News Flash

गरजेपुरत्या गोळ्या, कॅप्सूल मिळण्याबाबत अन्न-औषध प्रशासन आग्रही!

त्यानुसार रुग्णाने सहा गोळ्या मागितल्या तर त्याला दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रीप देण्याची आवश्यकता नाही,

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीतील प्रमाणाऐवजी आवश्यकता नसतानाही औषधाची संपूर्ण पाकीट (स्ट्रीप) घेणे बंधनकारक करण्याऐवजी रुग्णाला गरजेपुरत्याच गोळ्या, कॅप्सूल उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन आग्रही आहे. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून त्यात औषध दुकानदारांच्या अडचणी लक्षात घेऊनच कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील ६५(९) या तरतुदीनुसार, रुग्णाला औषध दुकानातून वितरित करायच्या औषधांबाबत स्पष्टपणे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णाने सहा गोळ्या मागितल्या तर त्याला दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रीप देण्याची आवश्यकता नाही, असा त्याचा सरळ अर्थ असतानाही औषध दुकानदारांकडून तो नियम पाळला जात नाही. दहा गोळ्यांचे पाकीट कापून त्यातून आवश्यकतेनुसार सहा गोळ्या दिल्या तर उर्वरित चार गोळ्यांच्या स्ट्रीपवर औषधाच्या उत्पादनाची आणि मुदत संपल्याची तारीख आढळत नाही, असा औषध दुकानदारांचा प्रमुख आक्षेप आहे. या आक्षेपानुसारच सर्वच औषधनिर्मिती कंपन्यांशी बोलणी सुरू करण्यात आली असून दोन्ही बाजूला उत्पादनाची तसेच मुदत संपल्याची तारीख छापण्याबाबत त्यांना आग्रह करण्यात आला आहे. या औषध कंपन्यांनी अशा रीतीने औषधांच्या पाकिटावर छपाई केल्यानंतर रुग्णाला आवश्यक तेवढेच औषध उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्रातील औषध दुकानदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
कायद्यातील तरतुदीचे औषध दुकानदारांनी पालन केले तर अर्थात त्यांच्या फायद्यात कपात होणार आहे. त्यामुळेच त्यांचा विरोध आहे, परंतु प्रामुख्याने डॉक्टरांकडून सहा गोळ्यांचा वा १५ गोळ्यांचा कोर्स दिला जातो. मग कंपनीच सहा गोळ्यांच्या स्ट्रीप तयार करू शकत नाहीत का, अशीही चाचपणी केली जात आहे. औषधांच्या भरमसाट किमती असल्यामुळे आवश्यक तेवढेच औषध घेण्याची मुभा असल्यास त्याचा रुग्णाला फायदा होणार आहे. त्यासाठीच अन्न व औषध प्रशासन आग्रही असल्याचेही या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

आवश्यक तेवढय़ा गोळ्या, कॅप्सूल कापून देण्यात यावी, यासाठी स्ट्रीपवर दोन्ही बाजूला उत्पादन केल्याची तसेच मुदत संपल्याची तारीख छापता येईल का, याबाबत कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. हा विषय आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर प्राधान्याने आहे.
– डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, एफडीए

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2015 2:52 am

Web Title: as per requirement patient must get medicine
टॅग : Medicine
Next Stories
1 विधि महाविद्यालयात अभिरूप न्यायालय खटला स्पर्धा
2 शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेचा पुन्हा वाद
3 स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवरचा अधिकारी अभ्यास दौऱ्यावर!
Just Now!
X