महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बरखास्त केली आहे. राज्यात नुकताच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती. आता निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे ही कमिटी बरखास्त करण्यात आल्याचे खासदार ओवेसेंनी सांगितल्याचे समजते.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने नऊ सदस्यांची कोअर कमिटी स्थापन केली होती. कमिटीतील प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली होती. परंतु संबंधितांना ती जबाबदारी पार पाडता आली नसल्याने ओवेसेंनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीच पुणे शहराध्यक्ष जुबेर शेख यांनी आमदार इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी पुणे पालिकेकडे दुर्लक्ष केल्याचे व शहराध्यक्षांना विश्वासात न घेताच उमेदवारी देण्याता आल्याचा आरोप केला होता. तसे उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही केला होता. त्यानंतर शेख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. अशीच परिस्थिती लातूरमध्येही दिसून आली. तिथे तर ओवेसी बंधू व इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळत कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
पक्षाला पुणे, मुंबई व राज्यातील इतर ठिकाणी म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. सोलापूर महापालिकेत पक्षाने प्रथमच निवडणूक लढवून ९ जागा पटकावल्या आहेत. तिथेही पक्षाला मोठ्या अपेक्षा होत्या.