवनेश्वर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले असून, त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द गाजली होती. यामुळेच भुवनेश्वर मतदारसंघात भारतीय प्रशासकीस सेवा विरुद्ध भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

‘आपण बिजू जनता दलात अधिकृत प्रवेश केला तेव्हाच पक्ष देईल ती जबाबदारी पाडू, असे स्पष्ट केले होते. यामुळे पक्षाने निवडणूक लढविण्यास सांगितल्यास आपली तयारी आहे,’ असे अरुप पटनायक यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना राजकीय वेध

डॉ. सत्यपाल सिंग हे निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी झाले. टी. चंद्रशेखर आणि रामाराव या दोन सनदी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशातून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण दोघेही अयशस्वी झाले होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारीपद भूषविलेले श्रीनिवास पाटील यांनी कराड मतदारसंघातून विजय संपादन केला होता. अरुण भाटिया हे पुण्यातून लोकसभा लढले होते, पण अपयशी ठरले होते. प्रभाकर देशमुख, उत्तम खोब्रागडे, किशोर गजभिये, भाई नगराळे या सनदी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला.