महापालिकेने मुंबईत करोना चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून २४ तासांत नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली असून ती २० हजारांच्या पुढे गेली आहे. सोमवारी ११७९ नवीन रुग्ण आढळले असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग ०.८३ टक्कय़ांपर्यंत खाली आला असला तरी रुग्णांचा शोध सुरूच ठेवण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या विभागात रुग्णवाढीचा दर जास्त आहे अशा दहा विभागांना दर दिवशी १००० चाचण्यांचे लक्ष्य दिले आहे. तर अन्य विभागांनाही चाचण्या वाढवण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत दर दिवशी नऊ हजारापर्यंत चाचण्या होऊ लागल्या आहेत. त्यात दर दिवशी हजार बाराशे पर्यंत रुग्ण आढळत असून त्यातील बहुतांशी रुग्णांना लक्षणे नाहीत. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ६८ हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

बोरिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरच्या वर रुग्णांची नोंद होते आहे. मात्र या भागात दर दिवशीच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवलेले असल्यामुळे रुग्ण वेळीच सापडत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली. तर रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांच्याही चाचण्या केल्या जात असून त्यातूनही रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. मात्र वेळीच रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर उपचार वेळीच सुरू केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मृतांची एकूण संख्या ७६५५

दरम्यान, सोमवारी मुंबईत ३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या ७६५५ वर गेली आहे. मृतांपैकी २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर एका दिवसात ९१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात ११,८५२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ११,८५२  रुग्ण आढळले असून, १८४ जणांचा मृत्यू झाला.

राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ९२ हजार झाली असून, आतापर्यंत २४,८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १ लाख ९४ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. दिवसभरात ११,१५८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. गेल्या २४ तासांत नाशिक शहर ६५१, जळगाव ४६२, पुणे ८७५, पिंपरी-चिंचवड ५९२, नागपूर ६४५ याप्रमाणे रुग्ण आढळले.