भ्रष्टाचार, सुशासन आणि सर्वसामान्यांना सुखकर जीवनाचे आश्वासन देऊन निवडणूक लढवत असलेल्या आम आदमी पक्षाने बुधवारी मुंबईतील रेल्वे स्थानकांत धुडगूस आणि गोंधळ घालत तसेच रस्त्यांवर वाहतूक कोंडी घडवत सर्वसामान्यांची अक्षरश: दैना केली. अरविंद केजरीवाल यांच्या ‘रोड शो’च्या निमित्ताने आपने महाराष्ट्रात लोकसभा प्रचारास सुरुवात केली खरी; पण या सगळय़ा गोंधळामुळे ‘आप’विरोधात संतापाचे सूर उमटले.
दिल्लीत अल्पकालीन सत्ता हस्तगत केल्यानंतर, राजकीय मंचावर प्रकाशझोतात आलेले अरविंद केजरीवाल पक्षाच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या दौऱ्याची मोठय़ा जोमाने प्रसिद्धी करण्यात आली होती. मिनिटागणिक त्यांचे भरगच्च कार्यक्रम ठरविण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान आम आदमीच्या नेत्याचे ‘खास आदमी’ म्हणून विमानातून सांताक्रूझ विमानतळावर आगमन झाले. विमानतळाच्या बाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी चिक्कार गर्दी केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी प्रसिद्धीचा धुरळा उडवत विमानतळ ते अंधेरी रेल्वे स्थानक रिक्षाने आणि अंधेरी ते चर्चगेट असा लोकलने प्रवास केला. हा संपूर्ण प्रवास मुंबईकरांसाठी मात्र त्रासदायक ठरला. ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे विमानतळ ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली.  
पत्रकार परिषदेला दांडी
लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या राजकीय पर्यायाचा माहोल उभा करणारे आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रसिद्धीचा धुरळा उडवीत मुंबईत दाखल झाले, परंतु प्रसार माध्यमांना मात्र सामोरे जाण्याचे त्यांनी टाळले. ठरलेली पत्रकार परिषद रद्द केल्याचे ऐनवेळी कळविण्यात आले. अडचणीच्या प्रश्नांचा सामना करावा लागेल म्हणूनच माध्यमांना सामोरे जाण्याचे त्यांनी टाळल्याची चर्चा आहे.
धातूशोधकांची मोडतोड
केजरीवाल यांच्या स्वागतासाठी चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी उसळल्याने उत्साही ‘आप’ कार्यकर्त्यांनी स्थानकावरील धातूशोधक यंत्रांची मोडतोड केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही यावेळी  धक्काबुक्की झाली.
रिक्षावाल्याला दंड
केजरीवाल यांच्या रिक्षात त्यांच्यासोबत आणखी पाच जण बसल्याने संबंधित रिक्षाचालकास पोलिसांनी नंतर दंड केला.

सार्वजनिक मालमत्तेचे (केजरीवाल यांच्या दौऱ्यामुळे) जे नुकसान झाले आहे, ते अपघाताने वा जाणुनबुजून करण्यात आले आहे का, याचा आढावा घेण्यात येईल. कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असेल, तर कारवाई करण्यात येईल.
– आर. आर. पाटील, गृहमंत्री